तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ८
विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज –
पुणे:
पुण्याचे हिरवे वैभव असलेल्या तळजाई टेकडीच्या छाताडावर आधीच बिल्डर लॉबीने ३० ते ४० फूट खोल डोंगर कापणी करून जीवघेणे वार केले आहेत. हे कमी म्हणून की काय, आता थेट राजकीय पातळीवर या टेकडीच्या पोटातून अजस्र भुयारी रस्ता आरपार घुसवण्याचा एक नवा अक्राळविक्राळ घाट घातला जात आहे
उद्यापासून सुरू होणाऱ्या महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये (General Body Meeting) पर्यावरण आणि टेकड्यांवरील संशयास्पद बांधकामांचा मुद्दा येणार असतानाच, लोकप्रतिनिधींकडूनच थेट तळजाईच्या पोटातून बोगदा (Tunnel Project) खणण्याची मागणी केली जात असल्याने, तळजाई टेकडी भविष्यात फक्त नावापुरतीच ‘बगीचा’ उरणार का, असा संतप्त सवाल सजग पुणेकर उपस्थित करत आहेत .
🔴 “डोंगर रहिवासी दाखवल्यामुळे प्रशासन हातबल!” — स्थायी समिती अध्यक्षांची अधिकृत कबुली
अधिकृत पत्रकार परिषदे नुसार, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाचा आणि बिल्डर लॉबीचा बुरखा पूर्णपणे फाडला आहे.त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर सांगतले की, “शहरातील तीव्र डोंगर उतारांचे आणि टेकड्यांचे क्षेत्र ‘निवासी’ दाखवून तिथे नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या आहेत का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे कागदावर रहिवासी झोन दाखवला तरी प्रत्यक्ष जागेवर डोंगर फोडण्याची किंवा नैसर्गिक उतार बदलण्याची परवानगी देता येत नाही. या प्रकरणांमध्ये महापालिका प्रशासन हातबल ठरत असून जिल्हाधिकारी कार्यालय उत्खननाचे पास देत आहे.”अध्यक्षांनी या गंभीर विषयाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून, सॅटेलाईट आणि ‘सी-डॅक’ (C-DAC) च्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास करण्याची अधिकृत मागणी केली आहे.दुसरीकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या अहवालात अशाच पद्धतीने हनुमान टेकडी, पर्वती, धनकवडी, आंबेगाव पठार, बिबवेवाडी, कात्रज, हडपसर रामटेकडी येथील टेकड्यांवर सुमारे ७० टक्के पुणे वसलेले आहे असे म्हटले आहे.म्हणजे डोंगर उताराचा एकास पाच चा रेशिओ चा नियम झुगारून शेकडो बांधकामांच्या परवानग्या महापालिकेने आजवर दिलेल्या आहेत याचीच हि कबुली आहे.आता हे सारे लोकांना राहण्यासाठी प्रेमाने बांधकाम विभागाने केले कि काही लोभाने केले हे मात्र खुद्द त्यांनाच ठाऊक असणार आहे .
🔴 नवा राजकीय डाव: तळजाईच्या काळजात ‘बोगद्याची’ निविदा काढण्याचा घाट!
स्थायी समिती अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे डोंगर कापणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत असतानाच, दुसरीकडे नगरसेवक महेश नानासाहेब वाबळे यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तळजाई टेकडी ते हिंगणे (सिंहगड रस्ता) दरम्यान बोगदा तयार करण्याचे मागणी पत्र अधिकृतपणे सादर केले आहे.
सातारा रस्ता ते सिंहगड रस्ता अंतर अवघ्या १० मिनिटांवर आणण्याचा वरवर गोड वाटणारा युक्तिवाद या पत्रात केला आहे.मात्र, हा बोगदा म्हणजे तळजाई टेकडीच्या पोटात थेट ब्लास्टिंग (डोंगर पोखरणे) करून संपूर्ण सहकारनगर,तळजाई पठार आणि हिंगणे परिसराचे भू-तांत्रिक स्थैर्य (Geotechnical Safety) कायमचे उद्ध्वस्त करण्याचा अधिकृत परवाना ठरणार आहे!
🔴 हरवणार तळजाई चे विहंगम रूप; वाढत्या धोक्याचा उघडा आहे पुरावा!
काही ड्रोन छायाचित्रांमध्ये तळजाई टेकडीचे विहंगम रूप स्पष्ट दिसत आहे. एका बाजूला विणकर सभागृह ते थेट तळजाई माथा या पूर्वेकडील प्रचंड चढाईच्या रस्त्याच्या दक्षिण बाजूला आधीच ११ मीटर (सुमारे ३६ फूट) खोल तीव्र डोंगर खोदाई करून ठेवली आहे. तर पश्चिमेकडे हिंगणे खुर्द (सर्व्हे नं. २३/१) भागातून वेगवेगळ्या प्रकल्पांनी डोंगर आधीच पोखरला आहे.
आता जर या दोन्ही तीव्र चढाच्या टोकांना जोडणारा बोगदा डोंगराच्या पोटातून आरपार काढला, तर संपूर्ण परिसरातील भूगर्भातील पाण्याचे झरे कायमचे कोरडे पडतील आणि जोरदार पावसात लोकवस्तीला भूस्खलनाचा थेट धोका निर्माण होईल. उद्याच्या मुख्य सभेमध्ये या संपूर्ण प्रकरणावर आता महापालिका काय भूमिका घेणार ,कि डोळेझाक करते याकडे तळजाई आणि एकूणच निसर्ग प्रेमींचे लक्ष लागले आहे.

