गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम्
समार्चना स्कूल ऑफ डान्सतर्फे आयोजन ; नृत्त, भावाभिनय आणि ताल-संतुलनातून कुचिपुडीची वैशिष्ट्ये उलगडली
पुणे : गणेश कौत्वममधून मंगलाचरण, स्वामी रा रा या शब्दममधून भगवान कृष्णाचे भावपूर्ण चित्रण आणि मरकत मणिमय चेला या तरंगम्मधून ताल, लय व संतुलनाचा प्रत्यय देत सयुजा मुजुमदार हिने आपल्या नृत्यसाधनेचा कलात्मक आविष्कार रंगमंचावर घडवला. नृत्त, भावाभिनय आणि नाट्यमयतेचा सुरेख मिलाफ साधत सादर केलेल्या या रंगप्रवेशम्मध्ये पितळी ताटाच्या कडांवर केलेल्या तरंगम्मधील तालबद्ध हालचाली आणि संतुलनाने रसिकांचे लक्ष वेधले.
समार्चना स्कूल ऑफ डान्स यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास प्रमुख अतिथी नृत्य चूडामणी वैजयंती काशी, प्रमुख पाहुण्या नृत्य निपुण प्रतीक्षा काशी, सयुजाच्या गुरू आणि आई नमिता मुजुमदार, गुरु वैभव आरेकर यांच्यासह नृत्य क्षेत्रातील मान्यवर, गुरू, शिक्षक, कुटुंबीय आणि रसिक उपस्थित होते. या रंगप्रवेशम्निमित्त सयुजाला आरिया विद्यापीठाकडून मान्यतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राग आरभि आणि आदि तालातील गणेश कौत्वमने झाली. भगवान गणेशाला वंदन करणाऱ्या या मंगलाचरणातून सयुजाने नृत्याच्या माध्यमातून गणेशाचे रूप उलगडले. त्यानंतर राग मोहनम् आणि आदि तालातील स्वामी रा रा या शब्दम मध्ये भगवान कृष्णाचे सौंदर्य, मोहक व्यक्तिमत्त्व आणि दैवी गुण भावाभिनयातून साकारले. स्वर, ताल आणि अभिनयाचा सुरेख मेळ या सादरीकरणातून साधण्यात आला.
यानंतर भरतनाट्यम आणि कुचिपुडीमधील हालचालींच्या शैलीतील फरक प्रात्यक्षिकातून स्पष्ट करण्यात आला. समार्चना स्कूल ऑफ डान्सच्या विद्यार्थिनी मल्लिका आणि देविका राजवाडे यांनी अरैमंडीच्या माध्यमातून दोन्ही नृत्यप्रकारांतील शरीराची बैठक, हालचाली आणि प्रवाहीपणातील फरक दाखवून दिला. त्यानंतर मरकत मणिमय चेला या तरंगम्मध्ये सयुजाने कृष्णाचे रूप आणि गुण अभिनयातून साकारत तालबद्ध नृत्य केले. पितळी ताटाच्या कडांवर संतुलन राखत केलेल्या या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
सयुजाने वयाच्या पाचव्या वर्षी नृत्याचे प्रशिक्षण सुरू केले. भरतनाट्यम आणि कुचिपुडीसोबत योगासने, बॅले आणि समकालीन नृत्याचाही तिने अभ्यास केला आहे. कुचिपुडीचे प्राथमिक प्रशिक्षण नमिता मुजुमदार यांच्याकडून घेतल्यानंतर नृत्य चूडामणी वैजयंती काशी यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या प्रशिक्षणाला अधिक व्यापक दिशा मिळाली. बंगळुरू येथील अटक्कलरी सेंटर फॉर मूव्हमेंट आर्ट्स येथे तिने समकालीन नृत्यात डिप्लोमा पूर्ण केला असून, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि कुचिपुडीतील अभ्यासही ती करत आहे.

