ऑफिसमधून बाहेर पडताच दोघांचा हल्ला; दोन दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याचा आरोप, लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर ऑफिसमधून बाहेर पडताच कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लोणकर हे बुधवारी दुपारी ऑफिसमधून बाहेर पडून आपल्या गाडीकडे जात असताना गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे हे दोघे कोयता घेऊन त्यांच्या दिशेने धावत आले. हल्लेखोर आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच लोणकर यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात आले.
हल्ल्यानंतर लोणकर यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी गजानन गुलाब गायकवाड याने लोणकर यांची गाडी अडवून चार ते पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बंदुकीचा धाक दाखवत पैसे मागण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. “तुझा सप्लायरचा व्यवसाय नीट चालतोय, पैसे द्यायला काय अडचण नाही,” असे म्हणत खंडणीची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, खंडणीच्या तक्रारीचा तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची भूमिका याचा सखोल तपास करण्यात येत आहे.

