‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’ असल्याचीही टीका,वाहनधारकांची पंतप्रधानांनी माफी मागावी
मुंबई : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारमधील इतर मंत्र्यांवरही हल्लाबोल सुरू केला आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता ‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा झालाच पाहिजे,” असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
इथेनॉलमिश्रित इंधनाच्या मुद्द्यावरून सपकाळ यांनी गडकरींवर गंभीर आरोप केले. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, दुसरीकडे इथेनॉलचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मोठा आर्थिक फायदा मिळवला असल्याचा दावा त्यांनी केला.
“एका बाजूला वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे, तर दुसऱ्या बाजूला इथेनॉल कंपन्या वारेमाप पैसा कमावत आहेत. हा उघड भ्रष्टाचार आणि वाहनधारकांना छळण्याचा प्रकार आहे. देशात इथेनॉलच्या नावाखाली मोठे कांड झाले आहे,” असा आरोप सपकाळ यांनी केला.
ज्या वाहनधारकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी काळात इथेनॉलच्या मुद्द्यावर आणखी माहिती समोर आणण्याचे संकेतही त्यांनी दिले.
‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सपकाळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील महायुती सरकारवरही टीका केली.
“महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, हे अमित शहा ठरवतात. महाराष्ट्रात धुसफूस सुरू झाली की सर्व नेते दिल्ली दरबारात जातात,” असा टोला त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असे ते सातत्याने सांगतात. मात्र, आता दोन वर्षांचा कालावधी उलटल्याने जुन्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत, असे सपकाळ म्हणाले.
“पंतप्रधान होण्याचे स्वप्न अनेकांना पडू लागले आहे. त्यामध्ये देवाभाऊही मागे नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी कोणाला आणायचे, याचा निर्णय घेताना अमित शहा एका दगडात दोन पक्षी मारू शकतात,” असेही सपकाळ यांनी म्हटले.
गडकरींनी आरोप फेटाळले
इथेनॉलमिश्रित E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचे दावे नितीन गडकरी यांनी यापूर्वी फेटाळले आहेत. E20 मुळे वाहनांच्या मायलेजवर किरकोळ परिणाम होऊ शकतो; मात्र इंजिन खराब होत असल्याच्या आरोपांना आधार नसल्याचा त्यांचा दावा आहे. इंधन लागू करण्यापूर्वी ‘एआरएआय’ आणि वाहन उत्पादकांनी आवश्यक चाचण्या केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

