पुणे : ज्ञान आणि समृद्धी या परस्पर पूरक शक्तींमधील द्वंद्वाचे सादरीकरण करणारा ‘यदा’ हा नृत्याविष्कार आणि संतूरचे स्वर्गीय सूर यांनी नटलेली संध्याकाळ रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित युवा स्वरानुभूती मैफलीचे!
कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे शनिवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्या कुचिपुडी नृत्याविष्काराने झाली. ज्ञानाची देवता सरस्वती आणि धनाची देवता लक्ष्मी यांच्यातील द्वंद साकारताना ‘यदा’ या संकल्पनेतून मानवी भावभावनांनी नटलेल्या उत्कट आणि उत्स्फूर्त संवादाची आणि नाट्यात्मकतेची अनुभुती रसिकांना आली. या अनोख्या कुचिपुडी नृत्यशैलीने रसिक स्तिमित झाले. भावोत्कट अभिनय, लयबद्ध नृत्याविष्कार आणि खेळकर वाचिक अभिनयातून दोनही नृत्यांगनांनी द्वंद्व, सख्य आणि संतुलन यांचा समन्वय साधत प्रभावी सादरीकरण केले.
नृत्यप्रस्तुतीनंतर रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्याशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना राधिका करंदीकर यांनी संवाद साधला. त्या वेळी ‘यदा’ या संकल्पनेविषयी बोलताना देवी सूक्त, ललिता सहस्रनाम अशा देवीस्तुती करणाऱ्या स्तोत्रांमधून हा विषय सापडल्याचे त्यांनी सांगितले. कुचिपुडी नृत्यातील वाचिक व नाट्यमय अभिनय यांचे वैशिष्ट्य सांगून नृत्य सादरीकरण करतेवेळी कलाकार नृत्यातील कवित्त गुणगुणत नृत्य सादरीकरण करतो हे वेगळेपण उलगडून दाखविले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुण्यातील सुप्रसिद्ध युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांची मैफल रंगली. त्यांनी राग जोगकंसमधील आलाप, जोड, झाला ऐकवून रूपक आणि तीनतालातील तीन रचना तबल्याच्या साथीने साकारल्या. वाद्यावरील उत्तम प्रभुत्व, संतूरमधून साकारलेले सुमधुर सूर आणि तबल्याची संयत साथसंगत यातून मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. विनय मुंडे यांनी समर्पक तबलासाथ केली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले.

