22-23 जानेवारीला यास आयलंडवरील एतिहाद एरिनात 27 वा IIFA सोहळा; 18 सप्टेंबरपासून तिकीटविक्री
अबू धाबी : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अर्थात IIFA Weekend & Awards 2027 च्या 27 व्या आवृत्तीचे आयोजन 22 आणि 23 जानेवारी 2027 रोजी अबू धाबीतील यास आयलंडवर करण्यात येणार आहे. एतिहाद एरिना येथे होणाऱ्या या दोन दिवसांच्या सोहळ्यात सलमान खान, करीना कपूर खान, शाहिद कपूर यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.
IIFAने जाहीर केलेल्या कलाकारांच्या यादीत सलमान खान, करीना कपूर खान, शाहिद कपूर, करण जोहर, वरुण धवन, जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांचा समावेश आहे. अधिकृत IIFA संकेतस्थळानुसार करण जोहर आणि वरुण धवन होस्ट म्हणून, तर सलमान खान, करीना कपूर आणि जान्हवी कपूर परफॉर्मर म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
अबू धाबीमध्ये IIFAचे आयोजन होण्याची ही चौथी वेळ आहे. हा सोहळा Department of Culture and Tourism – Abu Dhabi आणि Miral यांच्या भागीदारीत होणार असून, त्यासाठी अधिकृत करारही करण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या कार्यक्रमात पुरस्कार सोहळा, कलाकारांचे लाइव्ह परफॉर्मन्स, ग्रीन कार्पेट आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. तिकीटविक्री 18 सप्टेंबर रोजी UAE वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
2025 मध्ये जयपूरमध्ये झाला होता रौप्यमहोत्सवी सोहळा
IIFAचा 25 वा रौप्यमहोत्सवी सोहळा मार्च 2025 मध्ये जयपूर येथे झाला होता. त्या सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित लापता लेडीजने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कारांवर नाव कोरले होते.
IIFA पुरस्कारांची सुरुवात 2000 मध्ये झाली. त्यानंतर लंडन, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, दुबई, थायलंड, मकाऊ, श्रीलंका, कॅनडा, अमेरिका, स्पेन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीसह विविध देशांत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

