‘LEED Platinum’ पूर्व-प्रमाणित प्रकल्पासाठी निधी; बालेवाडी बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये फ्युचर-रेडी ऑफिस स्पेस उभारणार
पुणे : पुण्यातील बालेवाडी बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये उभारण्यात येणाऱ्या सुमारे १.१ दशलक्ष चौरस फूट ‘ग्रेड ए’ कार्यालयीन प्रकल्पासाठी डीबीएस बँक इंडियाने के रहेजा कॉर्पच्या स्पेशल पर्पज व्हेईकलला ५२० कोटी रुपयांचे बांधकाम वित्तसाहाय्य मंजूर केले आहे. हा प्रकल्प ‘LEED Platinum’ पूर्व-प्रमाणित असून पर्यावरणपूरक आणि भविष्यातील व्यावसायिक गरजांना अनुरूप अशा पद्धतीने विकसित केला जाणार आहे.
बालेवाडी परिसर पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक मानला जात असून, या भागात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि विविध उद्योगांच्या विस्तारामुळे उच्च दर्जाच्या कार्यालयीन जागांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर के रहेजा कॉर्पचा हा प्रकल्प अत्याधुनिक सुविधा, कार्यक्षम पायाभूत रचना आणि पर्यावरणपूरक बांधकाम मानकांवर भर देणार आहे.
प्रकल्पाच्या बांधकामापासून ते दीर्घकालीन वापरापर्यंत ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय शाश्वतता आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेवर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डीबीएस बँक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंट्री हेड, कॉर्पोरेट बँकिंग (लार्ज अँड मिडकॅप) शंतनू मित्रा यांनी सांगितले की, कंपन्या आपल्या विस्तार योजनांमध्ये पर्यावरणपूरक आणि दर्जेदार कार्यालयीन जागांना वाढते प्राधान्य देत आहेत. पुण्यातील या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी के रहेजा कॉर्पसोबत काम करताना आनंद होत असून, शाश्वत विकासाला पाठबळ देणारे वित्तीय पर्याय उपलब्ध करून देण्यावर बँकेचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
के रहेजा कॉर्पचे एमडी आणि सीईओ विनोद रोहिरा यांनी बालेवाडी हे पुण्याच्या व्यावसायिक विकासातील महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे सांगितले. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि वेगाने वाढणाऱ्या उद्योगांना उच्च दर्जाची प्रतिभा आकर्षित करण्यासाठी आधुनिक व दर्जेदार कार्यालयीन वातावरणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोहिरा यांच्या मते, पर्यावरणपूरकता हा के रहेजा कॉर्पच्या प्रकल्पांमध्ये केवळ अतिरिक्त घटक नसून कंपनीच्या बांधकाम पद्धतीचाच महत्त्वाचा भाग आहे. डीबीएस बँक इंडियाची शाश्वत आणि उच्च दर्जाच्या प्रकल्पांविषयीची भूमिका कंपनीच्या विचारांशी सुसंगत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट विस्तार, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची वाढ आणि दर्जेदार कार्यालयीन जागांची मागणी यामुळे गुंतवणुकीला चालना मिळत आहे. पुण्याची मजबूत तंत्रज्ञान परिसंस्था, उपलब्ध कुशल मनुष्यबळ आणि सुरू असलेला पायाभूत सुविधांचा विकास यामुळे शहराची प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत होत आहे.
डीबीएस बँक इंडियाने या व्यवहाराला भारतातील शहरी आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या तसेच पर्यावरणपूरक उद्दिष्टांना पाठबळ देणाऱ्या प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्याच्या धोरणाचा भाग म्हटले आहे.

