Home Blog Page 15

वस्तुनिष्ठ सत्याचा विलय झाल्यास अराजकतेचा धोका :विवेक सावंत 

पुणे-

एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या विषयावरील संवाद सत्र शनिवारी सायंकाळी फाऊंडेशनच्या नवी पेठ येथील प्रशिक्षण सभागृहात उत्साहात पार पडले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान आणि सत्यशोधनाच्या प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना विवेक सावंत म्हणाले की, ‘तथ्यच बनावट असेल तर सत्य शोधणार कसे ? हा प्रश्न असून आपल्याला ज्ञान ग्रहणातून सत्याकडे गेले पाहिजे.सत्याचा पाया भुसभुशीत झाला असून वस्तुनिष्ठ सत्याचा विलय होणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.गोबेल्सनीती,भावनिक आवाहन आणि  संमोहन यामुळे सत्य आणि असत्य यातील फरक धूसर झाला आहे.यातून अराजकतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळे हल्लेखोरांचे काम सोपे झाले आहे तर संरक्षकांचे काम अवघड झाले आहे.डीप फेक व्हिडीओ ओळखण्याची पद्धत विकसित झाली पाहिजे आणि अशा व्हिडिओंवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. 

ए आय विरोधात अमेरिकेसह जगात विरोधाचा सूर उमटत आहे.डेटा सेंटर ला विरोध होत आहे.भारतात देखील नागरी समाजाने चिंता व्यक्त केली आहे.या तंत्रज्ञानाला आंदोलने थांबवू शकत नाहीत.मात्र,त्या प्रगतीला योग्य आकार देऊ शकतील.ए आय ने मानवजातीची सेवा करावी पण मानवजातीची जागा घेऊ नये,अशी मागणी होत आहे.जनआंदोलन ,दबाव गट,चिंतन गट ,डिजिटल हस्तक्षेप,कायदेशीर कारवाई असे एआय विरोधात प्रतिकाराचे स्वरूप असू शकेल.नागरी समाज,धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन एआय बाबत नियामक पद्धत निर्माण केली पाहिजे.सतत सार्वजनिक दबाव येत राहिला पाहिजे. 

ते पुढे म्हणाले,’कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे उत्पादन आणि प्रसारण अभूतपूर्व वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि विवेकवादी दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन असून त्याचा वापर समाजहितासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी कसा करायचा, हे ठरविण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.

त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोगांबरोबरच त्यातील मर्यादा, चुकीची माहिती पसरविण्याची शक्यता आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला. सत्यशोधनाची परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या  विचारांचा संदर्भ दिला.संवाद सत्रात उपस्थितांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, माध्यमे, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. विवेक सावंत यांनी या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत उपस्थितांशी मुक्त संवाद साधला.

या कार्यक्रमाला सुभाष वारे,सुभाष लोमटे,उपेंद्र टण्णू यांच्यासह पुरोगामी, विवेकी चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील आव्हाने आणि संधी यांविषयी व्यापक चर्चा घडून आली.कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही : प्रा मिलिंद जोशी

पुणे नगर वाचन मंदिरातर्फे व्याख्यानाचे आयोजन

पुणे : आज चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण झाली आहे. असहिष्णू वातावरणात चांगला विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद बुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक अधोगतीचे लक्षण आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १३) आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. जोशी बोलत होते. ‘आचार्य अत्रे : व्यक्ती आणि कर्तृत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह स्वाती ताडफळे व्यासपीठावर होते.

प्रा. जोशी म्हणाले, विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षांवर आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटलेली आहे. साहित्य, राजकारण आणि समाजकारणाच्या ज्या ज्या प्रवाहात आचार्य अत्रे शिरले तो तो प्रवाह अत्र्यांनी केवळ गतिमान केला नाही तर त्यांच्या कर्तृत्वाचे असंख्य तरंग त्यांनी त्या प्रवाहात निर्माण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती. आचार्य अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात दिसले. आचार्य अत्रे साहित्याच्या आणि वक्तृत्वाच्या नभांगणातील लखलखते नक्षत्र होते. वक्तृत्वाच्या रणांगणावर पराक्रम करण्यासाठीची सारी आयुधे त्यांच्याकडे होती. त्या आयुधांचा त्या त्याप्रसंगी वापर करण्यात हे वाकबगार होते. त्यांच्या विनोदाने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्राला केवळ हसविले नाही तर रसरशीत जीवनदृष्टीआणि सौंदर्यदृष्टी दिली. मराठीपणातल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. कोतेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायला शिकवले. दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्यासाठीची गुणग्राहकता शिकवली. जीवनाच्या लढाईत हेतुपुरस्सर अडथळ्यांचे डोंगर उभे करणाऱ्यांशी दोन हात करण्याचे धारिष्ट दिले. आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्या प्रांतिक आणि भाषिक अस्मितेची विटंबना करणार असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी रणशिंग कसे फुंकायचे याचा वस्तुपाठ अत्रे यांनी घालून दिला. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्याज्य मानता कामा नये हा संस्कार केला.

स्वागतपर प्रास्ताविक विक्रम भट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पांडे यांनी केले तर आभार ॲड. रवींद्र चौधरी यांनी मानले.

शाहिरी हे समाजप्रबोधनाचे माध्यम : दादा पासलकर

‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडला मुलाखतीतून

पुणे : कलेच्या क्षेत्रातील रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य या गोष्टी शिकण्याची जिद्द होती परंतु अनेक ठिकाणांहून नकार मिळाला तरी शिकण्याची उपजत दृष्टी असल्यामुळे कलाकारांची कला न्याहाळत शिकत गेलो आणि जिद्दीने त्या आत्मसात केल्या. शाहिरी हे मनोरंजनाचे किंवा पैसा मिळविण्याचे साधन नव्हे तर समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. या हेतूने शाहिरीचे कार्यक्रम करीत राहिलो. परंतु शाहीर परिषदेचा अध्यक्ष होऊन देखील परिषदेच्या व्यासपीठावर पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली नाही हे दु:ख आजही मनात आहे, अशा भावना ज्येष्ठ कलावंत, शाहीर दादा पासलकर यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आणि आडकर फौंडेशनतर्फे ‘नकाराला भिडताना’ : एक जिद्दीचा प्रवास उलगडणाऱ्या मुलाखतीवर आधारित अभिनव कार्यक्रमाचे रविवारी (दि. १४) आयोजन करण्यात आले होते. त्यात अभिनय व शाहिरी या कला जोपासून आपले आयुष्य त्याच्यासाठी झोकून देऊन समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे दादा पासलकर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी पासलकर बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी पासलकर यांच्याशी संवाद साधला. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.

कलेच्या क्षेत्रातील लहानपणापासून सुरू झालेली वाटचाल उलगडून सांगितल्या नंतर दादा पासलकर पुढे म्हणाले, लोककलेचे बीज माझ्यात शालेय वयापासूनच रुजले. त्यातूनच सातवीत असताना पहिला पोवाडा लिहिला. पुढे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यक्रमही आवर्जून पाहत असे. त्यातून या कलेविषयी आवड आणि आस्था निर्माण झाली. शाहिरी आत्मसात करताना त्याचा अभ्यास, पाठांतर, सुरात पोवाडा म्हणणे या गोष्टी प्रयत्नाने शिकलो. याच बरोबरीने कला क्षेत्रातील पडद्यामागील कला याविषयी देखील आकर्षण निर्माण झाले. यातूनच वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या कला आवडीने शिकत गेलो. अगदी गमभनपासून केलेली सुरुवात परिपक्व होईपर्यंत आत्मसात केली. यातही अभ्यास, प्रात्यक्षिके यावर जोर दिला. या सर्व कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी घडविले.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आठवतांना स्वरराज छोटा गंधर्व यांच्या साठीनिमित्त आयोजित संगीत सौभद्र नाट्यप्रयोगात त्यांची रंगभूषा करण्याची संधी मिळाली आणि या प्रयोगाला रसिकांनी भरभरून दाद देत त्यांचा केलेला सन्मान हा प्रसंग पासलकर यांनी आवर्जून सांगितला.

देशपरदेशातील दौऱ्यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. त्याविषयी बोलताना पासलकर म्हणाले, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना नाटकाच्या नेपथ्यामधील देव्हारा बस स्टँडवरच राहिला. आता तो हरवला अशा समजुतीने एक महिन्याचा दौरा पूर्ण करून परत त्याच स्टँडवर आलो तेव्हा जेथे देव्हारा विसरला होता तेथेच तो सुरक्षित होता हे कौतुकास्पद वाटले.

युवा पिढीला मार्गदर्शन करताना दादा पासलकर म्हणाले, आजच्या पिढीला शिक्षण पूर्ण न करताच कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करण्याची घाई झालेली जाणवते. आधी पैसे किती, मानधन किती अशा विचारणा केल्या जातात. आमच्या काळात आम्ही आधी काम केले आणि मग मानधन मिळविले. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करताना त्या क्षेत्राचा अभ्यास होणे, कष्ट करणे ही प्रवृत्ती सांभाळली तरच यश मिळेल. ही शिस्त आजही मुंबईत जाणवते परंतु पुण्यात याविषयी आस्था जाणवत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या आयुष्यात भाऊ, पत्नी, मुलांची साथ लाभली परंतु एक शाहीर, कलाकार म्हणून ख्याती मिळविली तरी एखादे वाद्य शिकायचे राहून गेले हे मनात असल्याने आजही उत्साहाने हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेत आहे. आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत रहावे ही इच्छा असल्याचे सांगून पासलकर म्हणाले, माझ्या दोन नाकपुड्या म्हणजे जाधव नाट्यसंसार आणि महाराष्ट्र शाहीर परिषद असून मुखात घरचे देतील ते घास अशी कृतार्थ भावना आहे.

प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले यांनी जुन्या जाणत्या कलावंतांचे आयुष्य पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल या हेतूने मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा जीवनप्रवास समाजापुढे यावा हा हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन आशुतोष नेर्लेकर यांनी केले.

पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन;२८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजन

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाड डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते.  

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी दि. १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती.

या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.

बैठकीत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीस ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीत; नागरिकांच्या कॉरिडॉरबाबतच्या समस्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पंढरपूर.दि.१४: शिवसेना नेत्या व विधानपरिषद मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी, पंढरपूरातील समाजाच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर मंदिर परिसरातील विविध सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करताना डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंदिर परिसरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच वॉटरप्रूफिंगची कामे करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या बाबीकडे पुरातत्त्व विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मंदिर परिसरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक विद्युत आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी भविष्यातील वाढती भाविक संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच महिला भाविकांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षामध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला दिल्या.

दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन प्रस्तावित मंदिर कॉरिडॉरबाबत निवेदन सादर केले. कॉरिडॉर उभारताना परिसरातील नागरिकांची घरे, जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा विचार करण्यात यावा तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित करताना सांगितले की, विकासकामे करताना स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने, यामध्ये नागरिकांची नेमकी किती घरे, दुकाने व जमीन संपादित होणार आहे त्याचे सविस्तरपणे विभाजन करून आढावा सादर करावा. कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

डॉ. गोऱ्हे यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांच्या सोयी आणि कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामुळे मंदिर विकास आणि भाविक सुविधांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. १४ जून २०२६ :

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे तीन महत्त्वाचे विषय निश्चित करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर आपले मत व्यक्त करणारी रील तयार करायची आहे.

स्पर्धकांनी तयार केलेली रील १७ जून २०२६ पर्यंत आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना @mumbaiiyc या अधिकृत हँडलला टॅग करणे तसेच #ReelSeRealTalk हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. रीलमधील आवाज व चित्रफीत स्पष्ट असावे तसेच कोणतीही आक्षेपार्ह, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट तीन रील्सना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹३,००० इतकी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील बेरोजगारी, वाढती महागाई आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर युवकांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडावी, सामाजिक व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०८२२९८०४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी नृत्याविष्कार अन्‌ संतूर वादनाची रंगली मैफल

पुणे : ज्ञान आणि समृद्‌धी या परस्पर पूरक शक्तींमधील द्वंद्वाचे सादरीकरण करणारा ‘यदा’ हा नृत्याविष्कार आणि संतूरचे स्वर्गीय सूर यांनी नटलेली संध्याकाळ रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ आयोजित युवा स्वरानुभूती मैफलीचे!

कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे शनिवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्या कुचिपुडी नृत्याविष्काराने झाली. ज्ञानाची देवता सरस्वती आणि धनाची देवता लक्ष्मी यांच्यातील द्वंद साकारताना ‘यदा’ या संकल्पनेतून मानवी भावभावनांनी नटलेल्या उत्कट आणि उत्स्फूर्त संवादाची आणि नाट्यात्मकतेची अनुभुती रसिकांना आली. या अनोख्या कुचिपुडी नृत्यशैलीने रसिक स्तिमित झाले. भावोत्कट अभिनय, लयबद्ध नृत्याविष्कार आणि खेळकर वाचिक अभिनयातून दोनही नृत्यांगनांनी द्वंद्व, सख्य आणि संतुलन यांचा समन्वय साधत प्रभावी सादरीकरण केले.

नृत्यप्रस्तुतीनंतर रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्याशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना राधिका करंदीकर यांनी संवाद साधला. त्या वेळी ‘यदा’ या संकल्पनेविषयी बोलताना देवी सूक्त, ललिता सहस्रनाम अशा देवीस्तुती करणाऱ्या स्तोत्रांमधून हा विषय सापडल्याचे त्यांनी सांगितले. कुचिपुडी नृत्यातील वाचिक व नाट्यमय अभिनय यांचे वैशिष्ट्य सांगून नृत्य सादरीकरण करतेवेळी कलाकार नृत्यातील कवित्त गुणगुणत नृत्य सादरीकरण करतो हे वेगळेपण उलगडून दाखविले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुण्यातील सुप्रसिद्ध युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांची मैफल रंगली. त्यांनी राग जोगकंसमधील आलाप, जोड, झाला ऐकवून रूपक आणि तीनतालातील तीन रचना तबल्याच्या साथीने साकारल्या. वाद्यावरील उत्तम प्रभुत्व, संतूरमधून साकारलेले सुमधुर सूर आणि तबल्याची संयत साथसंगत यातून मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. विनय मुंडे यांनी समर्पक तबलासाथ केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले.

तब्बल1,545 बोगस खरेदीखते:सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित

सातारा -फलटण येथील क्रमांक 2 चे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 दिपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 1,545 दस्तऐवजांबाबत गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार, “एक जिल्हा एक नोंदणी” या व्यवस्थेअंतर्गत नोंदणी झालेल्या या 1,545 दस्तांची पडताळणी करताना अनेक बाबी संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या सर्व दस्तांची तपासणी सध्या एका विशेष पथकामार्फत युद्धपातळीवर सुरू असून याचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासणीमध्येच सातारा जिल्ह्यातील फलटण, कराड, खंडाळा, वाई आणि दहिवडी (माण) या तालुक्यांतील 58 दस्तांमध्ये ‘महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण अधिनियम, 1947’ मधील तरतुदींचे सरळसरळ उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले असतानाही, त्यासाठी आवश्यक असलेले सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र संबंधित दस्तांना जोडलेले नव्हते, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

​या संपूर्ण प्रकरणाला शासनाने अत्यंत गंभीर स्वरूप मानले आहे. अशा प्रकारच्या मोठ्या अनियमिततेमुळे भविष्यात न्यायालयीन वाद किंवा इतर प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, यामुळे थेट नोंदणी विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन विभागाची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सह दुय्यम निबंधक दिपक पवार यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवून ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979’ मधील तरतुदींचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, त्यांना कार्यकारी पदावर ठेवणे प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य ठरवून हे निलंबन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत 11 जून 2026 पासून दिपक पवार यांना निलंबित करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत ते निलंबित राहतील. या निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सह जिल्हा निबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित करण्यात आले असून, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना हे मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार असला, तरी त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तसेच या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारण्यास त्यांना मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र कारवाई करत निर्वाह भत्त्याचा हक्क काढून घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, शासनाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष पथकाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दिपक पवार यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी दोषारोपपत्र आणि पूरक कागदपत्रांसह प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील जमीन व दस्त नोंदणी व्यवहारांशी संबंधित हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले असून, उर्वरित दस्तांच्या तपासणीत आणखी कोणती मोठी अनियमितता समोर येते, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

डीएसकेंच्या जप्त गाड्या स्वस्त देण्याचे आमिष,कार एजंटने घातला अनेकांना गंडा

पुणे-पुण्यात डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त केलेल्या गाड्या स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. एका कार एजंटने अनेकांना गंडा घातला असून, त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एजंट पैसे घेऊन फरार झाला आहे.या प्रकरणी अदनान शब्बीर शेख (वय २३, रा. नाईक बिल्डिंग, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहसीन मोहम्मद मुल्ला (रा. अमन हाईट्सजवळ, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची अनेक आलिशान वाहने जप्त केली होती, तर काही वाहने कर्जाची थकबाकी असल्याने बँकांनी ताब्यात घेतली होती.

फिर्यादी अदनान शेख आणि आरोपी मोहसीन मुल्ला हे बालपणीचे मित्र आहेत. मुल्ला जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. नोव्हेंबर २०२४ मध्ये मुल्लाने शेख यांना मोबाईलवर एका जुन्या इनोवा क्रिस्टा गाडीचा फोटो दाखवला. ही गाडी चांगल्या स्थितीत असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर उभी असल्याचे त्याने सांगितले. ही गाडी डी.एस. कुलकर्णी यांची असून, कर्जाचे हप्ते न भरल्याने कोटक बँकेने ती जप्त केल्याचा दावा मुल्लाने केला.

बँकेचे थकीत कर्ज भरल्यानंतर ना-हरकत प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर ही गाडी ५ लाख रुपयांत मिळवून देईल, असे आश्वासन मुल्लाने शेख यांना दिले. बँकेत पैसे भरून गाडी सोडवून आणण्याच्या विश्वासावर शेख यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला ५ लाख रुपये रोख दिले.

पैसे घेतल्यानंतर शेख यांनी वारंवार गाडीबाबत विचारणा केली असता, मुल्ला टाळाटाळ करू लागला. संशय आल्याने शेख यांनी आपले ५ लाख रुपये परत मागितले. मात्र, मुल्लाने पैसे देण्यास नकार दिला आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

शेख यांनी परिसरात चौकशी केली असता, आरोपी मुल्लाने गंज पेठ भागातील इमरान उस्मान सय्यद, वसीम शफीक ताजमत, अहमद सज्जाद खान आणि इतर काही लोकांकडूनही अशाच प्रकारे गाड्या देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये घेतल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयसिंग दाढे करत आहेत.

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

मुंबई, दि. १४ जून २०२६:

राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला त्याचा वीज वापर मोबाईल फोनवर समजतो. त्यामुळे वीजबिलाबाबत पारदर्शिता राहते. स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याच्या वीजवापरावर व वीजबिलावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. 

स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे ग्राहकाला त्या घरात अथवा कार्यालयात अर्थिंगची समस्या अथवा वीजगळती होत असल्यास समजते. त्या माहितीचाही ग्राहकाला लाभ होतो.

ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळे समजते. त्या आधारे घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत मिळते. याशिवाय मोबाईल ॲपद्वारे बिल भरल्यास डिजिटल पेमेंटची सवलत आणि गो ग्रीनची दरमहा दहा रुपये सवलत मिळते.

ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक निवडींना सुरुवात..उपाध्यक्षपदी चार पदाधिकाऱ्यांची निवड

पुणे | भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यालयात शनिवारी (दि. १३ जून २०२६) ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष विकास लवटे यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस रमेशबापू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुमित बेनकर, निलेश निर्मळे, भगवान शिंदे आणि गुलाब साळुंखे यांची ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले…या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते, ओबीसी मोर्चाच्या शुभदा धामापूरकर, यशोधन आखाडे, मंगेश शहाणे, दिनेश रासकर, नंदकुमार गोसावी, विनोद जालगी, सूर्यकांत घनवट, चारुदत्त शिंदे तसेच ओबीसी मोर्चाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांच्या नौकऱ्यांमधील अस्थिरता पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर,आता आणखी एका वृत्तपत्राविरोधात तक्रार..

बिस साल बाद गेली कित्येक वर्षे पुण्यातील कायमस्वरूपी पत्रकारितेला कंत्राटी पत्रकारिता बनवून पत्रकारांच्या नौकऱ्यांशी आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. 2006 मध्ये पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्रातील फौंडर मेंबर ठरलेल्या काही पत्रकारांनी कामगार आयुक्त , औद्योगिक न्यायालय, सेशन कोर्ट, हायकोर्ट असा लढा कामगार नेते अजित अभ्यंकर यांच्या साथीने लढला आणि स्वतःवरील अन्याय सहन करून संस्थेतील शेकडो पत्रकार पत्रका रितेतर सह कर्मचारी यांना कायदेशीर हक्क मिळवून दिले. पण 20 वर्षात अशा संघर्ष करणाऱ्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही ,या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविली जाते तोच पत्रकार स्वतःवरील अन्याय मुग गिळून सहन करत आला . आता 20 वर्षानंतर पुण्यात एक अशाच अन्याया विरोधातील घटना पुढे आली आहे ज्याची अदखलपात्र म्हणून पोलिसानी नोंद घेतली आहे.मात्र अद्याप याविषयी कोणी न्यायालय , कामगार आयुक्त , औद्योगिक न्यायालय, यांच्याकडे दाद मागीतल्याचे वृत्त नाही .

पुणे :पुण्यातील ‘लेक्सिकॉन मीडिया प्रा. लि.’ Lexicon Media Pvt. Ltd. (पुणे टाइम्स मिरर – Pune Times Mirror) या माध्यम संस्थेत काम करणार्‍या तीन महिला पत्रकारांचा छळ करुन त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या महिला पत्रकारांचा सेवा करार संपला असताना त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे काम करवुन घेणे, त्यानंतर त्यांना अचानक कामावरुन काढून टाकणे, गेले जवळपास वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे रेकॉर्ड संस्थेच्या वेबसाईटवरुन नष्ट केल्याचा आरोप या महिला पत्रकारांनी केला असताना चंदननगर पोलिसांनी संस्थेच्या मॅनेजमेंट हेड प्रियांका शर्मा, संचालक, चेअरमन पंकज शर्मा, एच. आर. निकिता जाधव आणि पुणे मिररचे सीईओ आकाश राजपुरोहित यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.सुरक्षेच्या आणि भविष्यातील रोजगाराच्या कारणास्तव तक्रारदार महिला पत्रकारांनी आपली नावे गोपनीय ठेवली आहेत. त्यांनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून व्यावसायिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

व्यवस्थापनाने कार्यस्थळावर अत्यंत असुरक्षित वातावरण तयार करुन गंभीर मानसिक अत्याचार व छळ करुन त्यांनी या महिला पत्रकारांना नोकरीवरुन काढून टाकण्याची वारंवार धमकी दिली. तसेच १८ मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या पत्रकारांना कामावरुन काढून टाकले. एवढेच नव्हे तर, त्यांचे अधिकृत ईमेल आणि कामाचे डॅशबोर्ड तातडीने ब्लॉक करून त्यांची ‘डिजिटल नाकेबंदी’ करण्यात आली. यामुळे पत्रकारांनी केलेल्या कामाच्या नोंदी आणि महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासाठी उपलब्ध राहिले नाहीत. हा प्रकार म्हणजे त्यांच्या कामाच्या अधिकारावर गदा आणणारा आणि पुरावे नष्ट करण्याचा सायबर गुन्हा असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण छळवणुकीमुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक दडपणामुळे थेट आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.आमचे कायदेशीर करार संपलेले असतानाही, आमच्या आर्थिक गरजेचा गैरफायदा घेऊन मॅनेजमेंटने आमच्याकडून वर्षभर अहोरात्र काम करून घेतले. आमच्या श्रमाचा व्यावसायिक वापर केल्यानंतर, कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आले.” तसेच, ज्या गोष्टीचा मूळ पत्रकारितेशी संबंध नाही, त्या ‘डॅशबोर्ड’चे पूर्णपणे खोटे आणि बनावट कारण पुढे करून आपली व्यावसायिक प्रतिमा डागाळण्याचा कट रचला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रियांका शर्मा यांनी त्यांची कायदेशीर कार्यमुक्ती पत्र आणि अनुभव प्रमाणपत्र दडपशाही करुन रोखून धरले आहे. जेणे करुन त्यांना इतर कोठेही नोकरी मिळू नये आणि त्यांची कारकीर्द कायमची उद्धवस्त व्हावी, असे कृत्य केले आहे. त्याला कंपनीच्या मुख्य संचालकांनी देखील पूर्ण पाठिंबा दिल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

राजस्थानसह 9 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय-यूपीमध्ये वादळ आणि वीज कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू

0

देशातील 8 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय आहे. राजस्थानसह 9 राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशात शनिवारी संध्याकाळी भोपाळसह 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. इटारसीमध्ये वादळानंतर रुग्णवाहिकेवर झाड कोसळले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा, झाडे तुटून पडली. जत्रेचे मुख्य प्रवेशद्वार उखडले.

यूपीमध्ये वादळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या अपघातांमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. उन्नाव आणि गाझीपूरमध्ये वीज कोसळून दोन लोकांचा जीव गेला. तर कासगंजमध्ये वादळामुळे घराचे छत कोसळून पती-पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. प्रतापगड मेडिकल कॉलेजमध्ये पाणी साचले.

राजस्थानमध्ये जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी पाऊस झाला. चुरू जिल्ह्यात वादळी पाऊस आणि वादळामुळे एका घराची भिंत कोसळली. यात कुटुंबातील 4 सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले. ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले.

मान्सूनने झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांत प्रवेश केला आहे. पुढील 3 दिवसांत मान्सून छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. 4 जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून 9 दिवसांत 19 राज्यांपर्यंत पोहोचला आहे.
8 राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव, पारा 40°C पार

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी पारा 40°C पेक्षा जास्त होता. देशात सर्वाधिक पारा महाराष्ट्रातील यवतमाळ येथे नोंदवला गेला. येथे पारा 42.4°C होता. तर छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये 42°C, गुजरातमधील भावनगरमध्ये 41.9°C, राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 40.8°C नोंदवला गेला.

19 जूनपर्यंत या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 19 जूनपर्यंत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत राहील.

जम्मू-कश्मीर, लद्दाख आणि उत्तराखंडमध्ये 14 ते 19 जूनपर्यंत पावसाची शक्यता.
हिमाचल प्रदेशात 14 ते 19 जून दरम्यान पावसाचा जोर.
हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 19 जूनपर्यंत थांबून-थांबून पाऊस.
पूर्व उत्तर प्रदेशात 14 जून आणि 18-19 जून रोजी पावसाची शक्यता.
पश्चिम राजस्थानमध्ये 14 ते 17 जून आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता.
हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 14 जून रोजी जोरदार वारे वाहू शकतात.
उत्तराखंडमध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील.
हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १४ जून रोजी वादळ आणि विजा चमकण्याची शक्यता आहे.

जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज :डॉ. नीलम गोऱ्हे

देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा

जेजुरी.दि.१३: जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी आपण अनेकदा विधानभवनात बैठका घेतल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

आज जेजुरी येथे डॉ. गोऱ्हे यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. खंडोबाने जसा दुष्ट शक्तींचा पराभव केला, तसेच सर्व नागरिकांना संकटांपासून संरक्षण मिळावे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होत राहावीत, अशी प्रार्थना त्यांनी श्री खंडोबाच्या चरणी केली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विश्वास पानसे यांनी डॉ. गोऱ्हे यांना शाल, श्रीफळ व खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच कोविड काळात घडशी समाजाला केलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्या वतीनेही डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. धर्म आणि परंपरा यांचा आदर राखत समाजसुधारणा करता येते, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम केले. अनेकदा धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असे म्हटले जाते; मात्र धर्मातील योग्य सुधारणा करूनही समाजाची प्रगती साधता येते. यासाठी सर्व समाजघटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सेंद्रिय हळदीचा वापर वाढविण्यासाठी देवस्थानने पुढाकार घ्यावा आणि भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार करावा, असे त्यांनी सुचविले. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुद्ध आणि सेंद्रिय हळदीचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानला त्यांनी वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली.

देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी जेजुरीच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जेजुरीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्येही धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र अशा विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ साठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून व्यापक जनजागृती

पुणे, दि. १३ : आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती आणि सहभाग वाढविण्यासाठी विशेष समन्वय मोहीम राबविण्यात येत आहे.
यावर्षीचा योग दिन “ऑनलाईन” पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून रविवारी, १४ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योग दिनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, क्रीडा क्लब तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सहभागींची नोंदणी “One Device, One Participant” या नियमांनुसार स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून करणे आवश्यक आहे.
पूर्वनोंदणीसाठी सर्व नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि कर्मचारी यांनी अधिकृत टोल-फ्री क्रमांक १८००-३१५-७००८ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर सहभागींस ऑनलाइन सत्रासाठी आवश्यक लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
संस्थांनी आपल्या स्तरावर समन्वयक नियुक्त करून विद्यार्थ्यांची व सदस्यांची नोंदणी सुनिश्चित करावी. तसेच इंटरनेट सुविधा, डिजिटल उपकरणे आणि ऑनलाइन सहभागासाठी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमानंतर सहभागींचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून संस्थांनी सहभागाचा एकत्रित अहवाल पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ईमेलवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.