Home Blog Page 18

विद्यापीठ चौकापासूनच्या संपूर्ण रस्त्यावर पाण्याच्या निचरा होण्यासाठी ४ दिवसात PMRDA, मेट्रोने काम करावे -दिवटे

पुणे शहर वाहतूक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बाणेर रात्यावरील हॉटेल ग्रीनपार्क ते विद्यापीठ चौक या दरम्यानच्या रस्त्यांची कामे, मेट्रोच्या कामाची पाहणी व समस्या संदर्भात आज दि.१२.०६.२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. संयुक्त जागा पाहणी करण्यात आली.
आवश्यक सुधारणा करण्याचे अनुषंगाने चर्चा होऊन पुढीलप्रमाणे निर्देश दिले :

• पावसाळ्याचे दिवस सुरु होणार असल्याने विद्यापीठ चौक तसेच हॉटेल महाबळेश्वर येथे मागील पावसाचे वेळी पाणी निचरा न झाल्यामुळे नागरिकांना त्रासदायक परिस्थितीस सामोरे जावे लागले होते. त्यास अनुसरून विद्यापीठ चौकापासूनच्या संपूर्ण रस्त्यावर मोठया प्रमाणात येणाऱ्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी ४ दिवसात PMRDA, मेट्रो मार्फत आवश्यक कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आल्या.
• सिंध सोसायटी, नॅशनल सोसायटी समोर चालू असलेल्या मेट्रोच्या कामालगत राडारोडा पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
• हॉटेल ग्रीन पार्क ते पुणे मेट्रोच्या कामामुळे उदभवणाऱ्या विविध समस्या जसे कि, रस्त्यामध्ये डिव्हायडर आल्यामुळे वाहतुकीस अडथळा होणे, दोन पिलर मधील डिव्हायडर एका सरळ रेषेत नसणे, डिव्हायडर जवळील व खालील रस्ता सम पातळीत नसणे, मेट्रो स्टेशन खालील फुटपाथ नादुरुस्त असणे, रस्त्याची रुंदी कमी होणे, आयसर संस्थेसमोरील पावसाळी वाहिनी बंद असणे इत्यादी समस्यांबाबत PMRDA, मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
• विद्यापीठ चौक येथे VVIP यांची वर्दळ वारंवार होत असल्याने औंधकडे जाणाऱ्या जंक्शनजवळ पाणीपुरवठा विभागाने खोदाई केलेली असून सदर ठिकाणी टेस्टिंग करून रिइनस्टमेंटचे काम पूर्ण करून सदरचा रस्ता २ दिवसांत पूर्ववत करण्यात यावा.
• दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मेट्रो विभागाने पथविभागाच्या व अन्य विभागांसह संयुक्त जागा पाहणी करून तातडीने समस्यांचे निराकरण करणेबाबत मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सूचना दिल्या आहेत.
• संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि ड्रेनेज विभाग यांनी पावसाळी वाहिन्यांची व चेंबरची तातडीने साफसफाई करून घेणेबाबत निर्देश दिले आहेत. पदपथावरील राडाराडा मेट्रो विभागाने तातडीने हलविण्याचे निर्देश दिले आहेत

पाहणीसाठी उपस्थित अधिकारी,नगरसेवक
अभिजित आंबेकर, अधीक्षक अभियंता, पथ विभाग
सनी निम्हण, सभासद, पुणे मनपा.
सपना छाजेड, सभासद, पुणे मनपा.
गजानन पाटील, उप अभियंता, PMRDA
सुमित यादव, उप अभियंता, PITCMRL
योगेश मंद्रा, प्रोजेक्ट मॅनेजर, PITCMRL
राज धनशेट्टी, सेक्शन इनचार्ज, TPL

तसेच PMRDA, PITCMRL, TPL इत्यादी मेट्रो संबंधित खात्यांचे अधिकारी व पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

पुण्यातील IT अभियंत्याची आत्महत्या:वरिष्ठ महिला कर्मचऱ्यांच्या जाचाला कंटाळून संपवले जीवन

पुणे-येथील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एका 48 वर्षीय आयटी अभियंत्याने वरिष्ठ महिला सहकारी आणि एका मित्राकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमित ब्राम्हे असे या मृत अभियंत्याचे नाव असून, या गंभीर प्रकरणी एका नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही अत्यंत दुर्दैवी घटना 2 जून रोजी घडली असून, अमित ब्राम्हे (वय 48) या आयटी अभियंत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहून ठेवलेली दोन पानांची सुसाईड नोट समोर आली असून, त्यामध्ये त्यांनी कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता मांडत आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत.

या सुसाईड नोटमध्ये अमित यांनी त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ महिला सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्याकडील चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणीवपूर्वक अत्यंत कठीण कामे सोपवणे, इतर कर्मचाऱ्यांसमोर वारंवार अपमानित करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सतत दबाव टाकणे, असा प्रचंड त्रास या दोघींकडून दिला जात असल्याचे त्यांनी या चिठ्ठीत म्हटले आहे. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणाऱ्या याच मानसिक जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आता उघड झाले आहे.
या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ महिला सहकाऱ्यांसोबतच अमित यांचा मित्र विनोद पाली याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून कंपनीत त्यांची नाहक बदनामी केली आणि त्यांना मानसिक त्रास दिला, असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. याच सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून आपण स्वतःचे जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी यात म्हटले आहे.

अमित ब्राम्हे यांनी लिहून ठेवलेल्या या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर असणारा वाढता मानसिक तणाव, कंपनीतील वाढते अंतर्गत राजकारण आणि सहकाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजने’साठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष

पुणे :  आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वर्गीय अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजने’चे कामकाज सुलभ करण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणी स्थायी समितीसमोर करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी स्थायी समितीकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.  

महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना कर्करोग, मूत्रपिंड विकार, हृदयविकार यांसारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांनी ग्रस्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबांना उपचारांसाठी आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, सध्या या योजनेशी संबंधित सर्व प्रशासकीय प्रक्रिया महापालिकेच्या मुख्य इमारतीतील मध्यवर्ती आरोग्य विभागातूनच राबविल्या जातात. नवीन सभासदत्व ओळखपत्र देणे, त्याचे नूतनीकरण करणे, हमीपत्र मंजूर करणे किंवा इतर कागदपत्रांची पडताळणी यासाठी नागरिकांना मुख्य कार्यालयात जावे लागते.

शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वानवडी, साळुंखे विहार, हडपसर, उंड्री, महंमदवाडी, कोंढवा, धनकवडी, कात्रज आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना किरकोळ दुरुस्ती किंवा कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठीही वारंवार मुख्य कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक तसेच वेळेचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडत असल्याची बाबही मांडण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘शहरी गरीब आरोग्य योजना’साठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, कागदपत्र पडताळणी, अर्ज स्वीकृती आणि प्राथमिक मंजुरीची प्रक्रिया स्थानिक स्तरावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच सेवा उपलब्ध होऊन योजनेचा लाभ अधिक वेगाने मिळू शकेल.  स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास महापालिकेच्या आरोग्य योजनांचे विकेंद्रीकरण होऊन लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे भिमाले यांनी सांगितले.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजनेसाठी ४७.६५ कोटी ; साहित्य खरेदीसाठी थेट खात्यात रक्कम होणार

स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता दिल्याचे श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे, १२ जुन

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट-मोजे, दप्तरे, वह्या, लेखन साहित्य, स्वेटर आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल ४७ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग झाला असून या योजनेचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्षश्र श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या निर्णयानुसार विविध कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा करण्याची पद्धत अवलंबण्यात आली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना राबविली जाते.

योजनेअंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत, सहकारी किंवा अनुसूचित बँकेच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. तसेच वसतिगृह किंवा सामाजिक संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित संस्था किंवा वसतिगृहाच्या खात्यावर डीबीटीची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. थेट लाभ हस्तांतरणामुळे साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डीबीटी योजना व अंदाजपत्रकीय तरतूद (बजेट) (रुपयांत)
विद्यार्थी गणवेश २२ कोटी
विद्यार्थी बूट मोजे ६ कोटी
विद्यार्थी दप्तरे ५ कोटी
विद्यार्थी वह्या ३.८५ कोटी
चित्रकला साहित्य १.६५ कोटी
लेखन साहित्य व पाठ्या खरेदी ५ कोटी
बनियन पेटीकोट २५ लाख
विद्यार्थी ट्रॅकसुट व बुट ३० लाख
विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी ३.६ कोटी
एकूण बजेट ४७,६५,००,०००/- (४७ कोटी ६५ लाख)

वारजेतील सर्व्हिस रस्त्यासाठी २१५४ चौरस मीटर जागेच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा ; ९.७५ कोटींच्या खर्चाचा प्रस्तावाला मान्यता

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : वारजे परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या प्रस्तावित १२ मीटर रुंदीच्या सर्व्हिस रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीमार्फत मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या भूसंपादनासाठी सुमारे ९ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी पथ विभागाकडे निधी उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. या प्रस्तावा स्थायी समितीने मान्यता दिल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या विकास आराखड्यात पुणे पेठ वारजे येथील सर्व्हे क्रमांक १०४ मधून १२ मीटर रुंदीचा डीपी सर्व्हिस रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याचे काम महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेवर सुरू असले, तरी रस्त्यासाठी आवश्यक असलेले २ हजार १५४ चौरस मीटर क्षेत्र अद्याप संपादित झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यांचे भूसंपादन प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वारजे स्मशानभूमी ते वारजे चौक तसेच डुक्करखिंड परिसरातील रस्ते विकास कामांना महत्त्व देण्यात आले आहे.

या प्रकरणात एका मिळकतधारकाची मालमत्ता बाधित होत असून ती निवासी क्षेत्रात मोडते. संबंधित जागाधारकांकडून जागेच्या बदल्यात सुमारे ९.७५ कोटी रुपयांच्या मोबदल्याची मागणी करण्यात आली आहे. मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जागा हस्तांतरित करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असला, तरी अद्याप जागेचा ताबा महापालिकेला मिळालेला नाही.

भूसंपादनासाठी आवश्यक असलेली ९ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद ‘शहरातील प्रमुख रस्त्यांचे भूसंपादन’ या अर्थशीर्षाखाली उपलब्ध आहे. सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून हा खर्च करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. स्थायी समिती आणि मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित जागेचे भूसंपादन करून सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा रस्ता विकसित झाल्यास वारजे परिसरातील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

मुंढवा-केशवनगरमधील ८८ हेक्टर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण मोकळे होणार

पुणे : मुंढवा-केशवनगर परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे ८८ हेक्टर क्षेत्रावरील वाढत्या अतिक्रमणांच्या पृष्ठभूमीवर ही जागा आरोग्य विभागाकडून काढून मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे वर्ग करण्यासह सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी स्थायी समितीसमोर करण्यात आली होती. या प्रस्तावाला मान्यता दिली असून अतिक्रमण मोकळे करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ६ तसेच सर्व्हे क्रमांक ९ ते १४/२ मधील एकूण ८८ हेक्टर ५७ आर क्षेत्राचा यात समावेश आहे. शासनाने ही जागा गोठ्यासाठी पुणे महापालिकेला दिली असून सध्या तिची देखभाल आणि व्यवस्थापन आरोग्य विभागाकडे आहे.

गेल्या काही वर्षांत या विस्तीर्ण जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पत्राशेड, पक्की बांधकामे, अनधिकृत ताबे तसेच राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. जागेच्या मोठ्या क्षेत्रफळामुळे आरोग्य विभागाला तिचे प्रभावी संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यात अडचणी येत असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित जागा आरोग्य विभागाकडून काढून पूर्वीप्रमाणे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्त मोहीम राबवून सर्व अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संपूर्ण जागेभोवती कुंपण किंवा संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच ‘ही जागा पुणे महानगरपालिकेच्या मालकीची आहे’ असे फलक लावण्यात येणार आहे.

मुंढवा आणि केशवनगर परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असताना महापालिकेच्या मालकीच्या मोठ्या भूखंडांवर अतिक्रमणाचा धोका वाढत असल्याची बाब या प्रस्तावातून स्पष्ट करण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास संबंधित जागेवरील अतिक्रमणांविरोधात व्यापक कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

IAS तुकाराम मुंढेंचा गुटखा माफियांवर दणका:राज्यात अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट ‘मकोका’ लावण्याचे आदेश

0

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाचे सूत्र हाती घेतल्यानंतर आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी छापे मारून अवैध गुटखा, पान मसाले जप्त केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण कारवाई प्रकरणी मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे. आपल्या एफएसएसआयच्या सेक्शन 3 नुसार प्रतिबंधित जे खाद्य पदार्थ आहेत, गुटखा किंवा तत्सम प्रकार जे आहेत त्यावर बंदी आहे. त्यावर आपण अनेकवेळा कारवाई करतो. छापे टाकतो, कारवाई करतो, अनेकांना जेल होते. परंतु, प्रतिबंधित असूनही अनेक ठिकाणी गुटखा विकला जातो आणि खाल्लाही जातो. मग यावर पर्याय काय आहे? जे उत्पादक आहेत ते बाहेरचे आहेत. त्यामुळे इथे जे विक्री करणारे आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे आहेत, डीलर आहेत, हे एक रॅकेट आहे आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी स्ट्रॉंग स्टँड घेणे गरजेचे आहे, यावर शासन पोहोचले आहे.

पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, हे पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत आणि तरी सुद्धा अशा प्रकारे विक्री केली जात असेल तर त्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आज 12 जून रोजी मी मकोका (मोक्का) लावण्याचे आदेश पारित केले आहेत. यानुसार जे आदेश देण्यात आले आहेत, त्यात एक पेक्षा जास्त वेळा गुटखा बिझनेस करत आहेत त्याच्यावर माकोका लावण्यात येणार आहे. तसेच उत्पादन करणारे, उत्पादनाला पैसा पुरवणारे, ट्रान्सपोर्ट करणारे आणि एजंट, गोडाऊनवाले, होलसेल डीलर, रिटेल सेलर्स, अशा सर्वांवर माकोका लावण्यात येणार आहे.
तसेच तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या निर्देशांनुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित प्रत्येक अंमलबजावणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी आणि नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास संबंधित प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गतही कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोका लागू करण्यासाठी अधिनियमाच्या कलम 23 अंतर्गत आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जावी.

नव्या निर्देशांनुसार, आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारामागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत उत्पादक, वित्तपुरवठादार (फायनान्सर), मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम मालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते या सर्वांचे नेटवर्क भक्कम पुराव्यांच्या आधारे उघड केले जाईल. जर हे प्रकरण संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपाचे असेल, तर उपलब्ध पुराव्यांनुसार या साखळीतील सर्व ज्ञात सदस्यांवर एकत्रित कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले जाईल. या व्यापक दृष्टिकोनामुळे या अवैध व्यवसायातील मुख्य सूत्रधार आणि खरे आर्थिक लाभार्थी थेट कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास मदत होणार आहे.

या कारवायांच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक स्वतंत्र ‘अभियोजन नोंदवही’ तयार केली जाईल. यामध्ये मकोका अंतर्गत पात्र प्रकरणे, दाखल झालेले एफआयआर, आरोपपत्रे, न्यायालयीन आदेश, जप्त केलेला मुद्देमाल, तपासाची सद्यस्थिती आणि प्रकरणाचा अंतिम निकाल यांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातील. याशिवाय, राज्य पातळीवर मुख्यालयातही एक एकत्रित नोंदवही ठेवून या सर्व प्रकरणांवर नियमित देखरेख केली जाईल. तसेच, सहआयुक्त स्तरावर जिल्ह्यांच्या अहवालांचा आढावा घेऊन, दरमहा एक सविस्तर प्रादेशिक अहवाल थेट आयुक्तांना सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराची संघटित साखळी उद्ध्वस्त करणे आणि आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून राज्यात बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, परिसरात कुठेही गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला किंवा तत्सम प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण अथवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती त्वरित स्थानिक अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा जवळच्या पोलिस ठाण्याला द्यावी, जेणेकरून या बेकायदा व्यवसायांना कायमचा आळा घालता येईल, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शरद पवारांना होती काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफर!:राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान मोठा खुलासा

मुंबई-देशाच्या राजकारणात भाजपविरोधी पक्षांची एकजूट, इंडिया आघाडीचे भविष्य आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व यावर चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यातच आता एक मोठा राजकीय खुलासा समोर आल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने स्वतः शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता. एवढेच नव्हे, तर त्या बदल्यात त्यांना थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफरही देण्यात आली होती, असा दावा समोर आला आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गांधी परिवारातील एका वरिष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. देशातील सर्वाधिक अनुभवी राजकारण्यांपैकी एक असलेल्या पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते, असा विचार काँग्रेस नेतृत्वात होता. जर त्या वेळी हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता, तर आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या जागी शरद पवार असते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे आणि प्रादेशिक राजकारणात स्वतंत्र भूमिका कायम ठेवणे हे त्यांचे धोरण राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आलेली अध्यक्षपदासारखी मोठी ऑफर असूनही पवारांनी ती नम्रपणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी महाविकास आघाडी मजबूत होती आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सकारात्मक वातावरण असल्याने स्वतंत्र पक्ष म्हणून लढणे फायदेशीर ठरेल, असा विचारही त्यामागे असल्याचे मानले जाते.

मात्र 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत पक्षाचा मोठा गट सोबत घेतला. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले असले, तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला. पक्षाच्या अनेक नेत्यांचे स्थलांतर, आर्थिक आणि संघटनात्मक मर्यादा यामुळे पुढील राजकीय रणनीतीबाबत नव्याने विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच केलेल्या वक्तव्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. भाजपविरोधी लढाई मजबूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष काँग्रेससोबत येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते.ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासह विविध प्रादेशिक पक्षांमध्ये देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत व्यापक एकजूट आवश्यक असल्याची भावना निर्माण झाल्याचे पटोले यांनी सांगितले होते.

दुसरीकडे, शरद पवार गटातील नेत्यांनी मात्र विलिनीकरणाच्या चर्चांपासून काहीसे अंतर ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अशा कोणत्याही प्रस्तावाची अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे विलिनीकरण नसले तरी भविष्यात अधिक मजबूत राजकीय आघाडीची शक्यता नाकारता येत नाही.

ट्रम्प म्हणाले- इराणसोबतचे युद्ध आज संपले:ते कधीही अण्वस्त्रे बनवणार नाहीत; इराणने मात्र ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला की अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवले आहे. एका व्हर्च्युअल रॅलीत ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी असाही दावा केला की इराण कधीही अणुबॉम्ब बनवणार नाही.इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी सांगितले की, शांतता करारावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

यापूर्वी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांनी नवीन कराराला मंजुरी दिली आहे. त्यांनी असेही सांगितले की, इराणसोबतच्या शांतता करारावर याच आठवड्यात युरोपमध्ये स्वाक्षरी होऊ शकते. जर सर्व काही ठीक राहिले तर, उपराष्ट्रपती जेडी वेंस देखील यात सहभागी होतील.
अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू: अमेरिकेच्या सैन्याने 10 जून रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय क्रू सदस्य असलेल्या सेटेबेलो जहाजावर हल्ला केला. गुरुवारी 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूची पुष्टी झाली.
होर्मुजजवळ 4 दिवसांत 3 जहाजांवर हल्ला: अमेरिकेच्या सैन्याने मेरीवेक्स, सेटेबेलो आणि जलवीर नावाच्या जहाजांवर हल्ला केला. या जहाजांवर सुमारे 70 भारतीय क्रू सदस्य होते.
भारताने अमेरिकेच्या राजदूताला बोलावले: भारतीय क्रू असलेल्या MT जलवीर जहाजावरील हल्ल्यानंतर भारताने अमेरिकेच्या राजदूताला बोलावले आणि जहाजांवरील हल्ले त्वरित थांबवण्याची मागणी केली.
इराणवर सर्वात मोठ्या हल्ल्याची धमकी: ट्रम्प यांनी इराणच्या तेल ठिकाणांवर कब्जा करण्याची धमकी दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की ते आज रात्री इराणवर सर्वात मोठा हल्ला करतील.
हल्ल्यातून ट्रम्प माघारी: ट्रम्प यांनी ५ तासांनंतर सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, इराणविरुद्ध नवीन हवाई हल्ले करण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यांची इराणी नेतृत्वाशी चर्चा खूप पुढे गेली आहे.
उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले
शुक्रवारी उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. लेबनॉनच्या सीमेजवळील ‘मेटुला’ भागात “संभाव्य हवाई घुसखोरी” झाल्याच्या संशयावरून हा इशारा देण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, “शत्रूच्या विमानाची घुसखोरी” होण्याची शक्यता असल्याने हे सायरन वाजवण्यात आले.
जोपर्यंत मी पंतप्रधान आहे, तोपर्यंत इराणला अणुशस्त्रे बनवता येणार नाहीत: नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कार्यकाळात इराणला अणुशस्त्रे मिळवता येणार नाहीत. नेतान्याहू यांनी सोशल मीडियावर लिहिले, “जोपर्यंत मी इस्रायलचा पंतप्रधान आहे, तोपर्यंत इराणकडे अणुशस्त्रे असणार नाहीत.”

त्यांनी नमूद केले की, गेल्या ३० वर्षांपासून ते इराणच्या अणुकार्यक्रमाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मते, जर ही मोहीम राबवली गेली नसती, तर इराणने इस्रायलला लक्ष्य करण्यास सक्षम असे अणुबॉम्ब आधीच तयार केले असते.

नेतान्याहू यांनी आरोप केला की, ज्यू राष्ट्राचा विनाश करणे हे इराणचे उद्दिष्ट आहे आणि ते रोखणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय राहिले आहे. त्यांनी ठामपणे सांगितले, “जोपर्यंत मी पंतप्रधान आहे, तोपर्यंत मी असे घडू देणार नाही.”
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा इराणचा दावा
अमेरिकेसोबत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी ॲडमिरल हबीबोल्ला सय्यारी यांनी स्पष्ट केले की, इराणच्या परवानगीशिवाय कोणतेही जहाज या सागरी मार्गावरून जाऊ शकत नाही.

अलीकडील हल्ल्यांमध्ये इराणच्या नौदलाचे मोठे नुकसान झाले असल्याचा अमेरिकेचा दावाही सय्यारी यांनी फेटाळून लावला. या भागात इराणची लष्करी क्षमता अजूनही प्रभावीपणे कायम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

खराडी जमीन वादात मारहाण; प्रीतम खांदवे आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रीतम खांदवे (वय ४१), पंकज संजय पाटोळे (वय ३४), जेसीबी चालक तसेच इतर काही जणांचा समावेश आहे. प्रीतम खांदवे हे प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती आहेत.याबाबत अल्ताफ अमजद शेख (वय २६, रा. आपले घर सोसायटी, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. अल्ताफ शेख हे खराडीतील पार्वती पाटील यांच्या मालकीच्या जागेची गेली पाच ते सहा वर्षे देखरेख करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये याच प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी तहसीलदारांनी संबंधित जागेत प्रीतम खांदवे यांना प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश दिला होता.तक्रारीनुसार, ३० मे रोजी रात्री प्रीतम खांदवे हे काही जणांसह जेसीबी मशीन घेऊन संबंधित जागेवर आले. त्यांनी जागेवर काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षारक्षक अल्ताफ शेख यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.घटनेची माहिती मिळताच जागामालक पार्वती पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अल्ताफ शेख यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रीतम खांदवे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जागेच्या वादाची पार्श्वभूमी, तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन झाले का आणि मारहाणीच्या आरोपांबाबत सखोल तपास सुरू केला आहे. पुढील तपास खराडी पोलिस करत आहेत.

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्रेनवर दगडफेक: शताब्दी एक्सप्रेसने कानपूरहून दिल्लीला जाताना फिरोजाबादेत हल्ला

कानपूर:फिरोजाबादमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्रेनवर गुरुवारी संध्याकाळी दगडफेक झाली. दगड थेट त्याच बोगीला लागला, ज्यात ते बसले होते. यामुळे खिडकीची काच फुटली. भागवत कानपूरहून शताब्दी एक्सप्रेसने नवी दिल्लीला जात होते.भागवत एक्झिक्युटिव्ह क्लासच्या E-1 कोचमध्ये होते. ट्रेन जेव्हा मक्खनपूर-फिरोजाबाद दरम्यानून जात होती, तेव्हा अचानक बोगीला लक्ष्य करून दगड फेकण्यात आला. सुदैवाने या दगडफेकीत सरसंघचालक सुरक्षित राहिले.

या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनला मध्ये कुठेही थांबवण्यात आले नाही. या घटनेची माहिती मिळताच टुंडला जंक्शनवर रेल्वे सुरक्षा दल आणि राजकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह सज्ज झाले.

संध्याकाळी 7:34 वाजता शताब्दी एक्सप्रेस टुंडला जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबताच, सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली. टुंडला जंक्शनवर सुरक्षा तपासणी केल्यानंतर, ट्रेनला संध्याकाळी 7:41 वाजता दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. त्याचबरोबर, आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकांनी मक्खनपूर-फिरोजाबाद रेल्वे मार्गाच्या आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली.यापूर्वी भागवत गुरुवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता नीतू सिंह यांच्या मुलीच्या आशीर्वाद समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले. नीतू सिंह या कानपूरचे माजी भाजप खासदार सत्यदेव पचौरी यांच्या मोठ्या कन्या आहेत. नीतू सिंह यांची मुलगी वसुंधरा आणि यश यांचे 21 जून रोजी लग्न आहे.

काही वेळ येथे थांबल्यानंतर भागवत परतले. यावेळी नीतू सिंह यांनी भागवत यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्यांचे अभिवादन केले. या आशीर्वाद सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, यूपी सरकारमधील मंत्री सूर्यप्रताप शाही, योगेंद्र उपाध्याय, भूपेंद्र चौधरी मंत्री यांच्यासह अनेक व्हीआयपी उपस्थित होते. हे पाहता शहरात सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नीतू सिंह यांचे कुटुंब दीर्घकाळापासून संघाशी जोडलेले आहे.

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.
आजअखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.

दरम्यान, NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहे.

लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला आजारी; रोहित पवार-वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या मदतीसाठी शासनाने दिलेला बैलच आजारी निघाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करणाऱ्या या शेतकरी दांपत्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासनाने तातडीने मदत म्हणून बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र, हा बैल दोनच दिवसांत आजारी पडल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी वादळी पावसादरम्यान वीज पडून काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल दगावला होता. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतीसाठीचा आधार हिरावल्याने कुटुंबावर संकट कोसळले. आर्थिक अडचणींमुळे नवीन बैल घेणे शक्य नसल्याने गायकवाड यांच्या पत्नीने स्वतः जू खांद्यावर घेत नांगर ओढत शेतीची कामे सुरू ठेवली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप आणि सहानुभूती व्यक्त झाली.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. त्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत स्थानिक गोशाळेतून गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून देण्यात आला.
दोन दिवसांतच बैल पडला आजारी

मात्र, मदतीसाठी देण्यात आलेला हा बैल शेतातील मशागतीदरम्यान अचानक खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे समोर आले. त्यामुळे मदतीचा आधार ठरण्याऐवजी त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. यामुळे प्रशासनाने योग्य आरोग्य तपासणी न करता बैल दिला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावात आणि परिसरात “तात्काळ मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारला” अशी चर्चा सुरू झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली. “विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचा खर्चही शेतकऱ्यालाच करावा लागत आहे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केले. “कर्जमाफीच्या नावाखाली इतक्या अटी लादल्या की बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित राहिले. आता बैलाच्या मदतीतही तसाच प्रकार दिसून येतो. सरकारने अन्नदात्याला मदत करायची असेल तर ती मनापासून आणि कोणतीही अडचण निर्माण न करता करावी,” असे रोहित पवार म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. “शेतकरी दांपत्य स्वतः नांगर ओढत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारने बैल देऊन फोटोसेशन केले, प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःला संवेदनशील दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात दिलेला बैलच आजारी निघाला,” असा आरोप त्यांनी केला.

“शेतकऱ्यांना शाश्वत मदत करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय घेण्याची ही सरकारची प्रवृत्ती आहे. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे प्रकार थांबले पाहिजेत,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, “या सरकारला “दलिंदर सरकार” म्हणतो ते उगाच नाही! बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली… हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला… कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा? एका बाजूला हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजी… तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची PR मोहीम उभे करणारे हे दलिंदर सरकार आहे.”

गुरुवारी ( ११ जून) वलांडी येथील एका खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञाकडून बैलावर उपचार करण्यात आले. तपासणीत संबंधित बैल कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हौसाबाई गायकवाड यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली होती. मात्र, दिलेला बैलच अशक्त आणि कुपोषित असल्याचे समोर आल्याने या मदतीमुळे त्यांच्या दुःखात भरच पडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

बैल नांगराला जुंपून फोटो काढून अधिकारी गेले

आम्हाला अधिकाऱ्यांनी तातडीने बैल आणून दिला. तो नांगराला जुंपून फोटो काढण्यात आला आणि अधिकारी निघून गेले. परंतु मशागतीसाठी काम सुरू करताच हा बैल शिवारातच कोसळला. तशी माहिती त्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आज डॉ. रामदास हे घरी आले आणि बैलावर उपचार केले. त्या बैलात काम करण्याची ताकद नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. – पुंडलिक गायकवाड, महिला शेतकऱ्याचा मुलगा, बोंबळी

बैल कुपोषित, इंजेक्शन आणि औषधे दिली

मी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर असून वलांडीत मी खासगी सेवा पुरवतो. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बोंबळी येथील हौसाबाई गायकवाड यांना दिलेला बैल आजारी असल्याची माहिती देवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांनी मला दिली आणि त्या बैलावर उपचार करण्यास सांगितले. मी गावात जाऊन पाहणी केली असता बैल कुपोषित असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला टॉनिकचे इंजेक्शन आणि औषधी दिली आहे. उद्या सकाळी परत बैलाची प्रकृती पाहण्यासाठी जावे लागणार आहे. – डॉ. रामदास मेळकुंदे, खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर, वलांडी

प्रशासनाची दखल; बैल बदलण्याची तयारी?

दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित बैलाची तपासणी केली असून तो बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी सक्षम आणि निरोगी बैल उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे मदतीच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी किती महत्त्वाची असते, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलमपट्टी करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवणारी मदत दिली जात असेल, तर अशा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

‘काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम ‘चॉईस’- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर -महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का विलीन होईल? तसा प्रयत्न झाला तर काँग्रेसमधील सर्व पळून जातील. त्यांना चांगला चॉईस जो आहे तिकडे जातील, सध्या भाजप सर्वात चांगला चॉईस आहे, असे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मविआने विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. कोणी रुग्णालयात दाखल झाले आहेत तर कोणी गायब झाले आहेत. काँग्रेस बुडती नाव असल्याने सर्व जण पळून जात आहेत. जो तो नाव बुडण्यापूर्वी पळून जात आहे. ही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचे आहे, कारण विरोधकांकडे संख्याबळच नव्हते मग त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला असावा.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटले ते केवळ विधान परिषद निवडणूकीसंदर्भात भेट घेतली आहे. यापुढे ते काही भाजपसोबत येणार का नाही माहिती नाही. शक्तिपीठ महामार्गाला जसा विरोध होत आहे तसाच विरोध समृद्धी महामार्गाच्यावेळी सुद्धा झाला होता. पण जसे पॅकेज जाहीर करण्यात आले तसा लोकांचा विरोध कमी झाला आणि लोकांनी साथ दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारने किती नुकसान भरपाई देणार हे स्पष्ट केले तर लोकं स्वत:हून जमीनी देतील. भाजप नसताना सुद्धा अनेक जमीनीचे भुसंपादन झाले पण त्यामुळेच विकास होत असतो.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याने ते खूश आहेत त्यांचे काही म्हणणे नाही. पण विरोधकांना काही तरी करावे लागते म्हणून रोहित पवार आंदोलन करत आहेत. कर्जमाफीमध्ये सर्व स्पष्ट आहे. रोहित पवार रोज एक मुद्दा घेत रस्त्यावर उतरतात, पत्रकार परिषद घेतात आणि प्रसिद्धी मिळवतात.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत जी बंडखोरी झाली आहे ती सुद्धा संपेल. प्रत्येकाचे म्हणनं वेळेत ऐकूण घेतले की ते प्रश्न संपतात. काही जण जास्तच आखडून बसतात त्यामुळे विषय ताणला जातो. पण नाशिकमध्ये जसे विधान परिषदेचा विषय मार्गी लागला तसाच विषय जळगावमध्ये सुद्धा मार्गी लागेल.

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात:विनाअट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, सरकारला थेट इशारा

पंढरपूर -सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पंढरपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना नोटीस बजावली होती. तसेच प्रशासनाने आंदोलनासाठी पर्यायी जागा सुचवली होती.

मात्र, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलनस्थळ बदलणार नाही,” अशी भूमिका घेत रोहित पवार आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी करत त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती तात्काळ रद्द करून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरच्या ‘शिवतीर्थावर’ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या इतर मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय पंढरपुरातून मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांनी सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे.