पर्यावरणासाठी धावली तरुणाई
पुणे, दि. १४ जून २०२६ :
पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या तेर पॉलिसी सेंटरतर्फे आणि टाटा स्टील कलर्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला ‘एन्व्हायरॉथॉन – रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ हा उपक्रम रविवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड, पाषाण येथे उत्साहात पार पडला. राज्यातील विविध भागांमधून आलेल्या ८०० पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून पर्यावरण जागृती आणि आरोग्य संवर्धन यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम म्हणून त्याला विशेष ओळख मिळाली आहे. पुणे, दौंड, मुंबई, दिल्ली, हरियाणा, आसाम तसेच कर्नाटक येथील स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, उपअधीक्षक राजेंद्र मायने आणि डॉ. रोहन खावटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेदरम्यान सहभागी धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ धावपटू आशीष कसोदेकर, टाटा स्टील कलर्स प्रा. लि. चे सरव्यवस्थापक महेंद्र पिंगळे, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, गुगलचे अधिकारी विजय कुमार, उमेश कुमार, डॉ. रोहन खावटे आणि अनिल उत्पात यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना आशीष कसोदेकर म्हणाले, “धावणे ही शरीराला मजबुती देणारी कृती आहे. एन्व्हायरॉथॉनमधून मानवी प्रकृती आणि निसर्ग यांची जपणूक होते. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.”महेंद्र पिंगळे म्हणाले, “टाटा स्टीलकडून आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असतो. रूफिंग शीट निर्मितीत पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही असे रंग वापरले जातात आणि या उत्पादनांचा पुनर्वापरही शक्य आहे.”डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, “टाटा स्टीलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या तेर पॉलिसी सेंटरच्या विविध उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक तापमानवाढीचे आव्हान अधिक तीव्र होत असताना पर्यावरण संवर्धनाचा विचार समाजात अधिक व्यापकपणे रुजविणे आवश्यक आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी आपटे आणि ऋतुजा इंगळे यांनी केले.
तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हायर्नमेंट) ही संस्था वृक्षलागवड, नागरी उद्यान निर्मिती, कांदळवन संरक्षण, विहिरींचे पुनरुज्जीवन, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती या क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेने महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आसाम, गोवा, राजस्थान आणि ओडिशा येथे तेरा लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. एन्व्हायरॉथॉनसारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

