‘एआयच्या युगात युवकांनी जागतिक भाषा शिकाव्यात’; डॉ. दीपक शिकारपूर यांचे आवाहन
चित्ररथाची संकल्पना – ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : फायदे आणि भविष्य’; ८ ते १० हजार गणेशभक्तांचा सहभाग
पुणे : धनकवडी परिसरातील नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत भव्य संयुक्त सार्वजनिक मिरवणूक काढली. यंदाच्या मिरवणुकीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : फायदे आणि भविष्य’ या विषयावर आधारित चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. एआय तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर तसेच एआय तज्ज्ञ, लेखक व संशोधक डॉ. अमेय पांगारकर यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू झालेली ही शोभायात्रा धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, शिवशंकर चौक मार्गे मोहननगरपर्यंत काढण्यात आली. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, विशाल तांबे, वर्षा तापकीर, बाळासाहेब धनकवडे, अभिषेक तापकीर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्याचा’ या घोषवाक्याखाली साईनाथ मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव कॉम्प्लेक्स मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ यांनी एकत्र येत ही संयुक्त शोभायात्रा आयोजित केली.
यावेळी डॉ. दीपक शिकारपूर यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान घेऊन थांबू नये, तर जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी परदेशी भाषांचेही शिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.
ते म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये युवकांनी जागतिक भाषा शिकाव्यात. शाळांपासूनच परदेशी भाषा शिकवणे गरजेचे आहे. सध्या जग दोन भागांत विभागले गेले आहे—एक ज्यांना एआय कळतो आणि दुसरे ज्यांना कळत नाही. काळानुसार एआयचे ज्ञान घेणारेच प्रगतीपथावर असतील.”
डॉ. अमेय पांगारकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आणि विवेक तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य रीतीने होण्यासाठी मानवी बुद्धीचा वापर करावा. मंडळातील सर्व सदस्यांसाठी एआयसंदर्भात ठेवलेल्या प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनाच होईल,” असे ते म्हणाले.
मिरवणुकीच्या संकल्पनेविषयी प्रतीक कुंभार म्हणाले, “कल्पना जिथे असेल तिथे एआय चमत्कार करेल. माणसाची बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाची साथ यामुळे संपूर्ण जगाची वाट बदलणार आहे. हाच विषय घेऊन यावर्षी चित्ररथाची मिरवणूक काढली आहे.”
या मिरवणुकीत पारंपरिक गणेशोत्सवाचा उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. आयोजकांच्या माहितीनुसार, सुमारे ८ ते १० हजार गणेशभक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. ज्ञानप्रबोधिनीच्या पथकाने आपल्या दमदार वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
यावेळी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी अनिरुद्ध येवले, प्रतीक कुंभार, विजय क्षीरसागर, अभिषेक तापकीर, आनंद शिंदे, सोमनाथ शिर्के, संतोष धनकवडे, उदय जगताप, उदय भोसले, करण कदम, आदित्य झाड, उदय गुंडपाटील, अक्षय गोरे, शिरीष देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

