५ ऑक्टोबरपासून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौरही जर्मनी दौऱ्यावर
पुणे : पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रजा आणि परदेश दौऱ्यांमुळे पुढील काही दिवस महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेची कसोटी लागणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे सध्या शहरात असले तरी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे रजेवर आहेत, तर अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर जपान दौऱ्यावर आहेत. ५ ऑक्टोबरपासून आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर जर्मनी दौऱ्यावर जाणार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपलब्धता आणखी कमी होणार आहे.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे १२ ऑक्टोबरपर्यंत रजेवर असल्याची माहिती आहे. प्रजीत नायर हे जपानमधील ओकायामा परिषदेसाठी गेले असून ते ५ ऑक्टोबर रोजी परत येणार आहेत. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हेदेखील त्यांच्यासोबत जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला स्थायी समितीची मंजुरी असून पुणे-ओकायामा मैत्री व सहकार्य कराराच्या २०व्या वर्षानिमित्त हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर १ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठकीसाठी जाणार असल्याने त्या दिवशी आयुक्त नवल किशोर राम वगळता महापालिकेतील प्रमुख वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष मुख्यालयात उपलब्ध नसण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर २, ३ आणि ४ ऑक्टोबर शासकीय सुट्ट्या आहेत. ५ ऑक्टोबरपासून आयुक्त राम आणि कौर यांचा जर्मनी दौरा नियोजित आहे. या कालावधीत वरिष्ठ पातळीवरील निर्णयप्रक्रिया, समन्वय आणि आपत्कालीन प्रतिसादाची जबाबदारी कोणाकडे राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
सामान्यतः आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अनुपस्थित असताना शहर अभियंत्यांकडे अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय कामांचा समन्वय राहतो. मात्र शहर अभियंता अनिरुद्ध पावसकरही जपान दौऱ्यावर असल्याने या काळातील पर्यायी प्रशासकीय व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
याचवेळी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. आयुक्तांनी नवीन कामे, निविदा आणि निधीशी संबंधित प्रक्रियांबाबत अधिकाऱ्यांना स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. अशा संवेदनशील प्रशासकीय कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती राहणार असल्याने दैनंदिन निर्णयप्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद व्यवस्थेची कार्यक्षमता कसोटीवर येणार आहे.

