- पतित पावन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
- पुण्यातील गुटखा माफियांवर मोक्का लावा; स्वतंत्र FDA कार्यालय सुरू करा
पुणे : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पुणे शहरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप करत या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात गुटखा विक्रेते, साठेबाज, वाहतूकदार, वितरक आणि या अवैध व्यवसायातून आर्थिक लाभ घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुटखा विक्री ही केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून त्यामागे मोठे आर्थिक आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे
राज्य शासनाने बंदी घातल्यानंतरही पुणे शहरात अनेक भागांत सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबवून संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्वतंत्र, सुसज्ज आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल असे सक्षम कार्यालय सुरू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि इतर जनहिताच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष स्वप्निल नाईक म्हणाले, “गुटखा माफियांमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असताना केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग होणार नाही. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक लाभार्थ्यांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई झाली पाहिजे.”
प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण झंवर, पुणे शहराध्यक्ष मनोज पवार, शहर सरचिटणीस गुरु कोळी, शहर कार्याध्यक्ष संतोष शेंडगे, शहर उपाध्यक्ष विराज सांगळे, अशोक परदेशी, अजय कवठे, शहर संपर्कप्रमुख स्वप्निल आंग्रे, शहर सह-संपर्कप्रमुख शशिकांत तोडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

