तळजाईतील जलप्रवाह, भूस्खलनाचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता महत्वाची नाही काय? कॉन्टूर प्लॅन, उपग्रह प्रतिमा आणि मंजूर नकाशांनी वाढवले प्रश्न

Date:

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ४

📰पर्यावरण जपायचे असेल तर आता तरी नवीन बांधकामे थांबवा तळजाई ही फक्त जमीन नाही; पुण्याची पर्यावरणीय ढाल आहे

विशेष शोधनिबंध (इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – भाग ४)
पुणे:
पुण्याच्या पर्यावरणाचा कणा असलेल्या तळजाई टेकडी आणि विवेकानंद नगरच्या सीमेवरील सर्व्हे नंबर ८ आणि ९ मधील डोंगर फोडीचा गंभीर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण आता थेट मंत्रालयाच्या दारातून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘इथे डोंगर उतार नाहीच, सर्व काही नियमसंगत आहे’ अशी पळकुटी भूमिका घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेने (PMC) आणि संबंधित विकासकांच्या बाजूने / संबंधित बांधकाम प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेतली पण अधिकृत शासकीय डिमार्केशन सर्टिफिकेट आणि मोजणी शीट या “दस्तऐवजांमुळे नवे प्रश्न उभे” राहिलेले आहेत .

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकृत निळ्या मोजणी नकाशावरून (जावक क्र. डी वि यो झोन २/२५३) सर्वात धक्कादायक आणि पुणेकरांना पर्यावरणीय इशारा देणारा , आणि पुढील बकाल पणाची चाहूल देणारा खुलासा समोर आला आहे.

🔴 २०१५चा झोन बदल आणि २०२४मधील ‘नो वॉटर’ संदर्भ !‘नो वॉटर’ संदर्भावर नवे प्रश्न!!

तळजाई टेकडीचा हा डोंगर माथा आणि उतार रहिवासी करण्यासाठी २०१५ च्या विकास आराखड्यापासूनच (DP) राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर खेळ सुरू होता . २०१५ मध्ये या टेकडीचे आरक्षण बदलून ते ‘निवासी झोन’ (Yellow Zone) करून घेतले होते.कुठलाही पर्यावरणीय विचार न करता , नागरी वस्तीला होऊ शकणारे धोके विचारात न घेता डोंगर उतार असतानाही ज्याला निवासी केले गेले .आणि नैसर्गिक पाणवाटांबाबत प्रश्न निर्माण झाले

परंतु,सध्या बांधकाम सुरु असलेल्या या ११,१७१ चौरस मीटर भूखंडाच्या पोटात असलेले नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आणि नाले तांत्रिकदृष्ट्या ‘नो वॉटर झोन’ (No Water Zone) म्हणून आरक्षित राहिले होते . मोठा सराफ म्हणून अलीकडे उदयास आलेल्या आणि बिल्डर व्यवसायात शिरलेल्याना तिथे ‘दोन मजली तळघराची’ (Double Basement) अवाढव्य खोदाई करायची असल्याने हा ‘नो वॉटर झोन’ आडवा येत होता. म्हणूनच, मंत्रालयातील विशेष अधिकारांचा वापर करून शासन निर्णय क्र. टीपीएस १८२३/प्र.क्र…/२३/नवी-१३ अन्वये ८ एप्रिल २०२४ रोजी उरलेला शेवटचा ‘नो वॉटर झोन’चा नैसर्गिक पाण्याचा भागसुद्धा रहिवासी क्षेत्रात वर्ग करून घेण्यात आला म्हणजेच, २०१५ ला डोंगर उठवला आणि २०२४ मध्ये उरले-सुरले पाण्याचे झरेही कागदोपत्री नष्ट केले गेले .

🔴 कागदावर झोन बदलला, पण ३६ फुटांच्या तीव्र डोंगर उताराचे काय?

बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी आता छातीठोकपणे शासकीय मंजुरीचे कवच पुढे करत आहेत . परंतु, ‘माय मराठी’च्या हाती असलेल्या मूळ कंटूर प्लॅन (Contour Plan) नुसार, या जागेवर Higher level 600 m आणि Lower level 589 m अशी अधिकृत नोंद आहे . याचा अर्थ असा की, या भूखंडात तब्बल ११… (३६ फुटांचा) तीव्र नैसर्गिक डोंगर उतार अधिकृतपणे मान्य केला गेला आहे! कागदावर झोन बदलला म्हणून भूगर्भाचे आणि निसर्गाचे नियम बदलतात का ? ३६ फुटांच्या तीव्र नैसर्गिक उतारावर २ मजले खोल काँक्रीटचे तळघर खणताना महापालिकेने ‘हायड्रोलॉजिकल सर्वे’ (Hydrological Survey Report) केला होता का ?

🔴 अवघा १२ फुटांचा रस्ता मग एवढ्या मोठ्या इमारतींना परवानगी कशी ?

या प्रकल्पाकडे आणि तळजाई पाण्याची टाकी ते विणकर सोसायटी या प्रचंड उताराच्या रस्त्यावरून जायला प्रत्यक्ष जागेवर अवघा १० / १२ फूट रुंदीचा अरुंद रस्ता आहे! युनिफाइड डीसीपीआर नियमांनुसार एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी १२ ते १५ मीटरचा रस्ता बंधनकारक असताना, महापालिकेने मंजुरी दिलीच कशी? २० मार्च रोजी याच विणकर सोसायटीच्या तीव्र धोकादायक उतारावर याच प्रकल्पासाठी जाणारा बांधकाम साहित्याच्या अजस्र ट्रेलरचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये महापालिकेची भिंत आणि विजेचा खांब चकनाचूर झाला होता । सार्वजनिक मालमत्तेचे इतके नुकसान होऊनही महापालिकेने बिल्डरवर कोणतीही फौजदारी कारवाई केली नाही, उलट स्थानिक नगरसेवकांनी, “नंतर बिल्डरकडून दंडाची वसुली करा !” असे पत्र प्रशासनाला देऊन निष्पाप नागरिकांच्या जिवापेक्षा सिमेंटच्या भिंतीची किंमत जास्त आहे हेच तर दाखवून दिले नाही ?कि जीव गेल्यावर नंतर पुन्हा भरपाई मागता येते हा युक्तिवाद करायचा ठरवले आहे हे त्यांनाच ठाऊक …

🔴 ‘माय मराठी’चा पुणेकरांच्या वतीने थेट सवाल:

एकीकडे ‘अग्निशामक केंद्राच्या’ आरक्षणाचा आडोसा घेऊन थेट तळजाई माता मंदिराशेजारील डोंगरमाथा खरवडायचा, आणि दुसरीकडे महापालिकेच्याच अधिकृत टिपर ट्रकचा (क्र. MH.12.NX.8006) वापर करून खाजगी सर्व्हे नंबर ७ च्या तीव्र डोंगरउतारावर राडारोडा ओतून भूखंड सपाटीकरणाचा दुटप्पी खेळ आता पुराव्यांसह उघडा पडला आहे.

“जोरदार पावसात येथे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊन दुर्घटना घडली, तर या शासन निर्णय क्र. टीपीएस १८२३ मंजुरीप्रक्रियेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.”
या प्रकल्पावर ‘स्टॉप वर्क’ (Stop Work) नोटीस बजावून उच्चस्तरीय चौकशी करता येत नाही काय ? सजग पुणेकर आणि पर्यावरण संस्था थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) दाद मागू शकतील , हे आता निश्चित झाले आहे .

महापालिका आणि शासनाने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

१. २०१५मध्ये डोंगर माथा–उतार निवासी झोनमध्ये वर्ग करताना भूगर्भीय आणि जलवैज्ञानिक अहवाल घेण्यात आला होता का?

२. कॉन्टूर प्लॅनमध्ये ११ मीटरचा नैसर्गिक उतार दिसत असताना बांधकाम मंजुरीपूर्वी स्वतंत्र जिओलॉजिकल स्टॅबिलिटी रिपोर्ट घेतला का?

३. या भूखंडातील पावसाचे पाणी पूर्वी कोणत्या नैसर्गिक मार्गाने वाहत होते, याचा नकाशा उपलब्ध आहे का?

४. बेसमेंट, लोअर ग्राउंड आणि पार्किंगमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडणार नाही, याची खात्री कोणी केली?

५. मंजूर आराखड्यात दाखवलेला अंतर्गत फायर ड्राईव्हवे आणि बाहेरील प्रत्यक्ष प्रवेशमार्ग यांची एकत्रित तपासणी झाली का?

६. स्थानिकांनी मांडलेल्या अरुंद रस्त्याच्या प्रश्नावर महापालिकेने प्रत्यक्ष मोजणी केली का?

७. बांधकाम साहित्य वाहतुकीदरम्यान झालेल्या अपघातानंतर सुरक्षा अटींचा पुनर्विचार झाला का?

८. सर्व्हे नंबर ७च्या उतारावर राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची चौकशी झाली का?

९. तळजाई टेकडी परिसरासाठी स्वतंत्र पर्यावरणीय आणि जलनिचरा संरक्षण आराखडा तयार केला जाणार का?

१०. सर्व तांत्रिक अहवाल, मंजुरीची अटी आणि प्रत्यक्ष तपासणी अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक केले जाणार का?

तळजाई ही फक्त जमीन नाही; ती पुण्याची पर्यावरणीय ढाल आहे

तळजाई टेकडी ही फक्त बांधकामासाठी उपलब्ध जमीन नाही. ती पुण्याच्या हवामान, पावसाचे पाणी मुरवणे, जैवविविधता, पक्षी-प्राणी, मातीची पकड आणि नैसर्गिक जलप्रवाह यासाठी महत्त्वाची पर्यावरणीय संपदा आहे.

टेकडीवरील माती, दगड, झाडे, गवताळ पट्टे आणि नैसर्गिक उतार हेच शहराचे नैसर्गिक जलनियंत्रण करतात. या जागी खोदकाम, काँक्रीट, बेसमेंट, रस्ते, भिंती आणि कठीण पृष्ठभाग वाढले, तर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगाने खाली धावते. यामुळे माती,जमीन वाहून जाणे, पाणी साचणे आणि पायथ्याच्या वसाहतींना धोका वाढू शकतो.

म्हणून तळजाईसारख्या संवेदनशील भागात केवळ झोनिंग आणि FSI पाहून मंजुरी देणे पुरेसे नाही. पर्यावरणीय क्षमता, पावसाळी जलनिचरा, भूगर्भीय स्थैर्य, स्थानिक रस्ता आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वांचा एकत्रित अभ्यास आवश्यक आहे.

महापालिकेकडून नवीन उंच उंच इमारतींच्या बांधकामान अभय : येथे पूर्वी स्वच्छ, शुद्ध हवा, वाहतूक वर्दळ नसलेला शांत परिसर म्हणून लोक वास्तव्यास आले ,पण आता हळू हळू तो पुन्हा अरुंद रस्ते , वाहतूक कोंडीचा परिसर बनला तर नवल वाटणार नाही.

कागदावर रंग बदलून झोन बदलता येतो; पण डोंगराचा उतार, पावसाचे नैसर्गिक प्रवाह, भूजलमार्ग आणि टेकडीची रचना बदलत नाही. म्हणूनच अशा भूखंडावर मोठ्या प्रमाणावर खोदकाम, बेसमेंट, लोअर ग्राउंड, पार्किंग आणि काँक्रीटीकरणाचा आराखडा मंजूर करताना स्वतंत्र हायड्रोलॉजिकल सर्वे, जिओलॉजिकल स्टॅबिलिटी रिपोर्ट, पावसाळी जलनिचरा आराखडा आणि आपत्कालीन प्रवेशमार्गाची प्रत्यक्ष तपासणी झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपलब्ध उपग्रह प्रतिमांमध्ये पिवळ्या रेषेत दाखवलेला भूखंड तळजाई टेकडी, तळजाई गार्डन / ग्राउंड, तळजाई माता देवस्थान आणि दाट नागरी वस्तीच्या सीमेवर असल्याचे दिसते. एका बाजूला टेकडीचा नैसर्गिक हिरवा पट्टा, तर दुसऱ्या बाजूला निवासी इमारती आणि वस्ती आहे.

त्यामुळे हा भूखंड केवळ स्वतंत्र बांधकाम प्रकल्पाचा विषय नाही. तो टेकडीच्या नैसर्गिक उताराशी, पावसाळी पाण्याच्या प्रवाहाशी, जलमुरण क्षमतेशी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. उपग्रह प्रतिमा दिशादर्शक आहेत; मात्र कॉन्टूर प्लॅनमधील ११ मीटरचा उतार हा अधिकृत दस्तऐवजी मुद्दा असल्याने तो दुर्लक्षित करता येणार नाही.

मंजूर आराखड्यात मोठे बांधकाम; पण जलनिचरा कुठे?

उपलब्ध बांधकाम आराखड्यांमध्ये विविध विंग्स, FSI स्टेटमेंट, इमारतींची उंची, टेनमेंट्स, पार्किंग, बेसमेंट / लोअर ग्राउंड आणि ६ मीटर wide fire driveway अशा नोंदी दिसतात. तसेच Total Open Space Area 1221.00 sq.m. अशी नोंदही दिसते.

मात्र कागदावर ओपन स्पेस दाखवणे आणि प्रत्यक्षात ती जमीन पावसाचे पाणी मुरवण्यासाठी सक्षम राहणे यात मोठा फरक आहे. जर ओपन स्पेसच्या खाली बेसमेंट, पार्किंग, कठीण पृष्ठभाग, रॅम्प किंवा काँक्रीट संरचना येत असतील, तर ती जागा प्रत्यक्ष जलमुरणासाठी कितपत उपयुक्त राहते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तळजाईसारख्या उताराच्या भूभागावर पावसाचे पाणी वेगाने खाली येते. अशा ठिकाणी पाण्याचा वेग, दिशानिर्देश, मुरण क्षमता, साठा, नाल्याशी जोडणी आणि बेसमेंटमध्ये पाणी शिरण्याचा धोका यांचा स्वतंत्र अभ्यास झाला का, हे महत्त्वाचे आहे.

‘नो वॉटर’, जलप्रवाह आणि पाणवाटांचा खुलासा हवा

या प्रकरणात ‘नो वॉटर’ किंवा नैसर्गिक पाणवाटांचा मुद्दा स्थानिक पातळीवर सातत्याने उपस्थित केला जात आहे. उपलब्ध मोजणी आणि झोनिंग नकाशांमध्ये संबंधित भूखंडाची सीमारेषा, झोनिंग संदर्भ आणि महापालिकेच्या विकास योजना कार्यालयाच्या नोंदी दिसतात.

मात्र या भूखंडातील पावसाचे पाणी पूर्वी कोणत्या नैसर्गिक मार्गाने वाहत होते? त्या ठिकाणी झरे, पाणवाटा, नाले, उच्छवास किंवा पाण्याचे साठे होते का? झोन बदलताना किंवा बांधकाम मंजूर करताना या बाबींची स्वतंत्र नोंद घेण्यात आली का? या सर्वांचे स्पष्ट स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे.

कारण पाण्याचा मार्ग कागदावरून पुसता येतो; पण पावसाळ्यात पाणी स्वतःचा मार्ग शोधते. तो मार्ग अडवला, बुजवला किंवा त्यावर काँक्रीट टाकले, तर त्याचे परिणाम आसपासच्या घरांना, रस्त्यांना आणि पायथ्याच्या वस्त्यांना भोगावे लागू शकतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी सरकार ‘संविधान विरोधी’ असल्याचा वारंवार प्रत्यय.. एनडीए मित्र पक्षांनी वेळेत बोध घ्यावा ..!- काँग्रेसची टिका,एनडीए घटक पक्षांना इशारा..

शिक्षण मंत्र्याना वाचवण्यात मोदी सरकार'चा भ्रष्टाचारी चेहरा उघड ..काँग्रेस वरीष्ठ राज्य...

जनता दरबारच्या माध्यमातून ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडकरांशी संवाद

समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश पुणे : राज्याचे उच्च...