संगमनेर, दि. १२ जून २०२६ : “थोर स्वातंत्र्यसैनिक व सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला राजहंस दूध संघ आज गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरीहित यांचा आदर्श ठरला आहे. संघाने उभारलेला दीड मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा केवळ ऊर्जा बचतीचा नव्हे, तर सहकार क्षेत्राला शाश्वत विकासाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे,” असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सुमारे ४.५ कोटी रुपये खर्चाच्या दीड मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी “राजहंस क्वालिटी मिशन” अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संघाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळाही उत्साहात पार पडला.
थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला “राजहंस दूध” हा ब्रँड आज महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेल्या राजहंस दूधाने गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरीहित जपत दुग्धव्यवसाय क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. दररोज सुमारे ४ लाख लिटर दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री करणारा हा संघ राज्यातील तालुकास्तरावरील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक मानला जातो.
यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख, संघाचे पदाधिकारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

