पुणे-
एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या विषयावरील संवाद सत्र शनिवारी सायंकाळी फाऊंडेशनच्या नवी पेठ येथील प्रशिक्षण सभागृहात उत्साहात पार पडले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान आणि सत्यशोधनाच्या प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना विवेक सावंत म्हणाले की, ‘तथ्यच बनावट असेल तर सत्य शोधणार कसे ? हा प्रश्न असून आपल्याला ज्ञान ग्रहणातून सत्याकडे गेले पाहिजे.सत्याचा पाया भुसभुशीत झाला असून वस्तुनिष्ठ सत्याचा विलय होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.गोबेल्सनीती,भावनिक आवाहन आणि संमोहन यामुळे सत्य आणि असत्य यातील फरक धूसर झाला आहे.यातून अराजकतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळे हल्लेखोरांचे काम सोपे झाले आहे तर संरक्षकांचे काम अवघड झाले आहे.डीप फेक व्हिडीओ ओळखण्याची पद्धत विकसित झाली पाहिजे आणि अशा व्हिडिओंवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.
ए आय विरोधात अमेरिकेसह जगात विरोधाचा सूर उमटत आहे.डेटा सेंटर ला विरोध होत आहे.भारतात देखील नागरी समाजाने चिंता व्यक्त केली आहे.या तंत्रज्ञानाला आंदोलने थांबवू शकत नाहीत.मात्र,त्या प्रगतीला योग्य आकार देऊ शकतील.ए आय ने मानवजातीची सेवा करावी पण मानवजातीची जागा घेऊ नये,अशी मागणी होत आहे.जनआंदोलन ,दबाव गट,चिंतन गट ,डिजिटल हस्तक्षेप,कायदेशीर कारवाई असे एआय विरोधात प्रतिकाराचे स्वरूप असू शकेल.नागरी समाज,धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन एआय बाबत नियामक पद्धत निर्माण केली पाहिजे.सतत सार्वजनिक दबाव येत राहिला पाहिजे.
ते पुढे म्हणाले,’कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे उत्पादन आणि प्रसारण अभूतपूर्व वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि विवेकवादी दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन असून त्याचा वापर समाजहितासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी कसा करायचा, हे ठरविण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.
त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोगांबरोबरच त्यातील मर्यादा, चुकीची माहिती पसरविण्याची शक्यता आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला. सत्यशोधनाची परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या विचारांचा संदर्भ दिला.संवाद सत्रात उपस्थितांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, माध्यमे, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. विवेक सावंत यांनी या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत उपस्थितांशी मुक्त संवाद साधला.
या कार्यक्रमाला सुभाष वारे,सुभाष लोमटे,उपेंद्र टण्णू यांच्यासह पुरोगामी, विवेकी चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील आव्हाने आणि संधी यांविषयी व्यापक चर्चा घडून आली.कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

