Home Blog Page 14

सॅटेलाइट फोटोत मान्सूनचे ढग देशावरून गायब:महाराष्ट्रासह 17 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

भारतातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सूनची) गती सध्या मंदावली आहे. १५ जून, सोमवारच्या उपग्रह फोटोंवरून असे दिसून आले की, देशाच्या मोठ्या भागावर मान्सूनचे ढग अनुपस्थित होते.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, ४ जून ते १५ जून या कालावधीत देशात ५३.७ मिमी पाऊस पडायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली; म्हणजेच पावसाच्या प्रमाणात ६४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे.मान्सूनची सक्रियता मंदावल्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे.

दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या भागात स्थिरावला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्येकडील राज्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या जवळ थांबला आहे; या तीन राज्यांमध्येही मान्सूनचे पूर्णपणे आगमन झालेले नाही.
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज

१६ जून:

बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत ताशी ४०-६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
१७ जून:

सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-६० किमी) पाऊस पडू शकतो.
झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो.
महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट

महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट (हीटवेव्ह) कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात १७ जूनपर्यंत आणि विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये १७ जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत १६ जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

19 जूनपर्यंत या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 19 जूनपर्यंत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू राहील.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 14 ते 19 जूनपर्यंत पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेशात 14 ते 19 जून दरम्यान पावसाचा जोर.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 19 जूनपर्यंत थांबून थांबून पाऊस.

पूर्व उत्तर प्रदेशात 14 जून आणि 18-19 जून रोजी पावसाची शक्यता.

पश्चिम राजस्थानमध्ये 14 ते 17 जून आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 14 जून रोजी वादळी वारे वाहू शकतात.

उत्तराखंडमध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 14 जून रोजी वादळ आणि विजा चमकण्याची शक्यता आहे.

घाऊक महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक:मे महिन्यात 9.68% वर पोहोचली; इंधन महागले, अन्नधान्य आणि तेलाच्या किमतीही वाढल्या

पुणे-मे महिन्यात घाऊक महागाई (WPI) वाढून 9.68% वर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती 8.26% होती. मे महिन्यात महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच 15 जून रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती वाढणे हे आहे. याशिवाय, धान्य आणि तेलही महाग झाले आहे. खरं तर, अमेरिका आणि इराण यांच्यात साडेतीन महिन्यांपासून तणाव आहे. परिस्थिती सामान्य न झाल्यास महागाई आणखी वाढू शकते.

दैनंदिन गरजेच्या वस्तू, इंधन आणि विजेचे दर वाढले

दैनंदिन गरजेच्या वस्तूंची (प्रायमरी आर्टिकल्स) महागाई 3.78% वरून वाढून 4.99% झाली.
खाद्यपदार्थांची (फूड इंडेक्स) महागाई 3.11% वरून वाढून 4.49% वर पोहोचली आहे.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील घाऊक महागाई दर 24.89% वरून वाढून 30.33% झाला आहे.
उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर 6.68% वरून वाढून 7.48% राहिला.
प्रायमरी आर्टिकल्स, ज्याचे वेटेज २२.६२% आहे. फ्यूल अँड पॉवरचे वेटेज १३.१५% आणि मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्सचे वेटेज सर्वाधिक ६४.२३% आहे. प्रायमरी आर्टिकल्सचे देखील चार भाग आहेत.

फूड आर्टिकल्स जसे की धान्य, गहू, भाज्या
नॉन-फूड आर्टिकल्समध्ये तेलबिया येतात
खनिजे
क्रूड पेट्रोलियम
मे महिन्यात किरकोळ महागाई ३.९३% राहिली

मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून ३.९३% वर पोहोचली, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती. गेल्या ५ महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

घाऊक किंमत निर्देशांक (WPI) चा सामान्य माणसावर परिणाम

घाऊक महागाई दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास त्याचा बहुतेक उत्पादन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतो. जर घाऊक किंमत खूप जास्त काळ उच्च पातळीवर राहिली, तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांद्वारे WPI नियंत्रित करू शकते.

उदाहरणार्थ, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तथापि, सरकार कर कपात एका मर्यादेतच कमी करू शकते. WPI मध्ये धातू, रसायने, प्लास्टिक, रबर यांसारख्या कारखान्यांशी संबंधित वस्तूंना जास्त महत्त्व दिले जाते.

महागाई कशी मोजली जाते?

भारतात दोन प्रकारची महागाई असते. एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई असते. किरकोळ महागाई दर सामान्य ग्राहकांकडून दिल्या जाणाऱ्या किमतींवर आधारित असतो. याला ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असेही म्हणतात. तर, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) म्हणजे घाऊक बाजारात एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाकडून वसूल करतो त्या किमती.

महागाई मोजण्यासाठी विविध वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये उत्पादित वस्तूंचा वाटा 63.75%, अन्नधान्यासारख्या प्राथमिक वस्तूंचा 22.62% आणि इंधन व ऊर्जा यांचा 13.15% असतो. तर, किरकोळ महागाईमध्ये अन्न आणि उत्पादनांचा सहभाग 45.86%, घरांचा 10.07% आणि इंधनासह इतर वस्तूंचाही सहभाग असतो.

तीन वर्षांच्या ब्रेन डेड बालकाचे अवयवदान

पुणे: मेंदूमृत झालेल्या तीन वर्षांच्या बालकाचे अवयवदान करण्यात आले. या निर्णयामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन बालरुग्णांना अवयव मिळाले, तर दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे. पुणे विभागात इतक्या लहान मुलाचे हे पहिलेच अवयवदान ठरले आहे.

ताडीवाला रस्ता येथील तीन वर्षीय मु लगा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित केले. मात्र, मुलाच्या निधनाच्या दुःखातही त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलाला दोन जून रोजी गंभीर अवस्थेत रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. डॉ. संजय व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली बाल अतिदक्षता विभागातील (पीआयसीयू) डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सक्षम प्राधिकारी डॉ. देवीदास भालेराव यांनी १२ जून रोजी त्याला मेंदूमृत घोषित केले. यानंतर प्रत्यारोपण समन्वयक लोचना जाधव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले.प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) नियमानुसार अवयवांचे वाटप करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृत रुबी हॉल क्लिनिक आणि बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील दोन बालरुग्णांना देण्यात आले. दोन्ही नेत्रपटलांचेही दान करण्यात आले असून, त्यामुळे दोन अंधांना दृष्टी मिळेल.

दरम्यान, “इतक्या कमी वयातील अवयवदाता मिळणे अत्यंत दुर्मीळ असते. पालकांनी दुःखाच्या प्रसंगात घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवजीवन मिळाले, तर दोन जणांना दृष्टी मिळणार आहे,” असं रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. विवेक लाल यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी

पंढरपूर दिनांक 14 – राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी जीआरमध्ये ज्या काही अटी आहेत त्या शिथिल तसेच काढून टाकण्याची मागणी केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांची 50 हजारांची अट काढून टाका अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. तसेच या अटी काढा नाहीतर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा अपमान होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकरी कर्जमाफीमधील अटींच्या बाबतीत काय करता येईल यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, आमदार रोहित पवार हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मला त्यांचा कॉल आला आणि तेव्हा मी विचारले तेव्हा विचारले की हा सल्ला कोणी दिला? कारण मी देखील उपोषण केले होते. उपोषणाच्या भानगडीत पडायचे नाही, असे माझे मत आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आता मागणी नसताना देखील आम्ही शेतकरी कर्ज माफी केली. निवडणुकाही नव्हत्या, तरी आम्ही हा निर्णय घेतला. नेमलेल्या समितीने अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण रोहित दादांना असे वाटत आहे की यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांच्या मागण्या आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर या निकषावर पोहोचलो की चर्चा करावी लागेल. असे होणार नाही की इथे बसल्या बसल्या झाले आणि दिले. शासन सर्वांना मदत करत आहे.

उपोषण सोडावे, गिरीश महाजन यांची विनंती

आता शेतकरी अडचणीत आहे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तरी यात सुधारणा पाहिजे असे रोहित पवारांना वाटत आहे. मी म्हणेल तुम्ही मुंबईला या आपण सविस्तर चर्चा करू. 22 तारखेपासून अधिवेशन आहे. 22 च्या आधी आपण एकदा बसून चर्चा करू. शेवटी मुख्यमंत्री साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि मार्ग निघेल. उपोषण करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ न बसता उपोषण सोडावे.

रोहित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार

यावर रोहित पवार म्हणाले की, मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विचारायचे आहे की, हे आंदोलन राजकीय नव्हते. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. कृषिमंत्री साहेबांनी देखील आपल्याला ग्वाही दिली आहे, गिरीश महाजन देखील आत्ता आपल्याला बोलले आहेत. पण मला असे वाटते की यात अजून ओढाताण केली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे. अधिवेशनाच्या आधी आपण चर्चा करूया. मला असे वाटत आहे की यातून दोन्ही अटी काढल्या जातील. मी सरकारला आग्रह करेल की आमच्या मागण्या मान्य कराच. जर सरकार याबाबतीत बैठक घ्यायला तयार असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे जायचे का? असा सवाल पवारांनी आंदोलकांना व शेतकरी बांधवांना विचारला, त्यावर शेतकऱ्यांनी होकार उत्तर दिले. त्यानंतर रोहित पवारांनी सरकारचे आभार व्यक्त केले.

छोटा हत्ती विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू:एकाच कुटुंबातील सासू, 2 सुना, 3 नातवंडे असे 6 जण मृत्युमुखी

माळशिरसमधील घटना
म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून पंढरपूरकडे पीक अप गाडी अर्थात छोटा हत्ती वाहनातून परतणाऱ्या भाविकांवर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास काळाने घाला घातला. पंढरपूर-सातारा महामार्गावरील तांदुळवाडीजवळ चालकाचा ताबा सुटून त्यांचे वाहन रस्त्यालगत पाच फूट अंतरावर असलेल्या विहिरीत कोसळले. यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना ग्रामस्थांनी वाचवले. यापैकी दोघे स्वत: पोहून बाहेर आले, तर पाच जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. मृतांत ४ बालकांसह ४ महिलांचा समावेश आहे. संदीप बावचेंच्या कुटुंबातील पत्नी, २ मुले, आई, भाऊ व पुतण्या असे ६ जण मृत्युमुखी पडले.

पंढरपूरनजीकच्या इसबावी येथील सिद्धेश्वर पोपट जाधव हे मावशी व बहिणीच्या कुटुंबातील १५ जणांसह रविवारी छोटा हत्ती वाहनाने (एमएच १३ डीक्यू ६३३५) म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अपघात घडला. ग्रामस्थांनी धाव घेत ट्रॅक्टरला दोर बांधून वाहन बाहेर काढले. दरम्यान, ७ जणांना वाचवले. चालक सागर चौगुले (रा. रांझणी) जखमी झाला. मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले, तर ५ जखमींना तांदुळवाडी येथीलच खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृतांच्या वारसांना पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येकी २ लाख, तर राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली.
छोटा हत्तीच्या पाठीमागून मी आणि रणदिवे दुचाकीवर येत होतो. वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते विहिरीत कोसळले. वडिलांना फोनवर माहिती दिली. लोकांना घेऊन या असे सांगितले. त्या वेळी दुचाकी रस्त्याकडेला लावून विहिरीत उडी मारली. चार वर्षांच्या मुलाला बाहेर काढले. त्याच्या छातीवर दाबून पोटातील पाणी काढले. तो वाचला. त्याच वेळी विलास पाटील, हणमंत रणदिवे त्यांनीही मदत करत इतर ५ जणांना बाहेर काढले. तोपर्यंत ग्रामस्थ आले. त्यांनीही मोठी मदत केली. दोन जेसीबी, एक क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन व मृतदेह बाहेर काढले.

कठडा नसल्याने वाहन थेट विहिरीतच

ही विहीर तांदुळवाडी येथील रामकृष्ण कदम यांची आहे. रस्त्यापासून फक्त पाच फुटांवर ही विहीर आहे. बाजूला झुडपे आहेत. त्यामुळे विहिरीचा अंदाज येत नाही. त्यातच हे वाहन कोसळले. अनेकदा निवेदने देऊनही संरक्षक कठडा अथवा भिंत बांधली नसल्याचे विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी सांगितले.

पंढरपूर-सातारा मार्गाने हे वाहन पंढरपूरच्या दिशेने येत होते. तांदुळवाडीजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. येथेच रस्त्यापासून अवघ्या ५ फुटांवर ही विहीर आहे. या विहिरीत हे वाहन कोसळून अपघात घडला.

दिंडोरीत ३ एप्रिलला कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जीव गेल्यानंतर बुजवली विहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिलला असाच अपघात झाला होता. मध्यरात्री चालकाचा ताबा सुटून कार ७० फूट खोल व सुमारे ३० फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांत सहा चिमुरड्यांचा समावेश होता. ९ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. १२ तासांतच ही जीवघेणी विहीर बुजवली गेली.

इराण अण्वस्त्रे बनवणार नाही, होर्मुजही उघडेल:अमेरिकेसोबत कराराच्या मसुद्यावर सहमत, अमेरिका इराणच्या तेलावरील निर्बंध हटवेल

तेहरान-अमेरिका आणि इराणमधील शांतता करारासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यात आण्विक कार्यक्रम, तेल बंदी, मालमत्ता गोठवणे आणि होर्मुझ या मुद्द्यांवर एकमत झाले आहे. इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्स न्यूज एजन्सीने हा दावा केला आहे.अहवालानुसार, इराणने या मसुद्यात म्हटले आहे की, तो अण्वस्त्रे बनवणार नाही आणि इतर कोणत्याही देशाकडून ती घेणार नाही. अंतिम करार होईपर्यंत इराण आपल्या विद्यमान आण्विक कार्यक्रमात कोणतेही मोठे बदल करणार नाही. ते युरेनियम समृद्ध करणार नाही आणि नवीन आण्विक केंद्रांचा विस्तार करणार नाही.

इराण ताबडतोब सर्व व्यापारी जहाजांसाठी होर्मुझ उघडेल. त्या बदल्यात अमेरिका इराणच्या बंदरांवरची नौदलाची नाकेबंदी उठवणार आहे. अमेरिका इराणच्या तेल निर्यातीवर काही काळासाठी निर्बंध शिथिल करणार आहे.या मसुद्यानुसार, अमेरिका इराणची २५ अब्ज डॉलर्सची जप्त केलेली मालमत्ता सोडणार आहे. यासोबतच अमेरिका इराणच्या पुनर्विकासासाठी आपल्या मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने योजना तयार करणार आहे.

ट्रम्प यांचा दावा- रविवारी शांतता करार होईल: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये रविवारी करार होईल आणि त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी खुली केली जाईल.
इराणने ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले: इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रविवारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अंतिम तारीख निश्चित झालेली नाही.
करारानंतर 60 दिवसांच्या नवीन चर्चेची योजना: अहवालानुसार, प्रथम एक अंतरिम सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित केला जाईल. त्यानंतर 60 दिवसांपर्यंत अणु कार्यक्रम, निर्बंधांमध्ये सवलत आणि होर्मुज सामुद्रधुनीच्या कामकाजासारख्या मुद्द्यांवर तांत्रिक चर्चा होईल.
भारत-अमेरिकेदरम्यान जहाजांवरील हल्ल्यांमुळे तणाव: भारताने भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवरील हल्ल्यांबाबत दुसऱ्यांदा अमेरिकन राजदूताला बोलावले. तर ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणने भारतीय जहाजांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
इराणने युरेनियम लपवण्यासाठी बोगदे बंद केले: सीएनएनच्या अहवालानुसार, इराणने इस्फहान अणु केंद्रात ठेवलेल्या उच्च-समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक बोगद्यांना बंद केले आहे आणि मार्गांवर स्फोटक सुरुंग (माइन्स) पेरले आहेत.
ओमानच्या किनाऱ्याजवळ तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या जहाजावरील ११ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यावर अडकलेल्या ११ भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. मस्कत येथील भारतीय दूतावासाने रविवारी ही माहिती दिली.

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनमधील बिघाडामुळे हे जहाज समुद्रात अडकले होते. त्यानंतर बचाव मोहीम राबवण्यात आली आणि त्याद्वारे या ११ भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

भारतीय दूतावासाने सांगितले की, इतर तिघांची सुटका करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. दूतावास ओमानमधील संबंधित अधिकारी आणि बचाव संस्थांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

पुणे, पिंपरीतील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्‍टपर्यंत पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध राहील असे नियोजन करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ; ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करा- उपलब्‍ध पाण्‍याचा वापर सर्वप्रथम पिण्‍यासाठी करण्‍यात यावा, बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी विशेष माहीम राबवण्‍यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत कठोर करावाई करण्‍याबाबतही स्‍पष्‍ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

पुणे दि.१३ : राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वौच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहे. बेकायदेशिर पाणी उपश्‍यावरही तातडीने कडक कारवाई करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या. सिंचन भवनामध्‍ये जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत कृष्‍णा व गोदावरी लाभक्षेत्राच्‍या अंतर्गत येणा-या धरणांमधील पाणीसाठा, अगामी मान्‍सुनची परिस्थिती या संदर्भात महत्‍वपूर्ण बैठक संपन्‍न झाली. या बैठकीला कृष्‍णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयवंत गवळी यांच्‍यासह मुख्‍य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सद्य परिस्थितीत राज्‍यातील धरणांमधील एकुण उपयुक्त जलसाठा ३५७.५ टिएमसी (२५ टक्के) असून, तो गतवर्षीच्‍या तुलनेत कमी असल्‍याचे निदर्शनास आले. यावर्षीचे पर्जन्‍यमान आता पर्यंत अत्‍यल्‍प झाल्‍यामुळे धरणात पाणी आले नाही हे त्‍यामागील प्रमुख कारण आहे. विशेषत: पुणे विभागातील उपयुक्‍त जलसाठा गतवर्षीच्‍या तुलनेने कमी असल्‍याने परिस्थिती गांभिर्याने हाताळावी असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्‍टपर्यंत पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पाणी राखीव ठेवण्‍याच्‍या सुचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्‍याने दिल्‍या आहेत. मराठावाडा आणि कृष्‍णा महामंडळाच्‍या अंतर्गत येणारे सर्व धरणं, जलाशय व प्रमुख जलस्‍त्रोतांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा, त्‍यावर अवलंबून असलेल्‍या लोकसंख्‍येचा विचार करुन पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवश्‍यक राखीव कोटा निश्चित करण्‍याबाबतही बैठकीत जलसंपदा मंत्र्यानी सुचित केले. जलसंपदा विभाग, जिल्‍हाधिकारी, महानगरपालिका, जिल्‍हा परिषद आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांच्‍यात प्रभावी समन्‍वय ठेवून पाणी व्‍यवस्‍थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले.

नाशिक, अहिल्‍यानगर व मराठवाडा विभागातील जलसाठ्याचा आढावा घेताना नाशिक विभागात सध्‍या २६ टक्‍के तर मराठवाडा विभागात २८ टक्‍के उपयुक्‍त जलसाठा उपलब्‍ध असून, दोन्‍हीही विभागातील प्रकल्‍पांमध्‍ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्‍यानगर विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून उपलब्‍ध जलसाठ्याचे काटेकारपणे नियोजन करण्‍याबातही गांभिर्याने कार्यवाही करण्‍यास आधिका-यांना सांगण्‍यात आले आहे.

नाशिक, अहिल्‍यानगर, पुणे, मराठवाडा विभागातील जलशयांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर पाण्‍याची नवीन आवक सुरु होईपर्यंत असलेल्‍या पाण्‍याचा वापर अत्‍यंत जपून करावा. अगामी मान्‍सुनच्‍या अनिश्चिततेच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी स्‍वतंत्र कृती आराखडा तयार करतानाच पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा, ग्रामीण व शहरी भागातील टंचाई निवारण आणि जलस्‍त्रोतांचे संरक्षण करण्‍यावर भर देण्‍याबातही बैठकीत ठरविण्‍यात आले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासह गोदावरी खो-यातील विविध प्रकल्‍पांची स्थिती लक्षात घेता स्‍थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग व पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करुन पाण्‍याचे नियोजन करावे, उपलब्‍ध जलसाठ्याचा वापर अत्‍यावश्‍यक गरजांसाठी करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत आधिका-यांना केले आहे.

उपलब्‍ध पाण्‍याचा वापर सर्वप्रथम पिण्‍यासाठी करण्‍यात यावा, बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी विशेष माहीम राबवण्‍यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत कठोर करावाई करण्‍याबाबतही स्‍पष्‍ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल ठरले – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे, ता. १४

छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य हे धर्मनिरपेक्ष व समाज परिवर्तन घडविणारे होते. त्यांनी स्री सक्षमीकरणाची क्रांती केली. महिलांना कायद्याचे पाठबळ दिले. वंचितांना आरक्षण दिले. संविधानातील समतेकडे जाणारे ते पाऊल होते, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेले ३२ वे गांधी दर्शन शिबिर रविवारी गांधी भवन, कोथरूड येथे झाले. यावेळी ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’ या विषयावर लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते.

‘सामाजिक विषमतेच्या तळाशी’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समीर गायकवाड यांचे व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थॉटस् ऑफ पाकिस्तान या पुस्तकाविषयी पत्रकार मुक्ता कदम यांचे विवेचन आणि ‘मी सत्यशोधक ज्योतीराव फुले बोलतोय’ हा कुमार आहेर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग या शिबीरात झाला.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी काम केले. महाराज हे आदर्श प्रशासक होते. शाहू महाराजांचा कालखंड महिला शिक्षणासाठी चांगला होता. सामाजिक न्याय देणारे संविधान शाहूंनी स्वराज्यात निर्माण केले. समतेचा, सुधारणेचा पथसिध्द मार्ग दिला. महाराजांनी आदेश काढून मागास व सवर्ण यांच्या साठी एकत्र शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांना वकिली शिक्षण दिले. सर्व सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या केल्या. कृतीने मनुस्मृतीचे कायदे झिडकारले.

 रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ ला चांगला प्रतिसाद !

पर्यावरणासाठी धावली तरुणाई

पुणे, दि. १४ जून २०२६ :

पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या तेर पॉलिसी सेंटरतर्फे आणि टाटा स्टील कलर्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला ‘एन्व्हायरॉथॉन – रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ हा उपक्रम रविवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड, पाषाण येथे उत्साहात पार पडला. राज्यातील विविध भागांमधून आलेल्या ८०० पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. 

या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून पर्यावरण जागृती आणि आरोग्य संवर्धन यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम म्हणून त्याला विशेष ओळख मिळाली आहे. पुणे, दौंड, मुंबई, दिल्ली, हरियाणा, आसाम तसेच कर्नाटक येथील स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, उपअधीक्षक राजेंद्र  मायने आणि डॉ. रोहन खावटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेदरम्यान सहभागी धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ धावपटू आशीष कसोदेकर, टाटा स्टील कलर्स प्रा. लि. चे सरव्यवस्थापक महेंद्र पिंगळे, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, गुगलचे अधिकारी विजय कुमार, उमेश कुमार, डॉ. रोहन खावटे आणि अनिल उत्पात यांच्या हस्ते  झाला.

यावेळी बोलताना आशीष कसोदेकर म्हणाले, “धावणे ही शरीराला मजबुती देणारी कृती आहे. एन्व्हायरॉथॉनमधून मानवी प्रकृती आणि निसर्ग यांची जपणूक होते. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.”महेंद्र पिंगळे म्हणाले, “टाटा स्टीलकडून आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असतो. रूफिंग शीट निर्मितीत पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही असे रंग वापरले जातात आणि या उत्पादनांचा  पुनर्वापरही शक्य आहे.”डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, “टाटा स्टीलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या तेर पॉलिसी सेंटरच्या विविध उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक तापमानवाढीचे आव्हान अधिक तीव्र होत असताना पर्यावरण संवर्धनाचा विचार समाजात अधिक व्यापकपणे रुजविणे आवश्यक आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी आपटे आणि ऋतुजा इंगळे यांनी केले.

तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हायर्नमेंट) ही संस्था वृक्षलागवड, नागरी उद्यान निर्मिती, कांदळवन संरक्षण, विहिरींचे पुनरुज्जीवन, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती या क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेने महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आसाम, गोवा, राजस्थान आणि ओडिशा येथे तेरा लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. एन्व्हायरॉथॉनसारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

वस्तुनिष्ठ सत्याचा विलय झाल्यास अराजकतेचा धोका :विवेक सावंत 

पुणे-

एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या विषयावरील संवाद सत्र शनिवारी सायंकाळी फाऊंडेशनच्या नवी पेठ येथील प्रशिक्षण सभागृहात उत्साहात पार पडले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान आणि सत्यशोधनाच्या प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना विवेक सावंत म्हणाले की, ‘तथ्यच बनावट असेल तर सत्य शोधणार कसे ? हा प्रश्न असून आपल्याला ज्ञान ग्रहणातून सत्याकडे गेले पाहिजे.सत्याचा पाया भुसभुशीत झाला असून वस्तुनिष्ठ सत्याचा विलय होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.गोबेल्सनीती,भावनिक आवाहन आणि  संमोहन यामुळे सत्य आणि असत्य यातील फरक धूसर झाला आहे.यातून अराजकतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळे हल्लेखोरांचे काम सोपे झाले आहे तर संरक्षकांचे काम अवघड झाले आहे.डीप फेक व्हिडीओ ओळखण्याची पद्धत विकसित झाली पाहिजे आणि अशा व्हिडिओंवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. 

ए आय विरोधात अमेरिकेसह जगात विरोधाचा सूर उमटत आहे.डेटा सेंटर ला विरोध होत आहे.भारतात देखील नागरी समाजाने चिंता व्यक्त केली आहे.या तंत्रज्ञानाला आंदोलने थांबवू शकत नाहीत.मात्र,त्या प्रगतीला योग्य आकार देऊ शकतील.ए आय ने मानवजातीची सेवा करावी पण मानवजातीची जागा घेऊ नये,अशी मागणी होत आहे.जनआंदोलन ,दबाव गट,चिंतन गट ,डिजिटल हस्तक्षेप,कायदेशीर कारवाई असे एआय विरोधात प्रतिकाराचे स्वरूप असू शकेल.नागरी समाज,धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन एआय बाबत नियामक पद्धत निर्माण केली पाहिजे.सतत सार्वजनिक दबाव येत राहिला पाहिजे. 

ते पुढे म्हणाले,’कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे उत्पादन आणि प्रसारण अभूतपूर्व वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि विवेकवादी दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन असून त्याचा वापर समाजहितासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी कसा करायचा, हे ठरविण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.

त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोगांबरोबरच त्यातील मर्यादा, चुकीची माहिती पसरविण्याची शक्यता आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला. सत्यशोधनाची परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या  विचारांचा संदर्भ दिला.संवाद सत्रात उपस्थितांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, माध्यमे, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. विवेक सावंत यांनी या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत उपस्थितांशी मुक्त संवाद साधला.

या कार्यक्रमाला सुभाष वारे,सुभाष लोमटे,उपेंद्र टण्णू यांच्यासह पुरोगामी, विवेकी चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील आव्हाने आणि संधी यांविषयी व्यापक चर्चा घडून आली.कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही : प्रा मिलिंद जोशी

पुणे नगर वाचन मंदिरातर्फे व्याख्यानाचे आयोजन

पुणे : आज चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण झाली आहे. असहिष्णू वातावरणात चांगला विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद बुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक अधोगतीचे लक्षण आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १३) आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. जोशी बोलत होते. ‘आचार्य अत्रे : व्यक्ती आणि कर्तृत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह स्वाती ताडफळे व्यासपीठावर होते.

प्रा. जोशी म्हणाले, विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षांवर आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटलेली आहे. साहित्य, राजकारण आणि समाजकारणाच्या ज्या ज्या प्रवाहात आचार्य अत्रे शिरले तो तो प्रवाह अत्र्यांनी केवळ गतिमान केला नाही तर त्यांच्या कर्तृत्वाचे असंख्य तरंग त्यांनी त्या प्रवाहात निर्माण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती. आचार्य अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात दिसले. आचार्य अत्रे साहित्याच्या आणि वक्तृत्वाच्या नभांगणातील लखलखते नक्षत्र होते. वक्तृत्वाच्या रणांगणावर पराक्रम करण्यासाठीची सारी आयुधे त्यांच्याकडे होती. त्या आयुधांचा त्या त्याप्रसंगी वापर करण्यात हे वाकबगार होते. त्यांच्या विनोदाने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्राला केवळ हसविले नाही तर रसरशीत जीवनदृष्टीआणि सौंदर्यदृष्टी दिली. मराठीपणातल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. कोतेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायला शिकवले. दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्यासाठीची गुणग्राहकता शिकवली. जीवनाच्या लढाईत हेतुपुरस्सर अडथळ्यांचे डोंगर उभे करणाऱ्यांशी दोन हात करण्याचे धारिष्ट दिले. आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्या प्रांतिक आणि भाषिक अस्मितेची विटंबना करणार असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी रणशिंग कसे फुंकायचे याचा वस्तुपाठ अत्रे यांनी घालून दिला. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्याज्य मानता कामा नये हा संस्कार केला.

स्वागतपर प्रास्ताविक विक्रम भट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पांडे यांनी केले तर आभार ॲड. रवींद्र चौधरी यांनी मानले.

शाहिरी हे समाजप्रबोधनाचे माध्यम : दादा पासलकर

‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडला मुलाखतीतून

पुणे : कलेच्या क्षेत्रातील रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य या गोष्टी शिकण्याची जिद्द होती परंतु अनेक ठिकाणांहून नकार मिळाला तरी शिकण्याची उपजत दृष्टी असल्यामुळे कलाकारांची कला न्याहाळत शिकत गेलो आणि जिद्दीने त्या आत्मसात केल्या. शाहिरी हे मनोरंजनाचे किंवा पैसा मिळविण्याचे साधन नव्हे तर समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. या हेतूने शाहिरीचे कार्यक्रम करीत राहिलो. परंतु शाहीर परिषदेचा अध्यक्ष होऊन देखील परिषदेच्या व्यासपीठावर पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली नाही हे दु:ख आजही मनात आहे, अशा भावना ज्येष्ठ कलावंत, शाहीर दादा पासलकर यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आणि आडकर फौंडेशनतर्फे ‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडणाऱ्या मुलाखतीवर आधारित अभिनव कार्यक्रमाचे रविवारी (दि. १४) आयोजन करण्यात आले होते. त्यात अभिनय व शाहिरी या कला जोपासून आपले आयुष्य त्याच्यासाठी झोकून देऊन समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे दादा पासलकर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी पासलकर बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी पासलकर यांच्याशी संवाद साधला. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.

कलेच्या क्षेत्रातील लहानपणापासून सुरू झालेली वाटचाल उलगडून सांगितल्या नंतर दादा पासलकर पुढे म्हणाले, लोककलेचे बीज माझ्यात शालेय वयापासूनच रुजले. त्यातूनच सातवीत असताना पहिला पोवाडा लिहिला. पुढे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यक्रमही आवर्जून पाहत असे. त्यातून या कलेविषयी आवड आणि आस्था निर्माण झाली. शाहिरी आत्मसात करताना त्याचा अभ्यास, पाठांतर, सुरात पोवाडा म्हणणे या गोष्टी प्रयत्नाने शिकलो. याच बरोबरीने कला क्षेत्रातील पडद्यामागील कला याविषयी देखील आकर्षण निर्माण झाले. यातूनच वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या कला आवडीने शिकत गेलो. अगदी गमभनपासून केलेली सुरुवात परिपक्व होईपर्यंत आत्मसात केली. यातही अभ्यास, प्रात्यक्षिके यावर जोर दिला. या सर्व कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी घडविले.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आठवतांना स्वरराज छोटा गंधर्व यांच्या साठीनिमित्त आयोजित संगीत सौभद्र नाट्यप्रयोगात त्यांची रंगभूषा करण्याची संधी मिळाली आणि या प्रयोगाला रसिकांनी भरभरून दाद देत त्यांचा केलेला सन्मान हा प्रसंग पासलकर यांनी आवर्जून सांगितला.

देशपरदेशातील दौऱ्यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. त्याविषयी बोलताना पासलकर म्हणाले, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना नाटकाच्या नेपथ्यामधील देव्हारा बस स्टँडवरच राहिला. आता तो हरवला अशा समजुतीने एक महिन्याचा दौरा पूर्ण करून परत त्याच स्टँडवर आलो तेव्हा जेथे देव्हारा विसरला होता तेथेच तो सुरक्षित होता हे कौतुकास्पद वाटले.

युवा पिढीला मार्गदर्शन करताना दादा पासलकर म्हणाले, आजच्या पिढीला शिक्षण पूर्ण न करताच कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करण्याची घाई झालेली जाणवते. आधी पैसे किती, मानधन किती अशा विचारणा केल्या जातात. आमच्या काळात आम्ही आधी काम केले आणि मग मानधन मिळविले. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करताना त्या क्षेत्राचा अभ्यास होणे, कष्ट करणे ही प्रवृत्ती सांभाळली तरच यश मिळेल. ही शिस्त आजही मुंबईत जाणवते परंतु पुण्यात याविषयी आस्था जाणवत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या आयुष्यात भाऊ, पत्नी, मुलांची साथ लाभली परंतु एक शाहीर, कलाकार म्हणून ख्याती मिळविली तरी एखादे वाद्य शिकायचे राहून गेले हे मनात असल्याने आजही उत्साहाने हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेत आहे. आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत रहावे ही इच्छा असल्याचे सांगून पासलकर म्हणाले, माझ्या दोन नाकपुड्या म्हणजे जाधव नाट्यसंसार आणि महाराष्ट्र शाहीर परिषद असून मुखात घरचे देतील ते घास अशी कृतार्थ भावना आहे.

प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले यांनी जुन्या जाणत्या कलावंतांचे आयुष्य पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल या हेतूने मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा जीवनप्रवास समाजापुढे यावा हा हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन आशुतोष नेर्लेकर यांनी केले.

पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन;२८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजन

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते.  

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दि. १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती.

या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.

बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीत; नागरिकांच्या कॉरिडॉरबाबतच्या समस्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पंढरपूर.दि.१४: शिवसेना नेत्या व विधानपरिषद मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी, पंढरपूरातील समाजाच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर मंदिर परिसरातील विविध सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करताना डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंदिर परिसरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच वॉटरप्रूफिंगची कामे करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या बाबीकडे पुरातत्त्व विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मंदिर परिसरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक विद्युत आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी भविष्यातील वाढती भाविक संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच महिला भाविकांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षामध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला दिल्या.

दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन प्रस्तावित मंदिर कॉरिडॉरबाबत निवेदन सादर केले. कॉरिडॉर उभारताना परिसरातील नागरिकांची घरे, जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा विचार करण्यात यावा तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित करताना सांगितले की, विकासकामे करताना स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने, यामध्ये नागरिकांची नेमकी किती घरे, दुकाने व जमीन संपादित होणार आहे त्याचे सविस्तरपणे विभाजन करून आढावा सादर करावा. कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

डॉ. गोऱ्हे यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांच्या सोयी आणि कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामुळे मंदिर विकास आणि भाविक सुविधांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. १४ जून २०२६ :

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे तीन महत्त्वाचे विषय निश्चित करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर आपले मत व्यक्त करणारी रील तयार करायची आहे.

स्पर्धकांनी तयार केलेली रील १७ जून २०२६ पर्यंत आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना @mumbaiiyc या अधिकृत हँडलला टॅग करणे तसेच #ReelSeRealTalk हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. रीलमधील आवाज व चित्रफीत स्पष्ट असावे तसेच कोणतीही आक्षेपार्ह, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट तीन रील्सना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹३,००० इतकी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील बेरोजगारी, वाढती महागाई आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर युवकांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडावी, सामाजिक व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०८२२९८०४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.