पुणे नगर वाचन मंदिरातर्फे व्याख्यानाचे आयोजन
पुणे : आज चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण झाली आहे. असहिष्णू वातावरणात चांगला विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद बुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक अधोगतीचे लक्षण आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १३) आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. जोशी बोलत होते. ‘आचार्य अत्रे : व्यक्ती आणि कर्तृत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह स्वाती ताडफळे व्यासपीठावर होते.
प्रा. जोशी म्हणाले, विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षांवर आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटलेली आहे. साहित्य, राजकारण आणि समाजकारणाच्या ज्या ज्या प्रवाहात आचार्य अत्रे शिरले तो तो प्रवाह अत्र्यांनी केवळ गतिमान केला नाही तर त्यांच्या कर्तृत्वाचे असंख्य तरंग त्यांनी त्या प्रवाहात निर्माण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती. आचार्य अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात दिसले. आचार्य अत्रे साहित्याच्या आणि वक्तृत्वाच्या नभांगणातील लखलखते नक्षत्र होते. वक्तृत्वाच्या रणांगणावर पराक्रम करण्यासाठीची सारी आयुधे त्यांच्याकडे होती. त्या आयुधांचा त्या त्याप्रसंगी वापर करण्यात हे वाकबगार होते. त्यांच्या विनोदाने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्राला केवळ हसविले नाही तर रसरशीत जीवनदृष्टीआणि सौंदर्यदृष्टी दिली. मराठीपणातल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. कोतेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायला शिकवले. दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्यासाठीची गुणग्राहकता शिकवली. जीवनाच्या लढाईत हेतुपुरस्सर अडथळ्यांचे डोंगर उभे करणाऱ्यांशी दोन हात करण्याचे धारिष्ट दिले. आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्या प्रांतिक आणि भाषिक अस्मितेची विटंबना करणार असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी रणशिंग कसे फुंकायचे याचा वस्तुपाठ अत्रे यांनी घालून दिला. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्याज्य मानता कामा नये हा संस्कार केला.
स्वागतपर प्रास्ताविक विक्रम भट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पांडे यांनी केले तर आभार ॲड. रवींद्र चौधरी यांनी मानले.

