पुण्यात फटाके फोडताना नियम पाळा; ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची जाहीर सूचना
पुणे, दि. ६ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नागरिकांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडताना इतर नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर अधिसूचित शांतता क्षेत्रांमधील नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या स्वाक्षरीने ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडताना निर्बंध
महापालिकेच्या सूचनेनुसार सार्वजनिक रस्ते, चौक, गल्ल्या, पदपथ, उद्याने, टेरेस, बाल्कनी तसेच अन्य ठिकाणी नागरिकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फोडू नयेत.
फटाक्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शांतता क्षेत्रांमध्ये नियमांचे पालन आवश्यक
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि इतर अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडण्यासंबंधीच्या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक आहे.
विशेषतः रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना ध्वनी व वायू प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनिवर्धकांसाठी परवानगी आवश्यक
सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि इतर उत्सवांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेणे आणि परवानगीतील अटींचे पालन करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमभंग झाल्यास कारवाई
फटाके आणि ध्वनिवर्धकांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करावा, असे प्रशासनाने सुचविले आहे.
जाहीर सूचनेतील निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायदे आणि नियमांनुसार संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.


