मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत ‘जागतिक सर्वोत्तम रील’ ठरणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप पाच विविध कला विभागांमध्ये करण्यात आले आहे.
१) ‘नैवेद्य आणि परंपरा’
या विभागात गणेशोत्सवातील पौष्टिक नैवेद्य, पारंपरिक पदार्थ, विविध प्रदेशांतील खाद्यपरंपरा आणि कौटुंबिक खाद्यपरंपरांचे सर्जनशील सादरीकरण करता येणार आहे.
२) ‘गणराज रंगी’ या सादरीकरण कला विभागात गायन, नृत्य, वाद्यसंगीत, संगीत नाट्य, लोकनाट्य, दशावतार, नमन खेळे आणि विविध पारंपरिक लोककलांचा समावेश आहे.
३) ‘कलाधिपती गणपती’ या दृश्यकला विभागात चित्रकला, रेखाचित्र, शिल्पकला, रांगोळी, चित्रांकन आदी कलाप्रकार सादर करता येतील.
४) शब्दसुमनांकित गणराय या साहित्यकला विभागात कविता, कथा, निवेदन, प्रवासवर्णन, सांस्कृतिक कथन, गणपती मंदिरे, गणेशस्थळे, लोककथा आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित अनुभवांचे सादरीकरण करता येणार आहे. तर
५) AI मधून गणपतीचे नवदर्शन या विशेष विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विविध कला प्रकारांचे सर्जनशील पुनर्सादरीकरण करता येणार आहे. AI-निर्मित अथवा AI-सहाय्यित कलात्मक सामग्री केवळ याच विभागात स्वीकारली जाणार असून अन्य चार विभागांमध्ये AI चा वापर करून तयार केलेली सामग्री ग्राह्य धरली जाणार नाही.
प्रत्येक विभागासाठी प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारी रील उभी (9:16) आणि किमान ३० ते कमाल ९० सेकंदांची असणे आवश्यक आहे.
स्पर्धकांनी आपली रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram व Facebook अकाउंटवर पोस्ट करणे बंधनकारक असून, पोस्ट करताना फिल्मसिटी मुंबईच्या Instagram हँडलला Collab करणे आणि Facebook अकाउंटला Tag करणे आवश्यक आहे.
Private अकाउंटवरील रील स्वीकारल्या जाणार नाहीत.
स्पर्धकांना एका वेळी एकाच श्रेणीत सहभागी होता येईल.
महाराष्ट्राबाहेरील तसेच भारताबाहेरील स्पर्धकांसाठी निवासाचा दाखला सादर करणे आवश्यक राहणार आहे.
स्पर्धकांनी रील संदर्भातील कोणत्याही आक्षेपाची जबाबदारी स्वतः स्वीकारणे आवश्यक असून, विजेत्या रील प्रकाशित करण्याचे अधिकार महामंडळाकडे राखीव राहतील.
तसेच ऐनवेळी स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अथवा स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार संयोजकांकडे राहणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम सूचना, नियम व प्रवेशासंबंधी सविस्तर माहितीसाठी filmcityganeshareel.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

