पुणे:भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकात्म स्वरूपाचे प्रतीक असलेल्या हरिहर संकल्पनेवर आधारित भव्य मंदिराची उभारणी अखिल मंडई मंडळाकडून करण्यात आली आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती, शिवपिंडी तसेच शिव-विष्णूच्या समन्वयाचे दर्शन मंदिरातून होत आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर साकारण्यात आले असून, देखाव्याची भव्यता भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मंदिरामध्ये हिंदू धर्मातील विविध पवित्र प्रतीकांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक मंदिराची रचना, धार्मिक प्रतीके आणि सजावटीच्या माध्यमातून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

