रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर लक्ष द्यावे
छत्रपती संभाजीनगर-विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांवरील लाठीमार, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्वनियोजन करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. रामदेव बाबा यांच्यावरही दीपके यांनी निशाणा साधला.
अभिजीत दीपके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन चालणे, जय भीमचे नारे देणे आणि लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरणे म्हणजे जर संस्कृती बदनाम करणे असेल, तर रामदेव बाबांना सांगा की होय, आम्ही संस्कृती बदनाम करतोय, ते म्हणाले, रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर लक्ष द्यावे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या उत्पादनांवरून फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. देश आणि संस्कृती आम्ही झेन झी पिढी सांभाळून घेऊ, तुम्ही तुमच्या उत्पादनांकडे लक्ष द्या, नाहीतर ती बंद पडतील. तसेच, इथून पुढे शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांना जेव्हा गरज पडेल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आंदोलनांना बाहेरून फंडिंग येत असल्याच्या आरोपांवर बोलताना दिपके यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच लक्ष्य केले. जर आम्हाला खरोखरच बाहेरून फंडिंग येत असेल, तर हे गृहमंत्री अमित शहांचे मोठे अपयश आहे आणि त्यासाठी त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच २० तारखेला विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेशही अमित शहांचेच असतील, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
दगडफेकीचे प्लॅनिंग पोलिसांचेच; गंभीर आरोप
आंदोलनाबाबत बोलताना दिपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी आरोप केला की, १९ तारखेच्या रात्री आणि २० च्या सकाळी मी स्वतः पाहिले आहे की, पोलिसांनी दगडांनी भरलेला एक ट्रक आणि आधीच तुटलेली एक व्हॅन तिथे आणून ठेवली होती. दगडफेकीचे प्लॅनिंग पोलिस आणि भाजपने मिळून केले होते. याप्रकरणी आपण थेट डीसीपी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी संविधानाचे पालन करावे. जर त्यांना भाजपचेच समर्थन करायचे असेल, तर त्यांनी थेट भाजपच्या मुख्यालयासमोर उभे राहून ‘मै भी चौकीदार’ म्हणावे,” असा टोला त्यांनी हाणला.
बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे सरकार:केंद्र सरकार आणि नव्या शिक्षणमंत्र्यांवरही दीपकेंनी नाराजी व्यक्त केली. देशाचे शिक्षणमंत्री आता बलात्काऱ्यांचे स्वागत आणि कौतुक करत आहेत. प्रधान यांना हटवून सरकारने अजून एक विचित्र माणूस तिथे बसवून ठेवला आहे. हे सरकार बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. सध्या झेन झी पिढीला जाणूनबुजून ट्रोल केले जात असल्याचेही ते म्हणाले.

