आवाज, वास आणि स्पर्शाच्या माध्यमातून वीज सुरक्षेचे धडे; महावितरणचे विशेष प्रबोधन सत्र
पुणे, दि. १७ सप्टेंबर २०२६ : डोळ्यांना दृष्टी नसली तरी कान, नाक आणि स्पर्शाच्या माध्यमातून जग समजून घेण्याची विलक्षण क्षमता असलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थिनींनी आवाज, वास आणि स्पर्शाच्या माध्यमातून वीज सुरक्षा, हरित ऊर्जा आणि ऊर्जा बचतीचे धडे घेतले. पुण्यातील ‘द पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड’ येथे अभियंता दिनानिमित्त महावितरणच्या वतीने आयोजित विशेष प्रबोधन सत्रात विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्युत सुरक्षेची माहिती देण्यात आली.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांनी सूर्यप्रकाश व वाऱ्यापासून मिळणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व आणि त्यातून पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येते, हे सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केले. सहाय्यक अभियंता अतुल धांडोरे यांनी विजेचा दैनंदिन वापर आणि घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थिनींशी संवाद साधला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता चरणसिंग इंगळे यांनी घरातील विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड, तुटलेल्या किंवा उघड्या तारा तसेच पावसाळ्यातील विद्युत धोके याबाबत मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांपर्यंत वीज सुरक्षा आणि ऊर्जा साक्षरतेचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
सहाय्यक अभियंता अतुल धांडोरे, सहाय्यक अभियंता पल्लवी सासणे, कार्यालयीन सहाय्यक विष्णू भुजबळ आणि वरिष्ठ तंत्रज्ञ जमील शेख यांनी विशेष प्रात्यक्षिके घेतली. डासांच्या रॅकेटच्या माध्यमातून शॉर्ट सर्किटच्या ठिणग्यांसारखा ‘चर्र-चर्र’ आवाज ऐकविण्यात आला. जळालेल्या वायरच्या इन्सुलेशनचा वास जाणवून देत विद्युत बिघाडाची पूर्वसूचना कशी ओळखायची, हे समजावण्यात आले. सुरक्षित रबर कोटिंगची वायर आणि उघडे जॉइंट असलेल्या धोकादायक वायरमधील फरक स्पर्शातून जाणून घेण्याची संधीही विद्यार्थिनींना देण्यात आली.
विद्यार्थिनींसाठी अशा पद्धतीने वीज सुरक्षेवर प्रबोधन करण्याचा हा शाळेतील पहिलाच उपक्रम असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा रांका आणि शिक्षकांनी सांगितले. सत्राच्या अखेरीस विद्यार्थिनींनी स्वतःहून पुढे येत आत्मविश्वासाने त्यांनी काय शिकले, हे सांगितले.

