देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा
जेजुरी.दि.१३: जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी आपण अनेकदा विधानभवनात बैठका घेतल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
आज जेजुरी येथे डॉ. गोऱ्हे यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. खंडोबाने जसा दुष्ट शक्तींचा पराभव केला, तसेच सर्व नागरिकांना संकटांपासून संरक्षण मिळावे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होत राहावीत, अशी प्रार्थना त्यांनी श्री खंडोबाच्या चरणी केली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विश्वास पानसे यांनी डॉ. गोऱ्हे यांना शाल, श्रीफळ व खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच कोविड काळात घडशी समाजाला केलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्या वतीनेही डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारांसोबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. धर्म आणि परंपरा यांचा आदर राखत समाजसुधारणा करता येते, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम केले. अनेकदा धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, असे म्हटले जाते; मात्र धर्मातील योग्य सुधारणा करूनही समाजाची प्रगती साधता येते. यासाठी सर्व समाजघटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सेंद्रिय हळदीचा वापर वाढविण्यासाठी देवस्थानने पुढाकार घ्यावा आणि भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार करावा, असे त्यांनी सुचविले. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी सांगितले.
रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुद्ध आणि सेंद्रिय हळदीचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानला त्यांनी वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली.
देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी जेजुरीच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जेजुरीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्येही धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र अशा विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे, दि. १३ : आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती आणि सहभाग वाढविण्यासाठी विशेष समन्वय मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षीचा योग दिन “ऑनलाईन” पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून रविवारी, १४ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योग दिनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, क्रीडा क्लब तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सहभागींची नोंदणी “One Device, One Participant” या नियमांनुसार स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून करणे आवश्यक आहे. पूर्वनोंदणीसाठी सर्व नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि कर्मचारी यांनी अधिकृत टोल-फ्री क्रमांक १८००-३१५-७००८ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर सहभागींस ऑनलाइन सत्रासाठी आवश्यक लिंक उपलब्ध करून दिली जाईल. संस्थांनी आपल्या स्तरावर समन्वयक नियुक्त करून विद्यार्थ्यांची व सदस्यांची नोंदणी सुनिश्चित करावी. तसेच इंटरनेट सुविधा, डिजिटल उपकरणे आणि ऑनलाइन सहभागासाठी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर सहभागींचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून संस्थांनी सहभागाचा एकत्रित अहवाल पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ईमेलवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
पुणे ता. १३ : लाडक्या बहिणीच्या निधीच्या नावाखाली पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. हा प्रकार घटनाबाह्य असून नित्याचाच झाला आहे. यामुळे मागसवर्गीयांच्या हितांचे रक्षण न करता सातत्याने त्यांच्यावर अन्याय करत राहण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी भाजप आणि घटक पक्षाने अनेक क्लुप्त्या केल्या त्यापैकी एक म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’. निवडणुकी पूर्वी या सरकारने लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या १५०० रुपयांत वाढ करून ते ३००० करणार असल्याचे घोषित केले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर वेगवेगळे निकष लावून अनेक लाडक्या बहीणींना सरकारने या योजनेतून वगळले. सध्या ज्या लाडक्या बहीणींना निधी दिला जात आहे त्यासाठी समाजकल्याण विभागाचा ३४४.७४ कोटी निधी महिला आणि बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. अशा प्रकारे शासन सातत्याने मागसवर्गीयांवर अन्याय करत आहे. यापूर्वीही मे २०२५ सामाजिक न्याय विभागातून ३ हजार कोटी आणि आदिवासी समाजाचा हक्काचा ४ हजार कोटी असा एकूण ७ हजार कोटींचा निधी लाडक्या बहीणीकडे वळवला आहे. एप्रिल मे २०२५ आदिवासी विकास विभागातून ३३५.७० कोटी रुपये वळवले होते. आणि आता मे २०२६ पुन्हा ३४४.७४ कोटी रुपये वळवले आहेत. म्हणजेच आजवर एकूण वळवलेला निधी १०९०.७४ कोटी रुपये रुपये इतका आहे.
हा निधी मागासवर्गीयांच्या शिक्षण, शिष्यवृत्ती, निवासी शाळा, वसतिगृह, घरकुल, आरोग्य, दलीत वस्ती सुधार योजना, यांसारख्या योजनांसाठी खर्च केला जातो. ज्याअर्थी हा निधी वळवला जात आहे त्याअर्थी सहाजिकच मागासवर्गीयांच्या या योजनेला कात्री लावली जाणार आहे. त्यामुळे ही गोष्ट या समाजघटकांच्या अधिकारांवर गंडांतर आणणारी आहे. त्याचप्रमाणे सरकारचे हे कृत्य घटनाबाह्य आहे. कारण ही अर्थसंकल्पीय तरतूद राज्यघटनेनुसार केली जाते. ती अशी मनमानी पद्धतीने वळवता येत नाही. सरकार अशा प्रकारचे कृत्य जाणीवपूर्वक सातत्याने करत आहे की काय अशी शंका यामुळे आमच्या मनात निर्माण होत आहे.
मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या लोकसंख्येनुसार ही निधी अर्थसंकल्पात द्यावा लागतो. तो असा पळवता येत नाही. पण सरकारने याची कोणतीही तमा बाळगली नाही. हा निधी वर्ग करताना या विभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांना पुसटशीही कल्पना दिली जात नाही. याबद्दल ते सातत्याने मध्यमांसमोर हाताशा व्यक्त करतात. सरकारचे हे बेजबाबदार वर्तन राज्यासाठी अतिशय गंभीर आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा आजपर्यंत वळवलेला निधी सरकारने पुन्हा एकदा या विभागाला वर्ग करावा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सरकार आज पैसे देत नाही आणि हे पैसे अशा प्रकारे वेगवेगळ्या योजनांसाठी वापरले जात आहेत ही चिंतेची बाब असल्याचे सुनील माने यांनी म्हटले आहे.
शासकीय वसतिगृहात जातनिहाय आरक्षण घटनाबाह्य – राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीमध्ये मागसवर्गीयांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी जातिनिहाय आरक्षण ठेवले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आणि घटनाबाह्य असून ही चूक शासनाने त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभगाच्या वतीने एक जाहिरात प्रसिद्धीस दिली आहे. त्यात जातीनिहाय आरक्षण ठेवले आहे. मांग आणि मेहत्तर या दोन जातींना त्यात आरक्षण देऊ केले आहे. या गोष्टींना आमचा विरोध आहे. त्या गोष्टी आधीपासून झाल्या असतील किंवा आता नजरचुकीने झाल्या असतील तर त्याची दुरुस्ती केली पाहिजे. आपण जातीनिहाय जनगणना केलेली नाही, न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालातील अंतर्गत वर्गीकरणानुसार ज्या राखीव जागा ठेवायच्या आहेत त्याचे निकष आपल्याला माहिती नाहीत. ते न करता सरकार जर अशा पद्धतीने काम करत असेल तर हे मनुस्मृतीच्या नियमानुसार करत आहेत काय? अशी आता आम्हाला शंका वाटू लागली आहे. कारण हे संविधानाच्या विरोधात आहे. अनुसूचित जातींचा वेगळा गट आहे त्या जातींमध्ये भारतीय संविधानानुसार कोणत्याही एका जातीला वैयक्तिकपणे कोणत्याही राखीव जागा नाहीत हे सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाने तातडीने या दुरुस्त्या अंमलात आणल्या पाहिजेत अशी मागणी माने यांनी केली आहे.
▪️मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण
पुणे, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची केली. यावेळी त्यांनी कामाची गती गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील , बाबाजी काळे काळे , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुकाने, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात असून भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी नमुद केले.
या सर्व विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पट वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.
‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी’, विषयावर टिळक भवन मध्ये विशेष चर्चासत्र संपन्न.
मुंबई, दि. १३ जून २०२६.
देशात वाजपेयी सरकार असतानाही विरोधकांचा सन्मान केला जात होता, संसदेत कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही पण सध्या विरोधकांना संपवण्याचे काम होत आहे. राजकीय प्रतिशोध सुरु आहे आणि यातून देशात भयानक संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा मुकाबला काँग्रेस पक्षच करु शकतो, ती काँग्रेसवर मोठी जबाबदारी आहे आणि काँग्रेसने जमिनीवर उतरून मुकाबला करण्याची भूमिका घेतली ती योग्य आहे, कारण सध्याच्या संकटातून मोदी सरकार देशाला बाहेर काढू शकत नाही, ‘मोदी मस्ट गो’, असा स्पष्ट इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते.
या चर्चासत्रात पुढे बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले की, मोदी सरकार विकास दराचे जे आकडे मांडून श्रेय घेत आहे ते आकडेच मुळात चुकीचे आहेत. भारताचा विकास दर ७.७ टक्के आहे हे ते सांगत आहेत पण सत्य वेगळे आहे. या आकड्यावर अनेक अर्थतज्ञ शंका उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या आकड्यांवर शंका उपस्थित करून भारताला ‘सी’ ग्रेड मध्ये टाकले आहे आणि भारताचे आकडे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असे स्पष्ट सुनावले आहे. विशेष म्हणजे ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांचाही नंबर ‘ए’ ग्रेड मध्ये आहे. गुंतवणूक वाढली तरच विकास दर वाढेल पण मागील १२ वर्षात गुंतवणूक ही जीडीपीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यात वाढ झालेली दिसत नाही, त्याच्या आधारे विकास दर ६ ते ६.५ टक्के होतो. सरकारने मांडलेले आकडे साफ चुकीच आहेत. २०४७ साल येता येता भारत विकसीत देश होईल असे मोदी सांगत आहेत पण त्यासाठी आपला विकासाचा दर हा ८ टक्क्यांच्या वर असला पाहिजे आणि सध्याचे आकडे पाहता ते उदिष्ट गाठता येणे फारच कठीण आहे. भारतासमोर हे संकट इराण युद्धामुळे आलेले नाही. सरकार डिझेलचे रेशनिंग करत आहे, रुपया कुठे चालला आहे? महागाई प्रचंड वाढली आहे. आणि स्टॉक मार्केटची अवस्थाही गंभीर आहे. मागील दोन वर्षात ३.२५ लाख कोटी रुपये देशातून बाहेर गेले आहेत. शेतकरी संकटात आहे. खतांची टंचाई आहे. ग्रामीण भागातील अवस्था अत्यंत बिकट बनत चालली होईल. शेतकरी संकटात येईल व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडेल.
भारताने याआधी अनेक मोठ्या संकटाचा सामना केला आहे आणि त्यातून देश पुन्हा ताकदीने उभा राहिला आहे. पंडित जवाहलाल नेहरु ते अटलबिहारी वाजपेयी पर्यंत सर्वच सरकारांनी संकटाचा मुकाबला केला पण सध्याच्या मोदी सरकारमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची इच्छाशक्तीच नाही. खोटे बोलून काम चालवले जात आहे. आज भारत सरकार अमेरिकेसमोर झुकले आहे, ते सांगतील तसेच केले जात आहे. पंतप्रधान अमेरिकेसमोर नतमस्तक आहेत आणि त्याचाही मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमेरिका इराण वादात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे, मग आपले विश्वगुरु कुठे आहेत? असा प्रश्नही यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.
अर्थतज्ञ प्रा. अरूणकुमार यावेळी म्हणाले की, मोदी सरकार जीडीपीचे आकडे लपवत आहे. देशातील असंघटीत क्षेत्र खूप मोठे आहे. छोटे, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नोटबंदीचा मोठा फटका MSME क्षेत्राला बसला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्याचा फटकाही असंघटीत क्षेत्राला बसला. संघटीत क्षेत्राला मात्र त्याचा फायदा होत आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्या कामगारांची संख्या असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या कमाईत व वाढलेल्या महागाईत तो कसा जगेल. महागाईचा दर सुद्धा संघटीत व असंघटीत क्षेत्रात वेगवेगळा आहे, गरिबांचे आकडे दाखविले जात नाहीत. गरिब माणूस पिचला जात आहे. आपले मार्केट घसरत आहे. आपली पिछेहाट होत आहे. तंत्रज्ञानात आपण मागे आहोत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपली गुंतवणूक अमेरिका, चीनच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आपली आयात वाढली आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकला आहे. आपली अर्थव्यवस्था तडजोडीची झाली आहे. शिक्षणवरचा आपला खर्च इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जागतिक पातळीवर आपण थट्टेचा विषय बनलो आहोत. संघटीत व असंघटीत क्षेत्रात मोठी तफावत आहे. कामगारांची संख्या कमी कमी होत आहे. यातून रोजगाराची समस्या वाढत आहे, काम मिळत नाही. शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही, यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सरकार खरे आकडे सांगत नाही. चुकीचे आकडे दाखवून दिशाभूल केली जात आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही प्रगती नाही. २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले हा दावा चुकीचा आहे. लोकांच्या हातात पैसा असला तरच मागणी वाढेल असेही अरुणकुमार म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देश आज मुठभर लोकांच्या हातात गेला आहे, आपल्या गळ्याभोवती फास आवळला आहे. लढण्याची जिद्द कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे. चुकीचे काही घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. संपूर्ण मे महिना मी राज्यभर फिरून महत्वाच्या विषयावर आंदोलन केले. राज्यात फिरताना काही गोष्टी निदर्शनास आल्या, त्यात ५०० रुपयांच्या नोटा संपल्याचे चित्र आहे, बँकेत पैसे नाहीत. परिक्षा आहे पण पेपर लिक, डिग्री आहे पण नोकऱ्या नाहीत, अशी अवस्था आहे. शिक्षणाकडेही तरुण पाठ फिरवत आहेत. खरिपाचा हंगाम सुरु आहे पण शेतकरी नाराज आहे. शेतमालाला भाव नाही, खदखद वाढली आहे, परिस्थिती गंभीर आहे यातून मार्ग काढावा लागेल.जात व धर्म हे राजकीय विषय करण्यापेक्षा आर्थिक विषयावर राजकारण व्हावे अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केले. पाहुण्यांची ओळख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली. आभारप्रदर्शन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन देसाई यांनी केले.
पंतप्रधान पदवी विसरतात, पत्नीला विसरतात…देशातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणावर भाष्य करताना त्यांनी टोला लगावला, ज्या देशात पंतप्रधान आपली पदवी विसरतात, आपली पत्नी विसरतात, तिथे आम्ही मात्र धनंजय थोरात यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे स्मरण कृतज्ञतेने ठेवतो. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे स्मरण लोकांना होऊ नये, ते कधी जन्माला आलेच नव्हते, असे वातावरण निर्माण करण्याचे काम सध्याची राजकीय व्यवस्था करत असल्याची टिका राऊत यांनी केली.
पुणे ः आज देशात हुकूमशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सध्याचे सत्ताधारी सरकार निष्ठावंत कार्यकर्ता ही जमातच नष्ट करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे काम करत आहे. अशा काळात केवळ चिमटे काढून चालणार नाही, तर थेट हल्ला करण्याची गरज आहे. या देशाला आज चिमट्यांची नव्हे, तर थेट आणि रोखठोक हल्ल्यांचीच गरज आहे, असे परखड मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत व्यक्त केले.
कै. धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा ’कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुश्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी यांना खासदार राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सलील कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी यांनी पुरस्कार स्विकारला. संजय राऊत यांच्या हस्ते धनंजय थोरात यांच्या कुटुंबातील अथर्व थोरात यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सीआयडीचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ वात्रटिकार रामदास फुटाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, बिपीन गुपचूप, शिरीष बोधनी, प्रथमेश आबनावे, सुनिल मलके, प्रशांत सुरशे, स्वाती शिंदे, सुरेश कांबळे, केतन अग्रवाल आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कै. धनंजय थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केले होते.
काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देत राऊत यांनी आजच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, धनंजय हा निष्ठावंत कार्यकर्ता होता. काँग्रेस पक्षात राहून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. कुठल्याही अमिषाला ते बळी पडले नाहीत. ते केवळ एकदाच नगरसेवक झाले, तरी पक्षात टिकून राहिले. आज मात्र परिस्थिती अगदी उलटी झाली आहे. काँग्रेसने ज्यांना मुख्यमंत्री, राज्यपाल केले, तेच लोक स्वाभिमान आणि निष्ठा विकून पळून गेले.
ते पुढे म्हणाले, आज पश्चिम बंगाल असो की संपूर्ण देश, कार्यकर्ता ही जमातच पूर्णपणे नष्ट करायची, असे या सरकारने ठरवले आहे. कार्यकर्त्याला बाजारातील भाव द्यायचा, असे चालू झाले आहे. आज निवडून आलेल्या लोकांना हमीभाव पक्का आहे. हा भाव देऊन त्यांना विकत घ्यायचे आणि जर ते सोबत आले नाहीत, तर थेट तुरुंगात टाकायचे, अशी दडपशाही सुरू आहे. आज विचारांशी कोणतीही बांधिलकी राहिलेली नाही. हे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे.
ब्रिटिश राजवटीचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, पूर्वी ब्रिटिश आपल्या सोयीसाठी काही जातींना गुन्हेगारी जाती ठरवायचे. अत्यंत दुर्दैवाने तीच प्रथा आजही देशात सुरू आहे. आज देशाचे पंतप्रधान स्वतः ठरवतात की गुन्हेगार कोण! कोणाच्या मागे ’ईडी’ (एऊ) लावायची, कोणाला जेलमध्ये टाकायचे हे वरून ठरवले जाते. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांनी ज्या उपेक्षित समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे अस्तित्व आज पुन्हा धोक्यात आले आहे.
देशातील आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवत त्यांनी संताप व्यक्त केला, चोरी केली म्हणून गरिबाला, पारधी समाजातील माणसाला तात्काळ पकडून नेले जाते. मात्र, दुसरीकडे देशातील बँकांचे तब्बल 15 लाख कोटी रुपये चोरून राजेश मेहता सारखे लोक सहज पसार होतात. गेल्या 12 वर्षांत बँकांचे पैसे बुडविणार्या बड्या उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपये माफ करण्यात आले. देशात रोज 100 बँक फ्रॉड होत आहेत. हे बँक लुटणारे काय राज्यातील गुन्हेगारी जमातीचे आहेत का? मग गुन्हेगार केवळ सामान्य लोकच कसे ठरतात? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम गोदामातील आग 4 हजार ईव्हीएम मशिनला आग लागल्याचे सांगितले जाते. पण त्या जळाल्या नाहीत, तर त्या मुद्दाम जाळल्या गेल्या आहेत! असा संशय त्यांनी व्यक्त केला.
राम मंदिर प्रकरणात माझ्यावर सीबीआय केस आहे, चार्जशीटमध्ये माझे नाव आहे. पण प्रत्यक्ष अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीतून 5 कोटी रुपये चोरीला गेले, त्यावर देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. तिथले सीसीटीव्ही फुटेजही चोरीला गेले. अयोध्येला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे सांगून भीती निर्माण केली जात आहे, मग ही 5 कोटींची दानपेटी काय दहशतवाद्यांनी पळवली? भाजपचेच खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणतात की, माझ्याकडे नावे आहेत, पण मी बोललो तर ते माझे नाव घेतील. ही कसली पारदर्शकता?
मोहन जोशी, म्हणाले, गेल्या 18 वर्षांपासून पुरस्कार दिला जातो. सामाजिक व संगीत क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. धनंजय थोरात यांच्या सारखे कार्यकर्ते तयार होण्याची गरज आहे.पराग करंदीकर यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले. युवराज शहा यांनी आभार मानले.
जनतेला ’निर्भय’ होण्याचे आवाहन–जनतेला आणि लेखकांना निर्भय होण्याचे आवाहन केले. तुमच्या पुढच्या पिढीला जर स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आज निर्भयपणे बोलायला शिका. आजही देशात कोणाला मोकळेपणाने बोलता येत नाही. लिहिणार्यांनी आणि बोलणार्यांनी आपले काम न भीता केले पाहिजे. जिथे आहात तिथून देशाची सामाजिक परिस्थिती टिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन राऊत यांनी केले.
‘सुपर एल निनो’ म्हणजे जेव्हा प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान २ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा निर्माण होणारी हवामानाची अत्यंत तीव्र व घातक स्थिती होय. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि अमेरिकेच्या ‘नोआ’ (NOAA) या संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार, या वर्षी प्रशांत महासागरात हा ‘सुपर एल निनो’ (ज्याला ‘गॉडझिला एल निनो’ असेही म्हणतात) वेगाने सक्रिय होत असून, तो १९५० नंतरचा सर्वात भयंकर एल निनो ठरण्याची ६३% शक्यता आहे.
‘सुपर एल निनो’ म्हणजे काय आणि त्याचा भारतावर काय होणार परिणाम?जागतिक हवामान वेगाने बदलत असून संपूर्ण जगावर आता एका मोठ्या संकटाचे सावट पसरले आहे. युरोपियन आणि अमेरिकन हवामान संस्थांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार, प्रशांत महासागरात या शतकातील सर्वात विनाशकारी ‘सुपर एल निनो’ आकार घेत आहे. या बदलामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात हवामानाचा समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘सुपर एल निनो’ म्हणजे नेमके काय?‘एल निनो’ ही एक नैसर्गिक हवामानविषयक स्थिती आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. स्पॅनिश भाषेत एल निनोचा अर्थ ‘लहान मूल’ किंवा ‘बाल येशू’ असा होतो.तापमानात प्रचंड वाढ: सामान्य एल निनोमध्ये तापमान थोडे वाढते; परंतु जेव्हा पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त वाढू लागते, तेव्हा त्याला ‘सुपर एल निनो’ म्हणतात.
दुर्मिळ घटना: ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून, १९५० पासून आतापर्यंत केवळ ४ ते ५ वेळाच अशा तीव्र स्वरूपाच्या ‘सुपर एल निनो’ची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये असा तीव्र एल निनो आला होता.
२०२६ मधील तीव्रता: चालू वर्षातील मे-जून महिन्यापासूनच महासागराच्या पृष्ठभागाखालील तापमान अनपेक्षितपणे वाढले असून, या वर्षाच्या अखेरीस आणि २०२७ च्या सुरुवातीला त्याचा प्रकोप सर्वोच्च पातळीवर असेल.
भारतीय मान्सून आणि शेतीवर होणारे परिणाम-भारताची अर्थव्यवस्था आणि शेती प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. सुपर एल निनोमुळे भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात.
पावसात मोठी घट: हवामान तज्ज्ञांच्या मते, सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमालीचा कमी (सुमारे ४०% पर्यंत घट) होण्याची भीती आहे.
भीषण दुष्काळाचे सावट: महाराष्ट्र (विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देश), गुजरात, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.कृषी क्षेत्राला फटका: पाऊस लांबल्यास किंवा कमी पडल्यास खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान होईल, ज्यामुळे बाजारात अन्नधान्याचे भाव वाढून महागाई वाढू शकते.
तीव्र उष्णतेच्या लाटा (Heatwaves): मान्सूनच्या महिन्यांतही उन्हाळ्यासारखी तीव्र उष्णता आणि उकाडा जाणवत राहील. जागतिक स्तरावर काय उलथापालथ होणार?
हवामानाचा लहरीपणा: दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेच्या काही भागांत मुसळधार पाऊस व पूर येईल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिकेत कडक उन्हाळा व वणवे (Forest fires) लागतील.
अन्न व ऊर्जा संकट: जलविद्युत प्रकल्पांमधील पाणी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती घटेल. तसेच जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात येण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी (UN) दिला आहे.
उपाययोजना आणि सर्तकता-हवामान अभ्यासकांच्या मते, हे संकट मोठे असले तरी आपण योग्य नियोजनाने याचा सामना करू शकतो. त्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे
पाण्याचे ऑडिट: शहरांपासून गावांपर्यंत पाण्याचा अपव्यय टाळणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे.
पीक नियोजनात बदल: शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा.शासकीय पावले: सरकारने तातडीने ‘एल-निनो टास्क फोर्स’ स्थापन करून जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक आहे
पनवेल,दि.13-: गेली अनेक वर्षे जगभरातील देश भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 12 वर्षात विश्वास, विकास, आणि जनकल्याणाची जी काम केली त्यातून आपल्या देशाकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपल्या देशाने जगाला दाखवून दिले आम्ही केवळ बाजारपेठ नाही आम्ही एक महासत्ता आहोत,असे प्रतिपादन मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती पर्वानिमित्ताने आज पनवेल येथे रायगडचे संपर्क मंत्री आणि राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी कालखंडातील केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. अर्थात हे आमचे सेलिब्रेशन नसून ज्या जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या जनतेल्या केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जातो आहोत, असेही त्यांनी सांगितले. ही बारा वर्ष विश्वासाची विकासाची आणि जनकल्याणाची आहेत. या देशाचे प्रधान सेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काम केले, सेवा दिली, कर्तव्य केले, असा जनाधिकार, असा लोकांचा, मतदारांचा आशिर्वाद यापुढे कुणाला मिळेल की माहिती नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 22 राज्यांमध्ये आम्ही जनतेची सेवा करीत आहोत. ही भारतीय राजकारणातली दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये तर आणि त्यातही विशेषत: एशियन देशामध्ये असलेली अस्थिरता पाहिली तर अशा प्रकारे एक नेतृत्व, एक पक्ष, एक सरकार, आणि त्याची वाढती लोकप्रियता याचे उदाहरण अन्य कुठेही सापडणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, म्हणून सबका साथ.. सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनकल्याणाचे काम करीत आहे. म्हणून 25 कोटी भारतीय नागरिक दारिद्ररेषेखालचे होते त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठीचा निर्णय घेऊन त्या ध्येय धोरणाचे काम आमच्या सरकारने केले. सर्व आर्थिक व्यवहार हे डिजिटल, ऑनलाइन पद्धतीने करण्यात आपल्याला यश मिळाले. त्यामुळे सुमारे 4 लाख 31 हजार कोटी बचत झाली. या व्यवहारातल्या पारदर्शकतेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या निधीचा अपहार होणार होता तो निधी वाचला. हे करताना “देश नहीं झुकने दूँगा” अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. मग एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव या सगळ्यातून भारत महासत्ता आहे, हे आपण जगाला दाखवून दिले. “नक्षलवादमुक्त भारत” घोषणा आमच्या सरकारने केली आणि त्याला मोठे यश आले. आज देशभरातून नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आज हा रेड कॉरिडॉर ग्रीन कॉरिडोर मध्ये बदलला. 2014 पूर्वी बँकेचे अकाऊंट हे निवडक लोकांसाठीच आहे, अशा विचारांनी देश काम करीत होता. मात्र 2014 ते आतापर्यंत 58 कोटी बँक खाती उघडली गेली, त्यातही 32 कोटींची महिलांची खाती आहेत. आमच्या सामान्यतः सामान्य माणसाचं आरोग्य आणि आरोग्यासाठीचे उपचार, त्यासाठी लागणारा खर्च, यासाठी योजना आखली आणि आयुष्यमान भारतमध्ये 60 कोटी अधिक आरोग्य कार्ड देण्यात सरकारला यश आले. आमचं सरकार गरिबांना समर्पित आहे, अशी केवळ घोषणा नाही तर पंतप्रधान आवास योजनेत 4 कोटीहून अधिक कुटुंबांना घर, 12 कोटीच्या वर महिलांना ज्यांच्याकडे गॅस नव्हता त्यांना गॅस, 16 कोटी लोकांना घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन पोहचवणे या पद्धतीचे भरीव योगदान आणि काम सेवेचे कार्य सरकारने केले. 12 कोटी शौचालयाची निर्मिती, पी.एम स्वनिधी योजनेंतर्गत 74 लाखाहून अधिक लोकांना कुठल्याही त्रासाविना कर्ज मिळाले. मुद्रा योजनेंतर्गत लहान व्यवसायांसाठी 57 कोटी अधिक तारणमुक्त कर्ज वितरित करण्यात आली, तर आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी 15 हजार कोटी रुपये आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानासाठी 79 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती मंत्री शेलार यांनी यावेळी दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4.3 लाख कोटी रुपये जमा झाले किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना अंदाजे दहा लाख कोटी रुपयांची परवडणारे कर्ज उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांसोबतच महिलांच्या उत्कर्षासाठी या सरकारने विशेष लक्ष दिले होत लखपती दीदी योजनेंतर्गत तीन कोटीहून अधिक महिलांना लाभ झाला आहे. याशिवाय सुकन्या समृद्धी योजना, सुरक्षा दलामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे, पंतप्रधान सूर्य घर मोफत योजना अशा विविध योजनांनाही मोठे यश आले, ही माहिती देतानाच गेल्या बारा वर्षात ग्रामीण रस्ते निर्मिती राष्ट्रीय महामार्ग निर्मिती यामध्ये झालेले वारसा संवर्धनाची झालेले कार्य या संपूर्ण सरकारने केलेल्या कामाचा मंत्री शेलार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सविस्तर आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुण भगत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह रंजनाताई वास्कर, जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया मुकादम, पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धनचे सभापती वैकुंठ पाटील, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, माथेरानचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना
मुंबई, दि. 13 जून – पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लँन तयार करुन समन्वयाने काम करा, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी केल्या आहेत.
मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सून पुर्व कामाचा आढावा घेण्यासाठी दि. 12 जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरार या दरम्यान एकुण 15 मायक्रो टनेल रेल्वे ट्रँक खालून करण्यात आले असून या वर्षात 4 मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहे. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी 126 पंप बसवण्यात आले आहेत तर 2400 व्हँगन इतका गाळ काढण्यात आला आहे. तर मध्य रेल्वेच्या मार्गावर ही पंपाची संख्या वाढवण्यात आली असून 220 पंप बसवण्यात आले आहेत. 350 किलो मिटर लांबीच्या मार्गावरील 160 नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कँमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूर मार्ग येथील उषा नगर नाला आणि कुर्ला येथील ब्राम्हणवाडी नाल्याच्या खोली करण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन्ही रेल्वेचे सादरीकरण झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि फायर ब्रिगेडने त्यांच्या काही सूचना ही केल्या. पुर्वी पेक्षा आता रेल्वे आणि महापालिका यामध्ये समन्वय अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याचे दोन्ही कडून सांगण्यात आले. या बैठकीचा समारोप करताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झाली तर ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी होईल अशा रेल्वे स्टेशन मधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकुण परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन तयार करा, तसेच दोन्ही प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही आणि सुचना देणारी यंत्रणा, आपत्कालीन कक्ष यामध्ये समन्वय ठेवा, रेल्वे स्टेशन मधील आणि बाहेरील पादचारी पुल, वाहतूकीचे पुल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग या सगळ्यांचे स्ट्रक्चरल आँडिट करा, रेल्वे आणि महापालिका यांचे पंप यांचा ही इंटिग्रेटेड प्लँन तयार करण्यात यावा अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या. तसेच मस्जिद बंदर आणि परिसरातील रेल्वे हद्दीत येणाऱ्या व धोकादायक ठरलेल्या 24 इमारती, आणि काही झोपड्या यांचे पुनर्वसन व तेथील रहिवासी याबाबत ही सविस्तर अहवाल तयार करुन शासनाकडे पाठवा, अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.
मुंबई, दि. 13 जून : राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी माहितीपट व लघुपट निर्माण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढीवची घोषणा करण्याबरोबरच; बालप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या घोषणा केल्या.
या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते
राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट व लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट व लघुपटासाठी २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. या निर्णयामुळे दर्जेदार विषयांवरील माहितीपट आणि लघुपट निर्मितीला मोठे बळ मिळणार आहे.
याचबरोबर, बालप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणाही करण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील चरित्रपट चित्रपटांसोबतच बालचित्रपट निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नवोदित तसेच अनुभवी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळणार असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.
‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १३ : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या समवेत आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध घटक, पुनर्वसन प्रक्रिया, स्थानिकांच्या अपेक्षा तसेच भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि परिसराचे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास यावेळी श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
ग्रामस्थानी प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. परिसरातील १५० घरांना इतरत्र जागा देऊन चांगल्या गावाची रचना करण्यात येत आहे, जेणेकरून भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था बदलेल. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बस स्थानक आदींचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. इथे करण्यात येणाऱ्या सुविधेमुळे भाविकांची संख्या वाढेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, भीमाशंकर गावाचे नियोजित पुनर्वसन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मूळ गावापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सुमारे १०.५ एकर क्षेत्रात ‘हेरिटेज वाडी’ विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात येणार आहे.
स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ४० हून अधिक व्यावसायिक युनिट्सची तरतूद करण्यात आली आहे. ‘विस्थापनाऐवजी पुनर्रचना’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून ग्रामस्थांचे सामाजिक व सांस्कृतिक नाते अबाधित ठेवत जवळच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’मध्ये वारसा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. ‘लाइव्हलीहुड अपग्रेडेशन’ संकल्पनेअंतर्गत नव्या वसाहतीचे नियोजन भाविक व पर्यटकांसाठी सेवा केंद्र म्हणून करण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांना पर्यटनाशी संबंधित विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, मंदिर परिसरातील जवळपास १०० टक्के रहिवाशांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यासाठी ‘झिरो फ्रिक्शन मॉडेल’चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविता येतील.
मुंब्रा-भेंडी बाजारात जाऊन विरोध करा’ मुंबई-मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “जैन समाज शांतताप्रिय आहे, पण याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत,” असे म्हणत त्यांनी जैन बांधवांना संयम राखण्याचे आवाहन केले.
निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे. जैन समाज हा नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारणारा समाज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी न पडता जैन बांधवांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले.”तुम्ही जर खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असाल, तर हे लक्षात ठेवा की बाळासाहेब ठाकरे यांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमीच प्रेम केले. त्यांनी कधीही या समाजांना त्रास दिला नाही,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.
यावेळी निलेश चंद्र मुनी यांनी संदीप देशपांडेंना थेट आव्हान दिले. “जर तुम्हाला खरंच रस्त्यांवरील धार्मिक प्रथा खटकत असतील, तर मुंब्रा, भेंडी बाजार किंवा पायधुनी भागात जा. ईद किंवा नमाजवेळी रस्त्यांवर पांढरे कापड टाकून लोक बसतात, त्यालाही विरोध करा,” असे ते म्हणाले.तसेच, “मुंब्रामध्ये एका नगरसेविकेने ‘मुंब्रा हिरवा करेन’ असे वक्तव्य केले होते, त्याविरोधातही भूमिका घ्या. फक्त एका समाजाला लक्ष्य करून वातावरण बिघडवू नका,” असा टोला त्यांनी लगावला.
दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील जैन मंदिराजवळील लेनमध्ये पांढऱ्या रंगाचे पट्टे रंगवण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला होता. यावर आक्षेप घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिकेला दुपारी ३ वाजेपर्यंत हे पट्टे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा स्वतः काळा रंग फासण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.या इशाऱ्यानंतर महापालिकेने तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणांवरील पांढरे पट्टे हटवण्यास सुरुवात केली.
हा संपूर्ण वाद घाटकोपरमधील एका सोसायटीतून सुरू झाला होता. युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी पांढऱी पट्टी रंगवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.प्रसाद वेदपाठक यांनी याला सार्वजनिक जागेचा धार्मिक वापर असल्याचे म्हणत विरोध दर्शवला. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि माध्यमांनीही तो उचलून धरला. वाढता विरोध पाहता संबंधित पांढऱ्या पट्ट्यांवर अखेर रंगकाम करण्यात आले.
घाटकोपरमधील पट्टे हटवल्यानंतर हा वाद संपल्याचे वाटत असतानाच आता दादरसह मुंबईतील इतर भागांतील अशाच पट्ट्यांवरून नवे वाद निर्माण होत आहेत. मनसे आणि जैन समाजातील शाब्दिक संघर्षामुळे हा मुद्दा आता केवळ सोसायटीपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला आहे. आगामी काळात या वादाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई-मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला (BMC) तातडीने कारवाई करावी लागली आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढरे पट्टे दुपारी 3 वाजेपर्यंत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मनसे कार्यकर्ते स्वतः त्या पट्ट्यांवर काळा रंग फासतील, असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर आणि अन्य साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पट्टे हटवण्याचे काम सुरू केले.दुसरीकडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावर वक्तव्य केले आहे. येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. या वादामागे कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.दादरमध्ये स्थानिकांनीही माध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या नावावर असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्थानिक म्हणाले.
नेमका वाद कशामुळे?
घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आली होती. धार्मिक परंपरेनुसार या पट्टीवरून धर्मगुरूंची वर्दळ व्हावी, या उद्देशाने ती आखण्यात आल्याचे सांगितले गेले.मात्र, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक जागेवर कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने उचलला मुद्दा
या प्रकरणाला सर्वप्रथम मोठी प्रसिद्धी मिळाली ती युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांच्या व्हिडिओमुळे. त्यांनी आपल्या सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर आक्षेप घेतला होता.वेदपाठक यांचा दावा होता की, सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी न घेता हे काम करण्यात आले. धार्मिक श्रद्धांचा आदर असला तरी सार्वजनिक जागेत अशा प्रकारचे वेगळेपण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
दादरमध्येही आढळले पांढरे पट्टे
घाटकोपरमधील वाद सुरू असतानाच दादर पश्चिमेतील बाबरेकर मार्गावरही अशाच प्रकारचे पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे समोर आले. जैन मंदिराजवळील लेनमध्ये सुरुवातीपासून ते गोकुळधाम इमारतीपर्यंत ही पट्टी काढण्यात आली होती.याची माहिती समोर येताच मनसेने तीव्र आक्षेप घेतला. संदीप देशपांडे यांनी हे सार्वजनिक रस्त्यांचे खासगीकरण असल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली.
मनसेचा आक्रमक पवित्रा
“रस्ते हे सर्वांसाठी आहेत. कोणत्याही धर्मासाठी किंवा समाजासाठी वेगळे चिन्हांकन करणे मान्य होणार नाही,” अशी भूमिका मनसेने घेतली.देशपांडे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर दादर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मनसे कार्यकर्तेही घटनास्थळी जमा झाले होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून महापालिकेने तातडीने हस्तक्षेप केला.
BMCची तातडीची कारवाई
वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पांढरे पट्टे हटवण्याचे काम सुरू केले. थिनर आणि अन्य साहित्याच्या मदतीने रस्त्यावरचे रंग पुसण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.महापालिकेच्या या कारवाईमुळे मनसेने दिलेला इशारा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक जागांचा वापर आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका यावर मोठी चर्चा रंगली आहे.एका बाजूला धार्मिक परंपरा जपण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी स्वतंत्र चिन्हांकन करणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.दादर आणि घाटकोपरमधील पट्टे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी या घटनेमुळे धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक नियम यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांबाबत प्रशासन कोणती स्पष्ट भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराज यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच आता तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे. आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी करता करता आता सीटचोरी करू लागला आहे, त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत आला आहे. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला पण ज्या फॉर्म २६ वर ही माहिती दिली नाही असा आक्षेप आहे, त्या पानावर अशा पद्धतीचा कोणताच कॉलम नाही मग ती माहिती तरी कशी दिली जाणार, हा प्रश्न आहेच. काँग्रेसने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण निवडणूक प्रक्रिया संपल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मुळात जी नोटीस होती ती नोटीसच चुकीची असून नटराजनन यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट करून तेलंगणातील न्यायालयाने ती नोटीसच रद्द केली आहे. भाजपामध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी, असेही सपकाळ म्हणाले..
भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ ही उपस्थित होते.
“मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, त्यामुळे आता शेतकरी हाच त्याचा खरा बाप आहे,”रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार
रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आंदोलनस्थळी उपस्थित राहून भावूक झाले. “मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, त्यामुळे आता शेतकरी हाच त्याचा खरा बाप आहे,” असे म्हणत त्यांनी मुलाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. रोहित पवार हे स्वतःच्या नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता घरात बसायचे की आंदोलनात सहभागी व्हायचे, हे ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजूनही धुंदीत असल्याची टीका करत त्यांनी कर्जमाफीतील जाचक अटी हटवण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
पंढरपूर-पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”माझे वडील, पत्नी आणि मुलं भावुक झाली आहेत. मुलं ‘बाबा लवकर घरी या’ असा निरोप देत आहेत, पण अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि इतर पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अटी का? असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मागण्यांची राज्य सरकारने दखल घेतल्याचे संकेत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिले आहेत. रोहित पवार यांच्याशी दोन वेळा फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. रोहित पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भातील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, सर्वांचे समाधान होणार नसले तरी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
राजकारण बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी करा- बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नत्याग आंदोलनाला’ आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. “सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये,” असे आवाहन करत थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात सरकारने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. सध्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अत्यंत तुटपुंजी असून ती जाचक अटींनी वेढलेली आहे, त्यामुळे सरकारने तात्काळ राजकारण बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. रोहित पवारांनी आक्षेप घेतलेल्या ‘त्या’ दोन जाचक अटी कोणत्या?
1) २०१९ च्या लाभाची अट: सरकारने काढलेल्या जीआरनुसार, ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता, त्यांना आताच्या कर्जमाफीत केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ दिला जाणार आहे.
2) प्रोत्साहन अनुदानाची अट: नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देताना सरकारने २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांचे पीक कर्ज पूर्ण भरणे अनिवार्य केले आहे. ३७ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार- रोहित पवार या अटींमागील गणित मांडताना रोहित पवार म्हणाले, “वरवर पाहता सरकारने ३५ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून मोठी वाहवा मिळवली असली, तरी प्रत्यक्षात या दोन जाचक अटींमुळे राज्यातील सुमारे ३७ लाखांहून अधिक शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.”
साधी सरळ मागणी, अटी काढा आणि आंदोलन संपवा आपली भूमिका स्पष्ट करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “आमची सरकारकडे कोणतीही क्लिष्ट मागणी नाही. ही अत्यंत साधी आणि सरळ मागणी आहे की, शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावणाऱ्या या दोन अटी सरकारने आधी जीआरमधून काढून टाकाव्यात. सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आमचे अन्नत्याग आंदोलन अधिक तीव्र होईल.”
मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे – हाके
पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू असतानाच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पवार कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणे म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे आहे,” असा टोला लगावत त्यांनी आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही मागणी केली.
महाराष्ट्रातील शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा आरोप करत हाके यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. पवारांचा वारस उपोषणाला बसणे हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली रोहित पवारांची भेट
सरकारच्यावतीने उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, DySp प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्याही फोनवर संपर्क घडवून आणला. यावेळी पुढील दोन-तीन दिवसांत… pic.twitter.com/LJZSVOylgm
पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनस्थळी प्रशासनाच्या शिष्टमंडळाने भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही घडवून आणण्यात आला. मंत्र्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याबाबत सरकारकडून सार्वजनिक आणि ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली. शेतकऱ्यांमध्ये या अटींविरोधात तीव्र संताप असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.
आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही विविध भागांतून शेतकरी संघटना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याने रोहित पवार यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“अन्नदात्याच्या न्यायासाठी सुरू केलेला हा लढा असून, विनाअट सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत माघार नाही,” अशी भूमिका रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.