रस्ता ‘अरुंद व खाजगी’ असल्याचा बिल्डरचाच बोर्ड; तरीही डोंगर फोडीला मंजुरी; हिंगणे खुर्द सर्व्हे नंबर २३/१ मधील प्रकल्पांचा जीपीएस पुराव्यांसह स्फोट!
विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट (भाग-५)
पुणे:
तळजाई डोंगर रांगांमधील धनकवडी-सहकारनगर येथील बेकायदेशीर डोंगर उतार माथ्यावर कॉंक्रीटीकर्णाचे हल्ले होत असताना पाठोपाठ आता याच तळजाई डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हिंगणे खुर्द (वडगाव बुद्रुक, महादेव नगर, आनंद विहार कॉलनी रोड) सर्व्हे नंबर २३/१ आणि २३/१ क मध्ये तळजाई ला नामशेष करण्याचे कारस्थाने समोर येत आहेत. या डोंगर उतारावर सर्व नियम धाब्यावर बसवून निसर्गाचा गळा घोटून उभे राहिलेले ‘सॉलिडॅरिटी’ (Solidarity), ‘व्हाइटस्वान’ (White Swan) आणि ‘एम.टी.एम.’ (MTM) हे अक्राळविक्राळ प्रकल्प म्हणजे तळजाईला लागलेला काँक्रीटीकरणाचा जीवघेणा कॅन्सर असल्याचे उघड झाले आहे.या प्रकल्पांच्या मंजुरी, रस्त्याची अधिकृत रुंदी, डोंगर खोदाईची परवानगी आणि सुरक्षा उपायांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
जीपीएस नोंदींमध्ये १९ मीटर उंचीचा फरक
स्थळपरीक्षणादरम्यान मोबाइल जीपीएस अॅपमध्ये टेकडीच्या खालच्या भागाची उंची समुद्रसपाटीपासून ५८७ मीटर, तर वरच्या बाजूला असलेल्या बांधकाम परिसराची उंची ६०६ मीटर नोंदवण्यात आली. या दोन ठिकाणांमध्ये सुमारे १९ मीटर अर्थात ६२ फुटांचा उंचीतील फरक दिसून येतो.
मात्र मोबाइल जीपीएसमधील उंचीच्या नोंदींमध्ये तांत्रिक त्रुटी असू शकतात. त्यामुळे उताराचे अचूक प्रमाण, काँटूर रेषा आणि खोदाईची खोली निश्चित करण्यासाठी महापालिकेने परवानाधारक भू-मापक तसेच भूगर्भतज्ज्ञामार्फत अधिकृत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि दगड काढण्यात आल्याचे, उतारावर संरक्षक दगडी भिंती उभारण्यात आल्याचे आणि काही ठिकाणी बांधकामासाठी डोंगराचा भाग सरळ कापण्यात आल्याचे दिसते. पावसाळ्यामध्ये अशा उतारावर माती खचणे, पाणी साचणे किंवा संरक्षक भिंतींवर अतिरिक्त दबाव येण्याचा धोका आहे का, याची तांत्रिक तपासणी होणे गरजेचे आहे.
🔴 पावसाळ्यात भूस्खलनाचा आणि सुरक्षिततेचा भीषण धोका!
अधिकृत ऑन-साइट जीपीएस तांत्रिक मोजणीनुसार, या आनंद विहार परिसरात टेकडीच्या पायथ्याची उंची ५८७ मीटर (Altitude: 587 m) नोंदवली गेली असून, टेकडीच्या वरच्या बाजूला उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीपाशी ही उंची ६०६ मीटर (Altitude: 606 m) एवढी अधिकृतपणे ऑन-रेकॉर्ड आली आहे. म्हणजेच अवघ्या काही मीटरच्या अंतरात तब्बल १९ मीटरचा (६२ फुटांचा) तीव्र नैसर्गिक डोंगरउतार (Contour Slope) आहे . युनिफाइड डीसीपीआर (UDCPR) नियमांचे उघड उल्लंघन करून इथे अवाढव्य पोकलेन आणि मशीन लावून उभी डोंगर कापणी सुरू आहे. या जीवघेण्या खोदाईमुळे पावसाळ्यात भूस्स्लन होऊन धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती दिसते आहे.
🔴 ‘रस्ता अरुंद’ असल्याची विकासकाची स्वतःचीच कबुली; मसुदा दाबून मंजुरी!
या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर ‘आनंद विहार-१’ नावाचा जो अधिकृत फलक लावण्यात आला आहे, त्यावर विकासकाने स्वतः अधिकृतपणे लिहिले आहे की, ‘हा रस्ता खाजगी व अरुंद असल्याने येथे वाहने लावण्यास सक्त मनाई आहे.’ महापालिकेच्या बांधकाम विकास नियमांनुसार, डोंगर पायथ्याशी एवढ्या मोठ्या हाय-राईझ इमारतीला मंजुरी देण्यासाठी समोरचा मुख्य रस्ता किमान ९ ते १२ मीटर रुंद असणे कायद्याने बंधनकारक आहे . प्रत्यक्ष बिल्डरच्याच बोर्डावर रस्ता ‘अरुंद’ असल्याचे मान्य केले असताना, महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कोणत्या खोट्या रस्त्यांच्या रुंदीच्या आधारे या प्रकल्पांना मंजुरी दिली, याचे उत्तर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाला द्यावे लागेल.
या गंभीर तांत्रिक आणि पर्यावरणीय घोटाळ्याची दखल घेऊन, सदर सर्व्हे नंबर २३/१ मधील बेकायदेशीर डोंगर फोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि या धोकादायक बांधकाम प्रकल्पांना तातडीने ‘स्टॉप वर्क’ (Stop Work) नोटीस बजावून हे बांधकाम थांबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वाणिज्य व उद्योग विभागाचे अध्यक्ष भरत ब. सुराणा यांनीही थेट विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे .

