सुरक्षा रक्षक नियुक्त्यांसाठी दबाव कोण आणतो, आणि प्रशासन तो दबाव का सहन करते?

Date:

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे, दि. २१ जुलै : पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणारा कथित राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप तातडीने दूर करावा, नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक करावी आणि पोलीस दलाच्या धर्तीवर सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र दिले आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी सुरक्षेविषयी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. महापौरांनीही महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोटतिडकीने भूमिका मांडल्याचे पत्रात म्हटले आहे.

महापालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निविदा आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे. आवडीच्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न आणि दबाव आणला जात असल्याची चर्चा प्रशासनासह पुणेकरांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यापूर्वी एका ठेकेदाराचे काम मुंबईत सुरू असताना त्याची बिले पुण्यातून काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी केवळ रक्कम वसूल करून त्याला मोकळीक देण्यात आली का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

मुख्य सभेत आयुक्तांनी मोकळीक मिळाल्यास पोलीस दलाप्रमाणे सक्षम सुरक्षा रक्षकांची यंत्रणा निर्माण करता येईल, असे सांगितल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. या भूमिकेचे स्वागत करत सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसाठी नेमका कोण दबाव आणतो, दबाव आणण्यामागील कारण काय आणि प्रशासन हा दबाव का सहन करते, याची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा उल्लेख बदली आदेशांमध्ये केला जातो. मग सुरक्षा ठेकेदार आणि कंत्राटी नियुक्त्यांना याच नियमातून वगळण्याचे कारण काय, असा सवालही पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

राजकीय अथवा प्रशासकीय दबाव सार्वजनिक करणे शक्य नसेल, तरी तो दूर करून सुरक्षा रक्षकांची निवड गुणवत्ता, प्रशिक्षण आणि कार्यक्षमतेच्या आधारावर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दबावामुळे नियुक्त करण्यात आलेल्या अपात्र कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करावे आणि महापालिकेच्या प्रतिमेला साजेशी प्रशिक्षित सुरक्षा यंत्रणा उभारावी, असेही पत्रात म्हटले आहे.

आयुक्त नवल किशोर राम हे निष्पक्ष, कार्यक्षम आणि शहरहिताचा विचार करणारे अधिकारी असल्याचा विश्वास व्यक्त करत या प्रकरणात तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती करण्यात आली आहे.

या पत्राची प्रत नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि सुरक्षा विभागाच्या उपायुक्तांनाही पाठविण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व...

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ पुणे,...