लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला आजारी; रोहित पवार-वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

Date:

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या मदतीसाठी शासनाने दिलेला बैलच आजारी निघाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करणाऱ्या या शेतकरी दांपत्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासनाने तातडीने मदत म्हणून बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र, हा बैल दोनच दिवसांत आजारी पडल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी वादळी पावसादरम्यान वीज पडून काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल दगावला होता. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतीसाठीचा आधार हिरावल्याने कुटुंबावर संकट कोसळले. आर्थिक अडचणींमुळे नवीन बैल घेणे शक्य नसल्याने गायकवाड यांच्या पत्नीने स्वतः जू खांद्यावर घेत नांगर ओढत शेतीची कामे सुरू ठेवली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप आणि सहानुभूती व्यक्त झाली.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. त्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत स्थानिक गोशाळेतून गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून देण्यात आला.
दोन दिवसांतच बैल पडला आजारी

मात्र, मदतीसाठी देण्यात आलेला हा बैल शेतातील मशागतीदरम्यान अचानक खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे समोर आले. त्यामुळे मदतीचा आधार ठरण्याऐवजी त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. यामुळे प्रशासनाने योग्य आरोग्य तपासणी न करता बैल दिला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावात आणि परिसरात “तात्काळ मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारला” अशी चर्चा सुरू झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली. “विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचा खर्चही शेतकऱ्यालाच करावा लागत आहे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केले. “कर्जमाफीच्या नावाखाली इतक्या अटी लादल्या की बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित राहिले. आता बैलाच्या मदतीतही तसाच प्रकार दिसून येतो. सरकारने अन्नदात्याला मदत करायची असेल तर ती मनापासून आणि कोणतीही अडचण निर्माण न करता करावी,” असे रोहित पवार म्हणाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. “शेतकरी दांपत्य स्वतः नांगर ओढत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारने बैल देऊन फोटोसेशन केले, प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःला संवेदनशील दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात दिलेला बैलच आजारी निघाला,” असा आरोप त्यांनी केला.

“शेतकऱ्यांना शाश्वत मदत करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय घेण्याची ही सरकारची प्रवृत्ती आहे. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे प्रकार थांबले पाहिजेत,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, “या सरकारला “दलिंदर सरकार” म्हणतो ते उगाच नाही! बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली… हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला… कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा? एका बाजूला हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजी… तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची PR मोहीम उभे करणारे हे दलिंदर सरकार आहे.”

गुरुवारी ( ११ जून) वलांडी येथील एका खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञाकडून बैलावर उपचार करण्यात आले. तपासणीत संबंधित बैल कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हौसाबाई गायकवाड यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली होती. मात्र, दिलेला बैलच अशक्त आणि कुपोषित असल्याचे समोर आल्याने या मदतीमुळे त्यांच्या दुःखात भरच पडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

बैल नांगराला जुंपून फोटो काढून अधिकारी गेले

आम्हाला अधिकाऱ्यांनी तातडीने बैल आणून दिला. तो नांगराला जुंपून फोटो काढण्यात आला आणि अधिकारी निघून गेले. परंतु मशागतीसाठी काम सुरू करताच हा बैल शिवारातच कोसळला. तशी माहिती त्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आज डॉ. रामदास हे घरी आले आणि बैलावर उपचार केले. त्या बैलात काम करण्याची ताकद नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. – पुंडलिक गायकवाड, महिला शेतकऱ्याचा मुलगा, बोंबळी

बैल कुपोषित, इंजेक्शन आणि औषधे दिली

मी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टर असून वलांडीत मी खासगी सेवा पुरवतो. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बोंबळी येथील हौसाबाई गायकवाड यांना दिलेला बैल आजारी असल्याची माहिती देवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांनी मला दिली आणि त्या बैलावर उपचार करण्यास सांगितले. मी गावात जाऊन पाहणी केली असता बैल कुपोषित असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला टॉनिकचे इंजेक्शन आणि औषधी दिली आहे. उद्या सकाळी परत बैलाची प्रकृती पाहण्यासाठी जावे लागणार आहे. – डॉ. रामदास मेळकुंदे, खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर, वलांडी

प्रशासनाची दखल; बैल बदलण्याची तयारी?

दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित बैलाची तपासणी केली असून तो बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी सक्षम आणि निरोगी बैल उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे मदतीच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी किती महत्त्वाची असते, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलमपट्टी करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवणारी मदत दिली जात असेल, तर अशा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात:विनाअट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, सरकारला थेट इशारा

पंढरपूर -सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...

‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुण्यात आंदोलन:अभिजीत दिपकेंच्या सरकारकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

पुणे- कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन केले . पक्षाचे...