१८ सप्टेंबरपासून मध्य पुण्यात अनेक रस्ते बंद :१८ ते २५ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी ५ नंतर वाहनबंदी

Date:

लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडसह मध्यवर्ती भागातील मार्गांवर निर्बंध:गणेशोत्सव देखावे पाहायला जाणाऱ्यांसाठी मोठा वाहतूक बदल

पुणे, दि. १७ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवातील देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक शाखेने महत्त्वाचे वाहतूक बदल जाहीर केले आहेत. १८ सप्टेंबरपासून काही प्रमुख रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार असून, १८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान साजरा होत आहे. शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी पुण्यासह शहराबाहेरील भाविक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून कोंडी होण्याची शक्यता असल्याने हे बदल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

१८ सप्टेंबरपासून दोन प्रमुख मार्गांवर वाहनबंदी

१८ सप्टेंबरपासून लक्ष्मी रोडवरील हमजेखान चौक ते सेवासदन चौक हा मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गासाठी डुल्या मारुती चौक तसेच महाराणा प्रताप रोड-घोरपडे पेठ-शंकरशेठ रोडमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक या मार्गावरही वाहनांना बंदी राहणार आहे. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना एस. जी. बर्वे चौक, जंगली महाराज रोड, अलका चौक, टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करता येईल. दुसरा पर्याय म्हणून सिमला चौक-कामगार पुतळा-शाहीर अमर शेख चौक-नेहरू रोडमार्गे स्वारगेटकडे जाता येणार आहे.

१८ ते २५ सप्टेंबर : सायंकाळी ५ नंतर मध्यवस्तीत मोठे निर्बंध

दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार चारचाकी, रिक्षा आणि दुचाकींसह सर्वसामान्य वाहनांना खालील मार्गांवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

  • लक्ष्मी रोड : सेवासदन चौक ते टिळक चौक
  • शिवाजी रोड : रामेश्वर चौक ते जेधे चौक
  • बाजीराव रोड : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक
  • सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक-हिराबाग चौक
  • दिनकर जावळकर पथ ते पायगुडे चौक-हिराबाग चौक
  • कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रोड
  • सणस रोड : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक
  • पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी
  • गंज पेठ चौक ते वीर लहुजी वस्ताद तालीम
  • गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी
  • कोहिनूर चौक ते बाबाजान चौक
  • जेधे प्रसाद रोड/सुभानशहा रोड परिसर, पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक आणि सुभानशहा दर्गा ते सोन्या मारुती चौक
  • गुरुनानक पथ-हमजेखान चौक-देवजीबाबा चौक परिसरातही आवश्यकतेनुसार वाहतुकीचे नियमन

या मार्गांसाठी टिळक रोड, केळकर रोड, महाराणा प्रताप रोड, शंकरशेठ रोड, नेहरू रोड, सेंट्रल स्ट्रीट, भगवान महावीर चौक, सरबतवाला चौक आदी मार्गांचा पर्यायी वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही लहान अंतर्गत रस्त्यांना पर्यायी मार्ग देणे शक्य नसल्याचे वाहतूक शाखेने नमूद केले आहे.

पूरम चौक परिसरात तात्पुरती दुहेरी वाहतूक

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टेलिफोन भवन ते पूरम चौक या भागातील एकेरी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करून आवश्यकतेनुसार दुहेरी वाहतुकीची व्यवस्था केली जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे वाहनचालकांनी त्या भागातील वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

मध्यवर्ती भागात पार्किंग टाळा

गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात शिवाजी रोड, मंडई, शनिपार, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक आणि बुधवार चौक परिसरात वाहन पार्किंगवर निर्बंध असणार आहेत. वाहतूक शाखेने नागरिकांना मध्यवर्ती भागात शक्यतो खासगी वाहने आणू नयेत आणि उपलब्ध सार्वजनिक वाहतूक तसेच नियोजित पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. प्रत्यक्ष गर्दीची परिस्थिती पाहून काही मार्ग तत्काळ बंद किंवा खुले करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी मार्गातील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; तळेगावमध्ये नवी शाखा सुरू

शून्य लॉगइन फी आणि ₹५० लाखांपर्यंत तात्काळ कर्ज मंजुरीची...

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून ‘स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅन’ लाँच

५ फंड्स आणि ४ गुंतवणूक धोरणांचे पर्याय; निवृत्तीसाठी स्वतंत्र...

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे मोफत आरोग्य शिबिर

११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप - विविध रुग्णालयांचा सहभाग पुणे...