Home Blog Page 17

हवाई दलाचे मालवाहू विमान क्रॅश, पायलटसह 5 ठार

आसामच्या जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी हवाई दलाचे एक विमान कोसळले. या अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा समावेश आहे. एक सह-वैमानिक जखमी झाला आहे.

विमान एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि त्याचे दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त ‘एएन-३२’ (AN-32) हे एक मालवाहू विमान होते. त्याचा वापर सैन्य आणि मालसामान वाहून नेण्यासाठी केला जात होता. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही; हवाई दलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवाई दलाने सांगितले की, हे विमान नियमित उड्डाणावर होते आणि प्राथमिक निष्कर्ष समोर येईपर्यंत लोकांनी कोणताही तर्क-वितर्क करू नये. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे (चौकशी समितीचे) आदेश देण्यात आलेत.
भारतीय वायुसेनेकडे अंदाजे 100 अँटोनोव्ह AN-32 टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमानांचा ताफा आहे. IAF ने सुरुवातीला सोव्हिएत-निर्मित अशी 125 विमाने खरेदी केली होती. सध्या सेवेत सक्रिय असणाऱ्या या विमानांचा आकडा 100 च्या आसपास आहे.

AN-32 ने 1980 पासून IAF च्या मीडियम-लिफ्ट वाहतूक क्षमतेचा कणा म्हणून काम केले आहे. उष्ण हवामान आणि हिमालयासारख्या उंच प्रदेशात ऑपरेशन दरम्यान त्याच्या मजबूतपणामुळे ते खूप महत्त्वाचे मानले जाते.
जानेवारी ते जून या कालावधीतील हवाई दलाचे विमान अपघात

21 जानेवारी 2026- उत्तर प्रदेशात भारतीय हवाईदलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान नियमित उड्डाणावेळी कोसळले. दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले. कोणतीही प्राण हानी झाली नाही. तथापि, चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी नेमण्यात आली.
7 फेब्रुवारी 2026- एक HAL तेजस लढाऊ विमान टेक-ऑफ करताना धावपट्टीवरून घसरले. नंतरच्या अहवालांमध्ये सॉफ्टवेअरमधील बिघाड हे या अपघातामागील खरे कारण असल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत पायलट बचावला, मात्र त्याला गंभीर दुखापती झाल्या.
5 मार्च 2026- आसाममधील कार्बी आंगलोंग प्रदेशात प्रशिक्षणावेळी Su-30MKI क्रॅश झाले. दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला. यापैकी एक पायलट ऑपरेशन सिंदूरशी संबंधित होता.
17 एप्रिल 2026- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाले. विमानाचा ‘अंडरकॅरेज’ म्हणजे विमानाचा खालचा भाग खराब झाला होता. यामुळे ते धावपट्टीवर आदळले. परिणामी धावपट्टी 11 तास बंद ठेवावी लागली.

विनामूल्य अभिनय मार्गदर्शन परिसंवाद शिबिर

पुणे-

दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे नवोदितांना थेट मार्गदर्शनपुणे : चित्रपट, नाट्य आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि कलावंतांसाठी दादासाहेब फाळके फिल्म इंस्टीट्युटच्या वतीने पुण्यात भव्य विनामूल्य अभिनय मार्गदर्शनपर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दादासाहेब फाळके फिल्म इंस्टीट्युटचे संस्थापक राजाराम कोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चित्रपट, नाट्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.परिसंवादात पद्मश्री दिग्दर्शक मधुर भांडारकर, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते रवी प्रकाश, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर विकी सिदाना, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक केदार आठवले, कंटेंट क्रिएटर विराज अवचिते, राहुल चव्हाण, सुनीता चव्हाण तसेच अभिनेते विजय आंधळकर यांसारखे दिग्गज सहभागी होणार आहेत.चित्रपटसृष्टीतील संधी, अभिनय प्रशिक्षण, ऑडिशनची तयारी, कास्टिंग प्रक्रिया, व्यक्तिमत्त्व विकास, व्हॉईस ट्रेनिंग, डिजिटल माध्यमांतील करिअरच्या संधी तसेच बदलत्या चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील प्रवाह याबाबत तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. नवोदित कलाकारांना उद्योगातील वास्तव समजून घेण्यासह यशस्वी करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या परिसंवादातून मिळणार आहे.चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या सर्व इच्छुकांनी या विनामूल्य परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुण्यात गुटखा विक्रीला आळा घाला; पतित पावन संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  • पतित पावन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
  • पुण्यातील गुटखा माफियांवर मोक्का लावा; स्वतंत्र FDA कार्यालय सुरू करा

पुणे : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पुणे शहरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप करत या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात गुटखा विक्रेते, साठेबाज, वाहतूकदार, वितरक आणि या अवैध व्यवसायातून आर्थिक लाभ घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुटखा विक्री ही केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून त्यामागे मोठे आर्थिक आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे

राज्य शासनाने बंदी घातल्यानंतरही पुणे शहरात अनेक भागांत सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबवून संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्वतंत्र, सुसज्ज आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल असे सक्षम कार्यालय सुरू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि इतर जनहिताच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष स्वप्निल नाईक म्हणाले, “गुटखा माफियांमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असताना केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग होणार नाही. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक लाभार्थ्यांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई झाली पाहिजे.”

प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण झंवर, पुणे शहराध्यक्ष मनोज पवार, शहर सरचिटणीस गुरु कोळी, शहर कार्याध्यक्ष संतोष शेंडगे, शहर उपाध्यक्ष विराज सांगळे, अशोक परदेशी, अजय कवठे, शहर संपर्कप्रमुख स्वप्निल आंग्रे, शहर सह-संपर्कप्रमुख शशिकांत तोडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात फसवणुकीचे रॅकेट चालविणारे ५ कॉल सेन्टर्स पोलिसांनी केले उध्वस्त

पुणे : पुणे पोलिसांनी तब्बल १५ दिवस तपास करुन हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात धडाडीची कारवाई करुन ५ ठिकाणावर छापे घातले तेथील ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून चालणारे फसवणूकीचे रॅकेट चालविणारे ५ कॉल सेंटर उद्ध्वस्त केले आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.ही कारवाई जवळपास १७ तास सुरु होती.

या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवुन लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास भाग पाडून त्यासाठी त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास लावून त्यांची फसवणूक करत होते. प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरवरुन दररोज ३०० ते ४०० जणांची ३० ते ४० लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे तपासामध्ये पुढे आले आहे. हे सर्व कॉल सेंटर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघा प्रमुख सुत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मध्यरात्री प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. पार्क इन्फिनिया सोसायटी, भेकराईनगर, मुळ रा. वेजणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. सिल्व्हर वुड सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.त्यांचा प्रमुख साथीदार अमित मजेटिया हा दुबई येथे असून भागिरथ पांड्या हा त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

निदा आरीफ अन्सारी (वय २१, रा. अपोलो हॉस्पीटल जवळ, गोपाळपट्टी मांजरी), पुनम अनंत भालके (वय २५, रा. लेन नं-१३, भेकराईनगर, तुकाई दर्शन हडपसर), अनुजा शरद जाधव (वय २५, रा. गायकवाड हॉस्पीटल जवळ, केशवनगर मुंढवा), रविंद्र कृष्णा कुरळे (वय ४०, रा़ सर्वे नंबर-२०९, भागीरथी नगर, साधूनाना तुपे वस्ती, हडपसर), अक्षय झिबु पाटील (वय २५, रा. थिटेवस्ती), विवेक विलास जाधव (वय ३०, रा अर्जुन कॉम्पलेक्स फुरसुंगी रोड, भेकराईनगर, हडपसर),

प्रांजल अनिल मिश्रा (वय २३, रा. औदुबर कॉलनी, काळेपडळ), सागर कैलास उसरे (वय ३०, रा.पापडे वस्ती फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण कॉल सेंटरमध्ये कामाला होते. ही कारवाई अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल, भेकराईनगरमधील अ‍ॅपेक्स अ‍ॅचीव्हर व जे के एल इंडिया सोल्युशन यांच्या ५ ठिकाणावर १० जून रोजी दुपारी ४ वाजता सुरु झाली. सलग १७ तास पंचनामा व इतर बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज राजेंद्र पोमम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्स येथे बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालविले जात असून तेथून लोकांना ऑनलाईन गेमिंग खेळायला लावून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून फसवणूक केली जात असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली. या ऑनलाईन गेमिंग मध्ये फसल्या गेलेल्या तरुणांकडूनही मुंढवा पोलिसांना याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी या कॉल सेंटरची माहिती काढून सायबर पोलीस आणि हडपसर पोलीस यांच्या मदतीने या ठिकाणी छापे घातले. या कॉल सेंटरमध्ये संतोष वेंजणेकर याने तरुणांना कामाला ठेवून त्यांच्याकडून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन त्यांच्यामध्ये फेरफार करुन सीम कार्ड घेऊन व बनावट बँक खाती उघडून त्याचा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापर केला.

या ठिकाणी पोलीस छापा कारवाई करत असताना संतोष वेंजणेकर याच्याकडे पिस्टल व ६ जिवंत काडतुसे सापडली आहे. त्याचबरोबर त्याने या कॉल सेंटरमध्ये ५ अल्पवयीन मुले, मुली यांना कामास ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर काम जबरदस्तीने करुन घेऊन त्यांचे शोषण केले आहे.
या कॉल सेंटरमधून नागरिकांना कॉल करुन त्यांना कंपनीचे वेबसाईटद्वारे गेमिंग खेळण्यास सांगून त्यांचा अगोदर विश्वास संपादन करत. त्यानंतर नागरिकांना ऑनलाईन गेमिंग खेळण्याकरीता पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत. सुरुवातीला नागरिक काही गेम जिंकतात. त्यानंतर पुढे ते सतत गेम हारत जातात. त्यांना तुमचे पैसे परत मिळण्याची संधी आहे, असे सांगून आणखी पैसे ट्रान्सफर करायला लावले जात होते.

यातील प्रमुख सुत्रधार संतोष वेंजणेकर आणि विनायक इक्के आहेत. अमित मजेटिया हा दुबईला असून तो या सर्वांना मदत करत होता. भागिरथ पांड्या हा या सर्वांचे आर्थिक व्यवहार पहात असे. आलेले पैसे कोठे, कसे ट्रान्सफर करायचे हे काम तो पहात असे. या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

या ५ ठिकाणाहून हार्ड डिस्क, एसएसडी, अ‍ॅटो डायलर मशीन, सीम कार्ड, सर्व्हररुम मधील हार्ड डिस्क, कागदपत्रांच्या फाईल्स, कंपनीच्या नावाचे शिक्के, विविध बँक खात्याचे चेक बुक, पासबुक, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, सीसीटीव्ही डिव्हीआर, ग्राहक संभाषण स्क्रिप्ट, सीम बॉक्स, सोन्याचांदी चे दागिने, रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकांची डेबीट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड मोबाईल फोन तसेच एक पिस्टल व ६ जिवंत काडतुसे असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली. त्यातील इतर १० कामगारांना नोटीस देण्यात आली. अटक केलेले दोघे जण अनेक तास पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना २४ तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक होते. त्यासाठी मध्यरात्री साडेबारा वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती नसलेला इतिहास अभ्यासा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश माझ्याप्रमाणेच आपल्या सर्वांमध्ये आहे. महाराष्ट्रातील आपण सर्वच छत्रपतींचे वंशज आहोत. ही संपूर्ण आपल्या महाराष्ट्र आणि देशाची लिगसी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती असलेला इतिहास आपल्यासमोर सातत्याने येतो. शिवाजी महाराजांच्या काळातील ठराविक घटनाची माहिती आपल्याला सांगितली जाते. या पलीकडे असणारा इतिहास हा फार मोठा आणि प्रेरणादायक असून, तो आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचे थोर कार्य जाणून घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘छ्त्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या कार्यशाळेत शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, विश्वस्त राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे , विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संगीता जगताप, सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, इराण आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या युद्धात इराणने महासत्ता असलेल्या अमेरिकेला चांगली टक्कर दिली आहे. त्यामुळे अमेरिकेला युद्ध जिंकता आलेले नाही. रशियालाही एकतर्फी युद्ध जिंकता आलेले नसून, मोठे नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, छत्रपतींनी एकाचवेळी तीन लढाया लढणे ही अत्यंत जोखमीची कामगिरी उत्तम पद्धतीने केली. या लढाईसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात आले. या लढाया लढण्यासाठी छत्रपतींनी जनतेवर अधिकचा कर किंवा कोणतीही अतिरिक्त वसुली केली नाही. हे आजच्या काळात शिकण्यासारखे आहे. आपण याचा विचार करायला हवा. या घटनांचा आपण सर्वांनी कार्यशाळेच्या निमित्ताने अभ्यास करायला हवा. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून, त्यामध्ये कर्तुत्वावर जबाबदाऱ्या दिल्या. गडावरील बाजारपेठेची निर्मिती, पाण्याचे तळे उभारणे ही कौशल्ये अभ्यासण्यासारखी आहेत. महाराजांच्या गडकिल्ल्यांची दाखल युनेस्कोने घेतली असून, त्याद्वारे महाराजांचा इतिहास सातासमुद्रापार पोहोचण्यासाठी मदत झाली आहे. महाराजांचे आरमार आणि त्याचे व्यवस्थापन कौशल्य हे कमालीचे होते. त्याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. महाराजांचे गुण आपण रोजच्या जीवनात आणून, वैभवशाली इतिहास जगायला हवा, असेही भोसले यांनी सांगितले.

डॉ. गोसावी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य आताच्या लोकांपर्यत पोहोचविणे फार महत्त्वाचे आहे. महाराजांनी गड किल्ले बांधताना भरपूर अभ्यास केला. त्यामुळे हे वैभव आजही टिकून आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला महाराजांचा खरा इतिहास पोहोचवायचा आहे. या विषयावर दोन क्रेडीटचा अभ्यासक्रम सुरू करता येईल, याची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. गोसावी यांनी सांगितले.

पांडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लेखन विपुल आहे. पण, त्यांची विविध कौशल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांनीच महाराजांच्या कौशल्यांवर आधारित, विविध प्रसंगांवर आधारित छोट्या पुस्तिका तयार करून विविध भाषांत देशभरात एनबीटीमार्फत पोहोचवल्या जाणार आहेत, असे पांडे यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सदस्य सुनील महाजन यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. मंठाळकर यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आयोजित कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना लेखक होता येईल. त्यांनी लिहिलेल्या लेखांचे पुस्तक करता येईल.विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला विकसित वाचक तयार करावे लागतील. वाचन संस्कृतीचा सक्षम करणारे विविध उपक्रम आणि कार्यशाळा एनबीटीच्या माध्यमातून देशभरात करण्यात येतात. या कार्यशाळेतून महाराजांचे लष्करी नेतृत्व, पर्यावरण, व्यवस्थापन कौशल्य, मानसिकदृष्ट्या सक्षम होणे अशा अनेक पैलूंचा अभ्यास करता येणार आहे. शिवरायांचे प्रत्येक पाऊल सार्वभौमत्वाकडे नेणारे होते. शिवरायांचे अधिष्ठान, भाषाशुद्धी, अष्टप्रधान मंडळ, मंदिर पुनर्निर्माण, नाणी, कालगणनेसाठी शिव शक अशा प्रत्येक बाबीचा अभ्यास करणे शक्य आहे. महाराजांनी स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म ही त्रिसूत्रीवर आपल्यावर रुजवली असून, त्यावर अधिक काम करायला हवे, असे एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, दि. १२ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून, याबरोबर राज्यातील इतर संताच्या पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आज पर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत झुंबर हॉल, पुणे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली – उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

पावसाळ्याच्या कालावधीत वारी होत असल्याने पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावा स्थळांवर चिखल होणार नाही यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील अपूर्ण कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवून शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, अन्नपदार्थांतील भेसळ रोखणे आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर विशेष भर देण्याचे निर्देश देत श्रीमती पवार म्हणाल्या की, आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी. चंद्रभागा नदी परिसरात आवश्यक तेथे बचाव पथके आणि नौकांची व्यवस्था करावी.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, छेडछाड, चोरी व अन्य गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत कमानी, फलक किंवा इतर संरचनांमुळे अपघात होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून श्रीमती पवार यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश केले.

बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्यानुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पुढील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त शितल तेली – उगले यांनी मागच्या आठवड्यात तिन्ही जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी करून सर्व सोय सुविधाची पाहणी केल्याचे सांगून जिथे जिथे कामं अपूर्ण आहेत, त्या कामाला गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. यावेळी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा दिला.

उपमुख्यमंत्री यांची तत्परता

पैठण, मुक्ताईनगर, जळगाव ,कौडीन्यपूर, अमरावती येथून येणाऱ्या पालख्यांनी छत्रपती संभाजी नगर विभागातील सुविधा बाबतअशीच बैठक घेवून नियोजन करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त यांना फोन लावून या सर्वांची बैठक लावून यांच्या सर्व अडचणी सोडवाव्यात असे निर्देश दिले. त्यावेळी सर्व संस्थानच्या विश्वस्तानी आनंद व्यक्त केला.

भाजपा दुसऱ्यांचे पक्ष गिळणारी चेटकीण.

..राज्यात आंधळं बहिरं व मुकं सरकार..खरिप हंगामासाठी महायुती सरकारची काहीही तयारी नाही, बि-बियाणांची टंचाई, खतांची लिकिंग सुरु

मुंबई, दि. १२ जून २०२६.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. दारिद्रय रेषेखाली जाणे व वर येणे ही एक प्रक्रिया आहे असे बेजबाबदार वक्तव्य करत मोदी सरकारच्या काळात गरिबी निर्मलून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सांगताना देशातील ८० कोटी जनतेला मोदी सरकारच ५ किलो धान्य रेशनवर मोफत देते याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. गरिबी निर्मुलन झाले तर हे ८० कोटी लोक कोण आहेत? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली अशीही धादांत खोटी थाप मारून ते मोकळे झाले. अशा थापाड्या मुख्यमंत्र्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला, सपकाळ पुढे म्हणाले की, स्वामीनाथन समितीची स्थापना काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या (२००४-२०१४) वेळी करण्यात आली होती व त्याचा अहवालही त्यावेळी प्राप्त झाला होता पण त्याची अंमलबजावणी करण्याआधीच केंद्रात सत्ताबदल झाला व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आले. या मोदी सरकारने स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवला पण मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली असे देवेंद्र फडणवीस धादांत खोटे सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशा कोणत्याही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामीनाथन समितीचा अहवाल तरी वाचलेला आहे की नाही आणि अण्णा हजारे तर यावरही गप्पच आहेत. भाजपा व देवेंद्र फडणवीस मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामाचा ढोल बडवत आहेत तर या १२ वर्षात मोदी सरकारने नेमके काय केले याची श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती मांडावी. किती बांग्लादेशी, रोहिंग्यांना परत पाठवले हेही पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेईन सांगितले पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

खरिप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात बि बियाणांची टंचाई आहे, खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही. पूर्वी राजे महाराजे राज्यात परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी वेशांतर करून जात व वस्तुस्थिती जाणून घेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेशांतर करून जातात पण दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी असा टोला सपकाळ यांनी लगावत फडणवीसांचे सरकार हे ‘आंधळे, बहिरे व मुके’ आहे असे म्हटले आहे.

काँग्रेस डुबतं जहाज आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विधानाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष या देशाची आशा आहे,. काँग्रेस पक्ष या देशाचा डीएनए आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच आव्हान देऊ शकतो. आणि २०१४ मध्ये जे काँग्रेसमुक्त भारत करण्याचा वल्गना करत होते, त्यांचा पक्षच आज काँग्रेसयुक्त झाला आहे. फडणविसांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतील. भाजपा मात्र मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ आहे, असेही सपकाळ म्हणाले.

या पत्रकार परिषदेला नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार हे उपस्थित होते.

आता कंबोडियामध्येही भारतीय पर्यटकांना यूपीआय (UPI) पेमेंटची सोय

मुंबई: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL), ACLEDA बँक पीएलसी (ACLEDA Bank Plc.) च्या भागीदारीत, कंबोडियाचा राष्ट्रीय QR कोड KHQR द्वारे कंबोडियामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कंबोडियातील पनोम पेन्ह (Phnom Penh) येथे आयोजित एका औपचारिक समारंभात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास नॅशनल बँक ऑफ कंबोडिया (NBC) च्या गव्हर्नर डॉ. चिया सेरे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे कंबोडिया आणि भारत यांच्यातील सीमापार QR पेमेंट जोडणीच्या पहिल्या टप्प्याचा अधिकृत शुभारंभ झाला.

आता भारतीय युझर्स त्यांच्या UPI-सक्षम ॲप्सचा वापर करून कंबोडियामधील 45 लाखांहून अधिक ठिकाणी बाकॉन्गच्या (Bakong) ‘KHQR’ (कंबोडियाची प्रमाणित आणि परस्पर-सुसंगत QR कोड प्रणाली) द्वारे सुरक्षित आणि विनाअडथळा QR पेमेंट करू शकतात. पुढील टप्प्यात, कंबोडियातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या देशातील पेमेंट किंवा बँकिंग ॲप्सद्वारे भारतातील लाखो UPI QR-सक्षम व्यापारी ठिकाणांवर पेमेंट करण्याची सुविधा मिळेल; यामुळे दोन्ही देशांदरम्यान परस्पर-सुसंगत असा आर्थिक देवाणघेवाणीचा मार्ग (पेमेंट कॉरिडॉर) निर्माण होईल.

या उपक्रमामुळे सलग, रिअल-टाइम आणि परस्पर-सुसंगत डिजिटल व्यवहार शक्य होतील तसेच भारत-कंबोडिया पेमेंट कॉरिडॉरमधील पेमेंट प्रक्रियेची कार्यक्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात, कंबोडियातील व्यापाऱ्यांना भारतीय ग्राहकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल, तसेच रोख रकमेचे व्यवस्थापन सुधारल्यामुळे आणि प्रत्यक्ष चलनावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे त्यांची ऑपरेशनल क्षमता वाढेल.

सीमापार डिजिटल पेमेंटचे विश्वसनीय पर्याय उपलब्ध करून देण्याने, हा सहयोग प्रवाशांची सोय वाढवेल आणि त्याचबरोबर दोन्ही देशांमधील पर्यटन तसेच  व्यावसायिक संबंध अधिक दृढ करेल.

एनपीसीआय इंटरनॅशनलचे एमडी आणि सीईओ रितेश शुक्ला म्हणाले, “विश्वसनीय भागीदारींच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपाय जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कंबोडियामध्ये यूपीआय (UPI) स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना परिचित, सुरक्षित आणि अखंड पेमेंटचा अनुभव मिळतो, तर दुसरीकडे कंबोडियातील व्यापाऱ्यांना डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. हा सहयोग केवळ दोन्ही देशांमधील रिअल-टाइम पेमेंट कनेक्टिव्हिटीच मजबूत करत नाही, तर पर्यटन आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठीचा पायाही रचतो.”

अ‍ॅक्लिडा बँक पीएलसी (ACLEDA Bank Plc.) चे अध्यक्ष आणि समूह व्यवस्थापकीय संचालक डॉ. इन चॅनी यांनी सांगितले: “सीमापार आंतर-कार्यक्षमता उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यामुळे भारतीय प्रवाशांना आमच्या विस्तृत KHQR मर्चंट नेटवर्कवर UPI-सक्षम ॲप्लिकेशन्सद्वारे सुरक्षित डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे. ही भागीदारी आमच्या डिजिटल परिवर्तनाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

कंबोडिया आणि भारताच्या पेमेंट गेटवेचे एकत्रीकरण करून, आम्ही प्रवाशांसाठी प्रत्यक्ष व्यवहारातील अडथळे आणि परकीय चलनातील अस्थिरता दूर करत आहोत. या समन्वयामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना एका वेगवान डिजिटल बाजारात थेट प्रवेश मिळतो, तरलता व्यवस्थापन सुधारते आणि सुरक्षित, रिअल-टाइम सेटलमेंट प्रोटोकॉलद्वारे कार्यान्वयन कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे ते सक्षम होतात. थोडक्यात काय तर, हे सहकार्य मजबूत आणि विस्तारक्षम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला चालना देते आणि द्विपक्षीय आर्थिक कॉरिडॉरला अधिक बळकट करते.”

पुण्यातील एयूएम तीन वर्षांत दुप्पट; महाराष्ट्राच्या म्युच्युअल फंड वाढीच्या प्रवासात पुणे ठरले महत्त्वाचे केंद्र:ए. बालसुब्रमण्यन

पुणे-

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्‍हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे.

बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत.

“ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्‍यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील,” असे बालसुब्रमण्यन म्हणाले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे.

बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्‍यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्‍हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्‍हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.

15 ते 21 जून 2026 दरम्यान होणाऱ्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) साठी मुंबई सज्ज


‘गुड लक टू यू ऑल’ (ॲनिमेशन),’अगापिटो'(लघुकथापट) आणि ‘टाइम अँड वॉटर'(माहितीपट) या चित्रपटांच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा प्रारंभ

स्पर्धा आणि बिगर स्पर्धा विभागात 46 देशांचे 346 चित्रपट प्रदर्शित होणार, एआय सिनेमा हॅकेथॉन, नवे प्रादेशिक विभाग आणि उद्योगांचा वाढता सहभाग, मिफ्फ 2026 चे ठळक वैशिष्ट्य ठरणार

वेव्हज डॉक बझार अंतर्गत 155 प्रवेशिकांचा समावेश, मिफ्फ मध्ये बी 2 बी उद्योगाचा भक्कम सहभाग

एनएफडीसी आणि फिल्म सिटी यांच्या सहयोगाने 19 व्या ‘मिफ्फ’ मध्ये निवडक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई, 12 जून 2026

19 व्या (MIFF- मिफ्फ) अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात सहभागी होणारे जगभरातील चित्रपट निर्माते, कथाकार, चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि चित्रपटप्रेमींचे स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. 15 ते 21 जून 2026 या कालावधीत आयोजित होणारा, नॉन-फीचर चित्रपटांसाठीचा बहुप्रतिक्षित द्वैवार्षिक चित्रपट महोत्सव, सर्जनशीलता, संस्कृती, नवोन्मेष आणि जागतिक सिनेमॅटिक प्रतिभेचा चैतन्यमय संगम घडवेल.  

मिफ्फ 2026 ला जगभरातून 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिकांसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे  एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज आयोजित उद्घाटन-पूर्व पत्रकार परिषदेत सांगितले. स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे, यात 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट 13 देशांमधील चित्रपट निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करतील. बिगर-स्पर्धा विभागात एकूण 202 चित्रपट दाखवले जातील, यात 106 आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि 46 सहभागी देशांतील 96 चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 83 तासांहून अधिक कालावधीचे स्क्रीनिंग (चित्रीकरण) सादर केले जाईल. हा विभाग मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमुंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी चित्रपट, यासारख्या 24 निवडक विभागांमध्ये आयोजित केला जाईल. यामध्ये प्रशंसेला पात्र ठरलेले चित्रपट, उदयोन्मुख आवाज आणि प्रादेशिक कथाकथनाला एकाच व्यासपीठावर एकत्र आणेल. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अॅटनबरो यांना, ‘सेंटेनरी ट्रिब्युट’ अंतर्गत त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केले जाईल.

या प्रसंगी बोलताना, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या, “मिफ्फ हा महोत्सव नॉन-फीचर (लघुपट आणि माहितीपट) चित्रपटांसाठी आशियातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. हा महोत्सव, जगभरातील चित्रपट निर्माते, निर्माते, प्रसारक, विद्यार्थी, समीक्षक आणि प्रेक्षकांना एकाच छताखाली आणतो.”

मराठी चित्रपट विभागावर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या की, या उपक्रमामुळे मराठी कथासादरीकरण, संस्कृती, वारसा आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल. त्यांनी पुढे नमूद केले की, महाराष्ट्र केवळ भारताचे प्रमुख चित्रीकरण स्थळ  म्हणूनच नाही, तर अर्थपूर्ण आणि प्रभावी कथासादरीकरणाचे एक जागतिक प्रमुख केंद्र (ग्लोबल हब) म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज आहे.

माहितीपट, लघुकथापट आणि अ‍ॅनिमेशनपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाची सुरुवात या तिन्ही स्वरूपांमधील चित्रपटांच्या खेळांनी होईल. उद्घाटनपर चित्रपटांमध्ये कॉर्डेल बार्कर (कॅनडा) दिग्दर्शित ‘गुड लक टू यू ऑल’ या अ‍ॅनिमेटेडपटाचा, अर्विन बेलारमिनो आणि कायला डॅनियल रोमेरो (फिलिपिन्स) दिग्दर्शित ‘अगापितो’  या शॉर्ट फिक्शनचा आणि सारा डोसा (अमेरिका आणि आइसलँड) दिग्दर्शित ‘टाइम अँड वॉटर’ या माहितीपटाचा समावेश असेल.

18 जून रोजी नियोजित असलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार (‘मिड-फेस्ट’ लाईनअप) अँड्रिया झेलेसोव्हा (चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया) दिग्दर्शित ‘ईनी, मीनी, मायनी, मो!’ हा अ‍ॅनिमेटेडपट, अल्ताय उलान यांग (अमेरिका) दिग्दर्शित ‘हायना’ हा शॉर्ट फिक्शन आणि मॉरिस फ्रायबर्गहॉस (स्वित्झर्लंड) दिग्दर्शित ‘आय लव्ह यू, आय लीव्ह यू’ हा माहितीपट दाखवला जाईल. हे सर्व चित्रपट वैविध्यपूर्ण कथासादरीकरण शैली आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन सादर करतील.

या महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक श्रेणींमध्ये 18 पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्काराचे स्वरूप एकूण 45 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, पुरस्कार   आणि प्रमाणपत्र असे असेल. दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षात दिला जाणारा प्रतिष्ठित ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’, हे उद्घाटन समारंभाचे मुख्य आकर्षण असेल.

19 व्या ‘मिफ्फ’ मध्ये प्रसिद्ध चित्रपट क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्गदर्शन सत्रांचे (मास्टरक्लासेस) देखील आयोजन केले जाईल; यामध्ये चित्रपट निर्मिती, कथासादरीकरण, अभिनय, पटकथा लेखन आणि सिनेमॅटोग्राफी या विषयांचा समावेश असेल. ‘इंडियन डॉक्युमेंट्री प्रोड्युसर्स असोसिएशन’ (आयडीपीए) या भारतीय माहितीपट निर्माता संघटनेद्वारे 19 व्या ‘मिफ’ मधील चित्रपट प्रदर्शनांच्या सोबत, पाच मुक्त चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसी च्या संकुलाव्यतिरिक्त, चित्रपटांचे खेळ, दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि विलेपार्ले येथील ‘एस व्ही के एम चे उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स’ हे महाविद्यालय,तसेच वांद्रे पश्चिम येथील ‘सेंट पॉल्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन’ या दोन महाविद्यालयांमध्येही केले जाईल.

यावर्षीच्या आवृत्तीमध्ये दोन विशेष विभाग सुरु करण्यात आले आहेत – ‘मराठी चित्रपट’ आणि ‘एकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’.या विभागांच्या माध्यमातून प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनोख्या कलात्मक अभिव्यक्तींचा आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा गौरव करणे हा त्यामागील उद्देश आहे. वेव्ह्ज डॉक बाजार विभागात उद्योगाभिमुख निवडक माहितीपट प्रदर्शित केले  जाणार असून, माहितीपट क्षेत्रातील प्रतिभांना प्रोत्साहन आणि उद्योग-जगताशी संवाद साधण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून त्याचे स्थान पुन्हा अधोरेखित होईल. या वर्षी एकूण 155 प्रवेशिका प्रदर्शित केल्या जातील, त्यासोबतच ‘वर्क इन प्रोग्रेस (WIP) लॅब’मधील 5 प्रकल्प आणि ‘फिल्म बाजार रेकमेंड्स’ अंतर्गत 12 चित्रपट असतील, तसेच हे सर्व 155 चित्रपट  उद्योग क्षेत्रातील संबंधितांना पाहण्यासाठी व मूल्यमापनासाठी  ‘व्ह्यूइंग रूम’मध्ये उपलब्ध असतील.  या विभागाद्वारे प्रभावी B2B नेटवर्किंगला चालना दिली जाणार असून, नेटफ्लिक्स, झी, सोनी, स्टेज ओटीटी आणि वेव्ह्ज ओटीटी यांसारख्या अग्रगण्य प्लॅटफॉर्म्स आणि  प्रसारकांचा बैठकींसाठी सहभाग निश्चित झाला आहे. यामुळे माहितीपटांच्या शोध, सहनिर्मिती आणि वितरणासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून या विभागाची ओळख आणखी दृढ होणार आहे.

मिफ्फ  मध्ये यंदा प्रथमच “मुंबई थ्रू अ थाऊजंड आइज” या शीर्षकाखाली एआय सिनेमा  हॅकॆथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कथाकथनाच्या नव्या शक्यता शोधणारी ही 48 तासांची जागतिक चित्रपटनिर्मिती स्पर्धा असेल. याशिवाय, महोत्सवात नामवंत चित्रपट निर्माते आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागासह 10 मास्टरक्लासेस तसेच विविध विषयांवरील पॅनेल चर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे.


मिफ्फ 2026 साठी विद्यार्थ्यांची नोंदणी विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

पत्र सूचना कार्यालयाने सुरु केलेली विशेष मीडिया मायक्रोसाइट https://www.pib.gov.in/MIFF/2026 मिफ्फ संबंधित अधिकृत माहितीचे सर्वसमावेशक डिजिटल केंद्र असेल. या प्लॅटफॉर्मवर महोत्सवाशी संबंधित अधिकृत वृत्तांकन, छायाचित्रे आणि विविध मल्टिमीडिया सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

पुणे, दि. १२: पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड, अवजड व मल्टी अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार दि. १५ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. २४ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. संबंधित वाहनांसाठी सोलापूर, मुंबई, अहिल्यानगर, सासवड, चाकण, शिक्रापूर, तळेगाव, जेजुरी, सुपे आदी मार्गांद्वारे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

शहरात माल उतरविणे अथवा माल भरून इतरत्र जाणे आवश्यक असलेल्या तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी वाहतूक शाखा, पुणे शहर यांची ७२ तास अगोदर परवानगी घेऊन रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल आदी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

“राजहंस दूध संघाचा सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे सहकार क्षेत्रातील नवा आदर्श; आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार”

संगमनेर, दि. १२ जून २०२६ : “थोर स्वातंत्र्यसैनिक व सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला राजहंस दूध संघ आज गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरीहित यांचा आदर्श ठरला आहे. संघाने उभारलेला दीड मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा केवळ ऊर्जा बचतीचा नव्हे, तर सहकार क्षेत्राला शाश्वत विकासाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे,” असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सुमारे ४.५ कोटी रुपये खर्चाच्या दीड मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी “राजहंस क्वालिटी मिशन” अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संघाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळाही उत्साहात पार पडला.

थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला “राजहंस दूध” हा ब्रँड आज महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेल्या राजहंस दूधाने गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरीहित जपत दुग्धव्यवसाय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. दररोज सुमारे ४ लाख लिटर दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री करणारा हा संघ राज्यातील तालुकास्तरावरील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक मानला जातो.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख, संघाचे पदाधिकारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, दि.१२: बारामती तालुक्यातील कटफळ येथे २० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहे. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील, यादृष्टीनेही कामे करावीत, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, क्रीडा संकुल समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, कै भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन करण्याबाबत प्रास्तावित करण्यात आले असून येत्याकाळात पर्जन्यमान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच पालखी सोहळ्याचा विचार करुन स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) देखभाल दुरुस्तीबाबत आराखडा तयार करुन सादर करावा. बैठकीत क्रीडा विषयाच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली, सकारात्मक चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रतिभावंत खेळाडू घडविण्यावर क्रीडा विभागाने भर द्यावा, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

या बैठकीत श्री. लकडे यांनी क्रीडा संकुल देखभाल दुरुस्ती, नवीन क्रीडा साहित्य खरेदी, सार्वजनिक बांधकाम विभागाला लागणारा निधी वर्ग करणे आदी विषयांवर माहिती आली.

यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते हिंद केसरी महेंद्र गायकवाड, जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नितीन पवळे, गोकर्ण शर्मा तसेच जागतिक ट्रेडीशनल ग्रुप व हँडसेट खेळात सुवर्णपदक विजेता निरल वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, दि. १२: शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये समावेश करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. जिल्ह्यात अधिकाधिक रस्ते निर्माण करण्यात यावेत, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यावेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळणार आहेत. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासह त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते निर्माण करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

योजनेच्या प्रगतीचा आढावा दरमहा बैठक आयोजित घेण्यात येईल, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुढील बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित करावे, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

यावेळी श्री. जगदाळे यांनी या योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केली. जिल्ह्यात रस्ते निर्मितीच्या कार्यात सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. जगदाळे म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने निश्चित केलेले कंत्राटदारांची सूची (पॅनल), कमी दराची निविदा (एल १) दर, मोजणी करुन निश्चित केलेले ५०५ रस्ते आदीबाबत माहिती दिली तसेच मोजणी झालेल्या रस्त्यांचे आठवड्याभरात काम सुरु करणार असल्याचे श्री. डुडी यांनी सांगितले.
0000

शिक्षण मंडळाचा भ्रष्टाचार थांबवा अन्यथा आंदोलन – चेतन पवार

पिंपरी, पुणे (दि. १२ जून २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर मनपाने गोर गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे मनपाचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये आणि मनपाचे खासगीकरण थांबवावे नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली काटकर, वैशाली कुलथे, पिंपरी उपशहर प्रमुख अमोल निकम, समन्वयक पार्थ गुरव, उपशहर प्रमुख दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील शाळेचे आरक्षण ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन यांना भाडे कराराने देऊ नये. भूमी जिंदगी कार्यालय कडून भाडे प्रती चौरस फुट ३ रु ६० पैसे असा ठरविण्यात आले आहे. हे सर्व संशयास्पद असून नक्की कोणत्या आधारे हा दर ठरविण्यात आला आहे हे स्पष्ट करावे. तेथे पिंपरी चिंचवड मनपा कडून गोर गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या दर्जेदार स्वरूपाची शाळा उभारावी. तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस यांना कोणतीही निविदा प्रक्रिया न करता हा ठराव पास करण्यात आला हे कोणाच्या दबावात झाले. याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच यामध्ये गणवेशाची रक्कम वाढवून दाखवण्यात आली आहे, हा ठराव रद्द करून याची कायदेशीर निविदा प्रक्रिया करावी.
तसेच पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीची दुरवस्था झाली आहे. पवना नदीत राडारोडा टाकून नदीपात्र छोटे करण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी डायरेक्ट पाईप लाईन द्वारे अस्वच्छ पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तर रावेत हायवे वरील ब्रीज खाली अनेक लोक जुगार खेळत असून नदीत कचरा टाकतात.
ताथवडे येथील सर्वे नं ६४/२/१ मधील जागा बिल्डरकडून विकसित होत असताना नगररचना विभागाकडून अभिप्राय घेतला असता सदरील जागेत नाला असे दाखविले आहे. परंतु प्लॅन पास करताना नाला सी आकारात शिफ्ट करण्यात आला असून त्यामुळे अनेक लोकांचे नुकसान होणार आहे. या ठिकाणाचा बांधकाम परवाना रद्द करावा.
तसेच ताथवडे गाव येथील जिल्हा परिषदेची शाळा महानगर पालिकेकडे वर्ग करण्याबाबत २०१३ साली शासन आदेश होवून सुद्धा आज पर्यंत ती वर्ग करून घेत नाही असा मनमानी कारभार महानगरपालिकेत सुरू आहे. याला पायबंद घालावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनचा इशारा यावेळी शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिला.