श्रमदान करत विद्यार्थ्यांनी केले स्वच्छता अभियान
आळंदी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती स्तंभ परिसरात आज विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. महात्मा गांधी स्वतः स्वच्छतेसाठी श्रम करीत असत. त्यांच्या याच विचारांचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन स्मृती स्तंभ परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता ही केवळ सांगण्याची गोष्ट नसून त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन श्रम करण्याची गरज आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे केंद्र, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल, डुडुळगाव (आळंदी) यांच्या वतीने हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्मृती स्तंभ परिसर तसेच परिसरातील घाटाची स्वच्छता केली. मुख्याध्यापक अतुल पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी नववी आणि दहावी मधील १५० मुलांनी अभियानात भाग घेतला.
उद्या, शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता याच ठिकाणी महात्मा गांधींच्या स्मृती स्तंभाला पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष सौ. सुजाता तापकीर, आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्रमदानातून स्वच्छता आणि विचारांमधून समाजजागृती करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
प्रेरणा देणारा रक्षा विसर्जन स्मृती स्तंभ !
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे भारतातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले होते. त्यातील एका कलशातील अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ रोजी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ इंद्रायणी नदीकाठी रक्षा विसर्जन स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे नेतृत्व पुण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन काँग्रेस नेते हरिभाऊ पाठक यांनी केले होते. आळंदी हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने स्थानिक दिंड्यांचे प्रमुख, देवस्थानचे विश्वस्त आणि शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. अभंग आणि भजनांच्या गायनातून महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.
या स्मृती स्तंभावर महात्मा गांधींचा महत्त्वपूर्ण संदेशही कोरण्यात आला आहे. “मी कोणालाही भिणार नाही. मी फक्त देवाला घाबरेन. मी कोणाचेही वाईट चिंतणार नाही. मी कोणाकडूनही अन्याय सहन करणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याला विरोध करताना होणारा सर्व त्रास सहन करेन,” असा निर्धार रोज सकाळी करण्याचा गांधीजींचा संदेश आहे. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गांधीजींच्या या विचारांची आठवण विद्यार्थ्यांना आणि समाजाला करून देण्यात आली.

