‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडला मुलाखतीतून
पुणे : कलेच्या क्षेत्रातील रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य या गोष्टी शिकण्याची जिद्द होती परंतु अनेक ठिकाणांहून नकार मिळाला तरी शिकण्याची उपजत दृष्टी असल्यामुळे कलाकारांची कला न्याहाळत शिकत गेलो आणि जिद्दीने त्या आत्मसात केल्या. शाहिरी हे मनोरंजनाचे किंवा पैसा मिळविण्याचे साधन नव्हे तर समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. या हेतूने शाहिरीचे कार्यक्रम करीत राहिलो. परंतु शाहीर परिषदेचा अध्यक्ष होऊन देखील परिषदेच्या व्यासपीठावर पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली नाही हे दु:ख आजही मनात आहे, अशा भावना ज्येष्ठ कलावंत, शाहीर दादा पासलकर यांनी व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आणि आडकर फौंडेशनतर्फे ‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडणाऱ्या मुलाखतीवर आधारित अभिनव कार्यक्रमाचे रविवारी (दि. १४) आयोजन करण्यात आले होते. त्यात अभिनय व शाहिरी या कला जोपासून आपले आयुष्य त्याच्यासाठी झोकून देऊन समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे दादा पासलकर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी पासलकर बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी पासलकर यांच्याशी संवाद साधला. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.
कलेच्या क्षेत्रातील लहानपणापासून सुरू झालेली वाटचाल उलगडून सांगितल्या नंतर दादा पासलकर पुढे म्हणाले, लोककलेचे बीज माझ्यात शालेय वयापासूनच रुजले. त्यातूनच सातवीत असताना पहिला पोवाडा लिहिला. पुढे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यक्रमही आवर्जून पाहत असे. त्यातून या कलेविषयी आवड आणि आस्था निर्माण झाली. शाहिरी आत्मसात करताना त्याचा अभ्यास, पाठांतर, सुरात पोवाडा म्हणणे या गोष्टी प्रयत्नाने शिकलो. याच बरोबरीने कला क्षेत्रातील पडद्यामागील कला याविषयी देखील आकर्षण निर्माण झाले. यातूनच वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या कला आवडीने शिकत गेलो. अगदी गमभनपासून केलेली सुरुवात परिपक्व होईपर्यंत आत्मसात केली. यातही अभ्यास, प्रात्यक्षिके यावर जोर दिला. या सर्व कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी घडविले.
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आठवतांना स्वरराज छोटा गंधर्व यांच्या साठीनिमित्त आयोजित संगीत सौभद्र नाट्यप्रयोगात त्यांची रंगभूषा करण्याची संधी मिळाली आणि या प्रयोगाला रसिकांनी भरभरून दाद देत त्यांचा केलेला सन्मान हा प्रसंग पासलकर यांनी आवर्जून सांगितला.
देशपरदेशातील दौऱ्यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. त्याविषयी बोलताना पासलकर म्हणाले, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना नाटकाच्या नेपथ्यामधील देव्हारा बस स्टँडवरच राहिला. आता तो हरवला अशा समजुतीने एक महिन्याचा दौरा पूर्ण करून परत त्याच स्टँडवर आलो तेव्हा जेथे देव्हारा विसरला होता तेथेच तो सुरक्षित होता हे कौतुकास्पद वाटले.
युवा पिढीला मार्गदर्शन करताना दादा पासलकर म्हणाले, आजच्या पिढीला शिक्षण पूर्ण न करताच कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करण्याची घाई झालेली जाणवते. आधी पैसे किती, मानधन किती अशा विचारणा केल्या जातात. आमच्या काळात आम्ही आधी काम केले आणि मग मानधन मिळविले. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करताना त्या क्षेत्राचा अभ्यास होणे, कष्ट करणे ही प्रवृत्ती सांभाळली तरच यश मिळेल. ही शिस्त आजही मुंबईत जाणवते परंतु पुण्यात याविषयी आस्था जाणवत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या आयुष्यात भाऊ, पत्नी, मुलांची साथ लाभली परंतु एक शाहीर, कलाकार म्हणून ख्याती मिळविली तरी एखादे वाद्य शिकायचे राहून गेले हे मनात असल्याने आजही उत्साहाने हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेत आहे. आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत रहावे ही इच्छा असल्याचे सांगून पासलकर म्हणाले, माझ्या दोन नाकपुड्या म्हणजे जाधव नाट्यसंसार आणि महाराष्ट्र शाहीर परिषद असून मुखात घरचे देतील ते घास अशी कृतार्थ भावना आहे.
प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले यांनी जुन्या जाणत्या कलावंतांचे आयुष्य पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल या हेतूने मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा जीवनप्रवास समाजापुढे यावा हा हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन आशुतोष नेर्लेकर यांनी केले.

