प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड; चौघांनाही मुख्य अभियंता म्हणून दीर्घ अनुभव
मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२६ : महावितरणच्या प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालकपदी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा आणि सुनील काकडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. हे चारही अधिकारी यापूर्वी महावितरणमध्ये मुख्य अभियंता म्हणून विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.
अंकुर कावळे हे यापूर्वी महावितरणच्या मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता (वितरण) म्हणून कार्यरत होते. त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे. १९९७ मध्ये सहायक अभियंता म्हणून तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात रुजू झाल्यानंतर त्यांनी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०२५ पासून ते मुंबई मुख्यालयात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
संदीप पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून २००३ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहायक अभियंता म्हणून सेवेत प्रवेश केला. २००९ मध्ये थेट भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. २०१८ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२५ मध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. नियुक्तीपूर्वी ते मुख्यालयात मुख्य अभियंता (वीज खरेदी) म्हणून कार्यरत होते.
चंद्रमणी मिश्रा यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. २००३ मध्ये सहायक अभियंता म्हणून सेवा सुरू केल्यानंतर त्यांनी अलिबाग, वाशी, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे विविध पदांवर काम केले. २००९ मध्ये थेट भरतीतून त्यांची कार्यकारी अभियंतापदी निवड झाली. २०१८ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२४ मध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. यापूर्वी ते कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता होते.
सुनील काकडे यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली असून १९९७ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहायक अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अहिल्यानगर आणि भांडूप येथे विविध पदांवर काम केले. २०२२ मध्ये त्यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. भांडूप परिमंडलानंतर २०२५ पासून ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
महावितरणच्या विविध तांत्रिक, वितरण, वीज खरेदी आणि परिमंडल पातळीवरील कामकाजाचा अनुभव असलेल्या या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

