‘सुपर एल निनो’ म्हणजे जेव्हा प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान २ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा निर्माण होणारी हवामानाची अत्यंत तीव्र व घातक स्थिती होय. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि अमेरिकेच्या ‘नोआ’ (NOAA) या संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार, या वर्षी प्रशांत महासागरात हा ‘सुपर एल निनो’ (ज्याला ‘गॉडझिला एल निनो’ असेही म्हणतात) वेगाने सक्रिय होत असून, तो १९५० नंतरचा सर्वात भयंकर एल निनो ठरण्याची ६३% शक्यता आहे.
‘सुपर एल निनो’ म्हणजे काय आणि त्याचा भारतावर काय होणार परिणाम?जागतिक हवामान वेगाने बदलत असून संपूर्ण जगावर आता एका मोठ्या संकटाचे सावट पसरले आहे. युरोपियन आणि अमेरिकन हवामान संस्थांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार, प्रशांत महासागरात या शतकातील सर्वात विनाशकारी ‘सुपर एल निनो’ आकार घेत आहे. या बदलामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात हवामानाचा समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘सुपर एल निनो’ म्हणजे नेमके काय?‘एल निनो’ ही एक नैसर्गिक हवामानविषयक स्थिती आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. स्पॅनिश भाषेत एल निनोचा अर्थ ‘लहान मूल’ किंवा ‘बाल येशू’ असा होतो.तापमानात प्रचंड वाढ: सामान्य एल निनोमध्ये तापमान थोडे वाढते; परंतु जेव्हा पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त वाढू लागते, तेव्हा त्याला ‘सुपर एल निनो’ म्हणतात.
दुर्मिळ घटना: ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून, १९५० पासून आतापर्यंत केवळ ४ ते ५ वेळाच अशा तीव्र स्वरूपाच्या ‘सुपर एल निनो’ची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये असा तीव्र एल निनो आला होता.
२०२६ मधील तीव्रता: चालू वर्षातील मे-जून महिन्यापासूनच महासागराच्या पृष्ठभागाखालील तापमान अनपेक्षितपणे वाढले असून, या वर्षाच्या अखेरीस आणि २०२७ च्या सुरुवातीला त्याचा प्रकोप सर्वोच्च पातळीवर असेल.
भारतीय मान्सून आणि शेतीवर होणारे परिणाम-भारताची अर्थव्यवस्था आणि शेती प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. सुपर एल निनोमुळे भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात.
पावसात मोठी घट: हवामान तज्ज्ञांच्या मते, सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमालीचा कमी (सुमारे ४०% पर्यंत घट) होण्याची भीती आहे.
भीषण दुष्काळाचे सावट: महाराष्ट्र (विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देश), गुजरात, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.कृषी क्षेत्राला फटका: पाऊस लांबल्यास किंवा कमी पडल्यास खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान होईल, ज्यामुळे बाजारात अन्नधान्याचे भाव वाढून महागाई वाढू शकते.
तीव्र उष्णतेच्या लाटा (Heatwaves): मान्सूनच्या महिन्यांतही उन्हाळ्यासारखी तीव्र उष्णता आणि उकाडा जाणवत राहील.
जागतिक स्तरावर काय उलथापालथ होणार?
हवामानाचा लहरीपणा: दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेच्या काही भागांत मुसळधार पाऊस व पूर येईल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिकेत कडक उन्हाळा व वणवे (Forest fires) लागतील.
अन्न व ऊर्जा संकट: जलविद्युत प्रकल्पांमधील पाणी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती घटेल. तसेच जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात येण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी (UN) दिला आहे.
उपाययोजना आणि सर्तकता-हवामान अभ्यासकांच्या मते, हे संकट मोठे असले तरी आपण योग्य नियोजनाने याचा सामना करू शकतो. त्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे
पाण्याचे ऑडिट: शहरांपासून गावांपर्यंत पाण्याचा अपव्यय टाळणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे.
पीक नियोजनात बदल: शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा.शासकीय पावले: सरकारने तातडीने ‘एल-निनो टास्क फोर्स’ स्थापन करून जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक आहे

