महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई, दि. ४ : यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल व खो-खो या खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्याला भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअॅपशी जोडण्याचे व स्कूल बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याचे दिले निर्देश
मुंबई, दि. ४ मार्च २०२६ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित कालमर्यादेत अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले.
अहवालात बसस्थानके, रेल्वे स्थानके व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सीसीटीव्ही, प्रकाशव्यवस्था, महिला पोलिसांची गस्त, हेल्पलाईन, पॅनिक बटण, स्वच्छतागृहे, तक्रार नोंदणी प्रणाली आणि ‘हिरकणी कक्ष’ यांची स्थिती तपासण्यात आली. अनेक सुविधा अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः पॅनिक बटण प्रणाली कार्यक्षम नसल्याचे आढळल्याने ती नियंत्रण कक्षाशी तसेच व्हॉट्सअॅप क्रमांकाशी थेट जोडण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळेल.
डॉ. गोऱ्हे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत शालेय बस चालक व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही संदर्भातील स्पष्ट फलक लावणे, पॅनिक बटणाविषयी जनजागृती वाढवणे आणि शाळांनी बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पीडित मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळतोय का याची पडताळणी करून आवश्यकतेनुसार समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना आखून त्यांच्या नोंदीसाठी विशेष ॲप विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच वन स्टॉप क्रायसिस सेंटरचा नियमित आढावा घेऊन प्रत्यक्ष लाभार्थींना मदत मिळते का याचे मूल्यमापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परिवहन विभागाने ६३३ ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्याची माहिती दिली असून प्रत्येक बसस्थानकावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले. शालेय बसमध्ये महिला सहाय्यक नेमणे बंधनकारक करण्यात आले असून लवकरच सर्व बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटण प्रणाली अनिवार्य करून ती पोलीस विभागाशी जोडण्यात येणार आहे. पोलीस विभागाने शाळा सुटण्याच्या वेळेत गस्त वाढवली असून प्रत्येक पोलीस चौकीत ‘भरोसा सेल’ कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीस अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव (शालेय शिक्षण) तुषार महाजन, कामगार कल्याण आयुक्त भास्कर मोराडे, उपायुक्त (महिला व बाल कल्याण) राहुल मोरे तसेच एस.टी. महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. तिकोटकर , शारदा साठे ,स्त्री मुक्ती परिषद आदी उपस्थित होते.स्त्री मुक्ती परिषद व स्री आधार केंद्राने सेफ्टी अॅाडिट म्हणजेच महिला सुरक्षेचा लेखाजोखा यांवर १० फेब्रुवारी २६ रोजी शिष्टमंडळ भेटुन कार्यवाहीची विनंती केली होती .
बैठकीच्या शेवटी प्रत्येक बसस्थानकावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र मदत केंद्र सुरू करण्याचे, रेल्वे व एसटीसाठी स्वतंत्र दक्षता समित्या स्थापन करण्याचे आणि स्वच्छतागृह व ‘हिरकणी कक्ष’ यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. उपसभापती कार्यालयामार्फत स्वतंत्र महिला सुरक्षा समिती स्थापन करून सेफ्टी ऑडिटमधील सर्व शिफारशींची टप्प्याटप्प्याने काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.
या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.’ चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.
मुंबई- राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च असून, 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत आहे. विनोद तावडे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच मराठी भाषा (भाषा) आणि संस्कृती खात्याचे मंत्रिपदही भूषविले आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली. सध्या ते भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि 12 व्या आणि 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या समन्वय समितीचेही ते प्रमुख सदस्य होते. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा संघटनात्मक कामातून मुख्य प्रवाहात आलेत. आठवलेंना तिसऱ्यांदा संधी
रिपाइंचे रामदास आठवले यांना यंदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यांची पत्ता कट होणार, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, भाजपने आपल्या कोट्यातून सलग तिसऱ्यावेळेस आठवलेंना राज्यसभेची संधी दिलीय. विशेष म्हणजे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवार 3 मार्च रोजी भेट घेतली होती. त्यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला.’
हिंगोली जिल्ह्यातले भाजप नेते व माजी आमदार रामराव वडकुते यांना यंदा भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. धनगर समाजाचे नेते ही वडकुते यांची ओळख. ते 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 मध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. येथून युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव सातव यांची वर्णी लागली. त्यानंतर वडकुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले. आता त्यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिलीय.
आदिवासी नेत्या असणारे माया इवनाते या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून गणल्या जातात. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगावर त्यांनी सदस्य म्हणून काम केलेय. त्या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरच्या लेकीला भाजपने राज्यसभेची संधी दिलीय.
महाराष्ट्रातून सात राज्यसभा खासदारांची मुदत संपत आहे. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतः शरद पवार आणि फौजिया खान, काँग्रेसमधून रजनी पाटील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रियांका चतुर्वेदी, भाजपकडून धैर्यशील पाटील आणि भागवत कराड, तर रिपाइंचे रामदास आठवले यांची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपतेय. त्यामुळे या रिक्त जागांवर ही निवडणूक होतेय. यात रामदास आठवले यांना पु्न्हा एकदा भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आलीय.
महाराष्ट्रातील विधानसभेतले सध्याचे संख्याबळ पाहता, भाजपचे सर्वाधिक 4 उमेदवार निवडून येण्याची शक्यताआहे.. एकनाथ शिंदेंची शिवसेना 1, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि महाविकास आघाडीची 1 जागा या ठिकाणी निवडून येऊ शकते. संख्याबळानुसार चौथी जागा निवडून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागेल. राज्यातील 7 जागांसाठी प्रत्येकी 37 मतांचा कोटा निश्चित केला आहे.
भाजपला चौथ्या जागेसाठी 37 मते पूर्ण करताना काही अपक्ष आणि मित्रपक्षांच्या अतिरिक्त मतांची गरज भासेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या गणितात माहीर मानले जातात. यापूर्वीही त्यांनी कमी संख्याबळ असताना उमेदवार निवडून आणून विरोधकांना धक्का दिलाय. त्यामुळे यावेळीही अपक्ष आमदारांची मदत घेऊन भाजप आपली चौथी जागा सुरक्षित करतील, असे जाणकार सांगतायत.
पुणे, दि.४: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.
संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in, https://x.com/i/status/2027746402575782262 नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.
डिप्रेशनच्या औषधांचा नशेसाठी वापर, पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई केली- योगेश कदम
मुंबई-पुणे शहरात नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत विधान परिषदेत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देत या प्रकरणातील कारवाई व तपासाची माहिती सभागृहात दिली.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, प्रश्नामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या काही औषधांचा वापर वैद्यकीय कारणांसाठी, विशेषतः डिप्रेशनसारख्या आजारांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. त्यामुळे ही औषधे प्रमाणित असून वैद्यकीय उपचारासाठी त्यांचा वापर केला जातो.
पुणे शहरात ज्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या, त्या संदर्भात पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतःहून (सुओ मोटू) कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींकडून औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासात असे आढळून आले आहे की, या औषधांची विक्री कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून झालेली नाही. संबंधित औषधांचे उत्पादन हिमाचल प्रदेशमध्ये झाले असून तेथून मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन देशभर वितरित केले जाते. उत्पादनानंतर विविध वितरकांमार्फत ही औषधे देशातील विविध भागांमध्ये पोहोचवली जातात.
या प्रकरणातील तपासात पुढे असेही समोर आले आहे की, पुण्यात सापडलेला औषधांचा साठा हा कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आला होता. या पुरवठ्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यात आली असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही राज्यमंत्री कदम यांनी दिली.
यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, औषधांच्या विक्रीसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संबंधित मेडिकल स्टोअर्सवर नियमितपणे कारवाई करण्यात येते. आवश्यक असल्यास संबंधित दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही केली जाते.
राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांबाबत अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना परंपरा’ या मालिकेतील सहाव्या सत्रात रविवारी गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या सांगीतिक योगदानावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आधुनिक काळात स्त्री कलाकारांना मानाचे स्थान देण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या हिराबाई बडोदेकर यांच्यावर हा कार्यक्रम सादर होण्याचे औचित्य आहे. कार्यक्रम दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्वरयमी गुरुकुल सभागृह, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर, शिवाजीनगर येथे होणार आहे. यात संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर हे हिराबाई बडोदेकर यांच्या खयाल गायकीची मर्मस्थळे उलगडून सांगणार आहेत. या वेळी काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणेही ऐकविली जाणार आहेत. कार्यक्रमास रसिकांना मुक्त प्रवेश असल्याचे स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.
भारतीय ग्राहकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस; AIRMATIC सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, AMG लाईन एक्स्टेरिअर, व्हेंटिलेटेड सीट्स. V-Class (डीझेल V300d आणि पेट्रोल V300) ची संपूर्ण भारतात एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रु.
“भारतीय बाजारपेठेसाठी एकदम कोरी करकरीत नवीन V-Class सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विशेष ग्राहकांना लक्झरी, प्रशस्त जागा आणि त्यांचा खाजगीपणा जपत उत्कृष्ट अनुभव देत ‘प्रायव्हेट सूट’ ची संकल्पना नव्याने परिभाषित करत आहे. प्रवास करताना ज्या ग्राहकांना लक्झरीच्या जोडीला वैयक्तिक जागा, शांतता आणि खाजगीपणा हवा असतो अशा भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंड सेटर यांच्यात वाढत असलेल्या प्रवाहाला प्रतिसाद देणारी V-Class आहे. आमच्या ग्राहकांसाठी लक्षणीय मूल्यवृद्धी करत V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय आमची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो.”
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर
· एकदम नवीन V-Class एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस (WB:3430mm L:5370 mm) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे
· V-Class भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनसह सादर
· V-Class चे AIRMATIC एअर सस्पेन्शन विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत
· आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित वाहन: सर्वोत्तम 7 स्टँडर्ड एअरबॅग्स (A-to-D पिलर विंडो एअरबॅग्स), ॲक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, 360° कॅमेरा आणि अटेंशन असिस्ट सह ड्रायव्हर कॅमेरा
· प्रीमियम स्टँडर्ड वैशिष्ट्ये: स्टँडर्ड स्वरूपात AMG Line एक्स्टेरिअर, तीनही रांगांमध्ये मसाज आणि व्हेंटिलेशनसह फर्स्ट-क्लास लक्झरी सीट्स, AIRMATIC एअर सस्पेन्शन, मल्टिबीम एलईडी हेडलॅम्प्स, बर्मेस्टर सराउंड साउंड आणि 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज
· इंडिया फर्स्ट वैशिष्ट्ये: पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनवर AIRMATIC एअर सस्पेन्शन सादर करणारी भारत ही जगातील पहिली बाजारपेठ आहे. तसेच V-Class या विभागातील व्हेंटिलेटेड थर्ड-रो सीट्स देणारे पहिले वाहन आहे
· नवीन V-Class बुकिंगसाठी उपलब्ध असून विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना प्राधान्य वितरण केले जाईल
· V-Class चे बुकिंग 5 लाख रु. मध्ये करता येईल. त्यायोगे ग्राहक प्रारंभिक किंमत मिळविण्यासाठी पात्र ठरतील
मुंबई: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी लक्झरी दळणवळण क्षेत्राची नव्याने व्याख्या करत भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने आज संपूर्णपणे नवीन V-Class सादर केली. नवीन V-Class मध्ये अतुलनीय जागा, आलिशान आराम आणि अवांत-गार्ड डिझाइन यांचा सुरेख मिलाफ आहे. यामुळे प्रवासादरम्यान लक्झरी आणि खाजगीपणा यांच्या जोडीने ग्राहकांना शांत, संतुलित आणि अभूतपूर्व वातावरणाचा अनुभव मिळतो.
ज्यांना आपल्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि जे अतुलनीय आरामात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात खास अशा लोकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस कॉन्फिगरेशन (5,370 मीमी लांबी, 3,430 मीमी व्हीलबेस, 1,928 मीमी रुंदी, 1,880 मीमी उंची) मध्ये उपलब्ध असलेली V-Class डिझाइन केली आहे.
‘वैयक्तिक लक्झरी स्पेस’ या वाढत्या प्रवाहाला प्रतिसाद देत V-Class लक्झरी गतिशीलतेची एक नवीन श्रेणी सादर करते: वैशिष्ट्यपूर्णता आणि सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती, ट्रेंडसेटर्स आणि संपन्न भारतीय कुटुंबांसाठी वैयक्तिक जागा, स्वातंत्र्य आणि आलिशान आरामाचा संगम.
V-Class सह मर्सिडीज-बेंझ चोखंदळ ग्राहकांना एक ‘प्रायव्हेट सूट’ सादर करतात. प्रत्येक प्रवासाला अत्यंत वैयक्तिक अनुभवामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेली ही गाडी असून त्यायोगे चाकांवरील, फिरती अशी एक क्युरेटेड जागा निर्माण होते. V-Class खऱ्या अर्थाने प्रवासातील प्रायव्हेट सूट बनते — अत्यंत आधुनिक, प्रशस्त आणि ग्राहकांच्या वैयक्तिक पसंतीनुसार आकाराला आलेली. वाढत्या प्रमाणात भारतीय कुटुंबे कुटुंबासह, पाळीव प्राण्यांसह प्रवासासाठी लक्झरी खाजगी वाहने पसंत करत आहेत आणि अशा कुटुंबांना आपल्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी V-Class परिपूर्ण आहे. ज्यांच्यासाठी लक्झरी, स्वातंत्र्य आणि खाजगीपणा जपत प्रवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा कुटुंबांसाठी V-Class हे महत्वाचे वाहन असेल.
अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये दुसऱ्या रांगेत 3-स्टेज व्हेंटिलेशन आणि मसाज, काल्फ सपोर्ट, डिप्लोयेबल कपहोल्डर्स आणि वायरलेस चार्जिंगसह फर्स्ट-क्लास स्वतंत्र लक्झरी सीट्स देण्यात आल्या आहेत. तिसरी रांग या सेगमेंटमधील व्हेंटिलेटेड सीट्स देणारे पहिले वाहन म्हणून नवीन मापदंड निर्माण करते; त्यासोबत 3-पॉइंट सीट बेल्ट्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरज आणि USB चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत. एक आलिशान कमांड सेंटर निर्माण करत पुढील रांगेत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, कुशन लांबी अॅडजस्टमेंट आहेत.
केबिन वातावरण 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, डॉल्बी अॅटमॉससह Burmester® सराउंड साउंड सिस्टम, (15 लाउडस्पीकर्स, 640 W आउटपुट), THERMOTRONIC ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनब्लाइंडसह हीट-इन्सुलेटिंग ग्लास आणि निसर्गध्वनींसह दहा सुसंवादी मधुर वेलनेस मोड्स असलेल्या ENERGIZING Comfort प्रोग्रामद्वारे अधिक उंचावले गेले आहे. दोन्ही बाजूंवरील इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे किल्ली, बाह्य दरवाजा हँडल, ड्रायव्हर सीट किंवा दरवाजावरील बटणाद्वारे ऑपरेट करता येतात, तर इलेक्ट्रिकली ऑपरेबल स्प्लिट टेलगेटमुळे अरुंद जागेतही सहजपणे लोडिंग करता येते.
स्थानिक उत्पादन: ‘मेक इन इंडिया’ बांधिलकी अधिक दृढ
मर्सिडीज-बेंझ इंडिया V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करणार आहे. हा धोरणात्मक निर्णय भारतीय बाजारपेठेबाबत कंपनीची तीन दशकांची बांधिलकी अधिक मजबूत करतो. मर्सिडीज-बेंझने अतिआलिशान मर्सिडीज-मेबॅक GLS SUV च्या स्थानिक उत्पादनाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. या वर्षी स्थानिक उत्पादनासाठी जाहीर केलेले V-Class हे मर्सिडीज-बेंझचे दुसरे उत्पादन असेल.
परिशिष्ट: उत्पादन तपशील: मर्सिडीज-बेंझ V-Class
वैशिष्ट्य
पेट्रोल
डिझेल
Displacement
1999 cc
1951 cc
Max Rated Power
170 kW (228 bhp) + 15 kW (20 bhp)
174 kW (233 bhp)
Transmission
9G-TRONIC
9G-TRONIC
· सस्पेन्शन: AIRMATIC एअर सस्पेन्शन (दोन्ही पॉवरट्रेनवर सादर होणारी भारत ही पहिली बाजारपेठ) प्रत्येक भूभागावर वाढलेला ड्रायव्हिंग कम्फर्ट, उच्च वेगावर सुधारित इंधन वापर आणि निवडक ड्राइव्ह प्रोग्राम्ससह स्वयंचलितरित्या नियंत्रित डॅम्पिंग
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यात १५० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मते या हल्ल्यासाठी कोण जबाबदार आहे, हे सांगण्यात आले नाही.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची त्वरित, निष्पक्ष आणि पूर्ण चौकशी व्हायला हवी. जिनिव्हा येथे पत्रकार परिषदेदरम्यान प्रवक्त्या रवीना शमदासानी यांनी सांगितले की, ज्या पक्षाने हल्ला केला आहे, त्याच पक्षाची जबाबदारी आहे की त्यांनी याची चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे.
त्यांनी या घटनेला खूप भयानक म्हटले आणि सांगितले की, सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रतिमा या संघर्षाची भीषणता आणि वेदना दर्शवतात. ही शाळा दक्षिण इराणमध्ये आहे आणि तिच्यावर शनिवारी हल्ला झाला होता. त्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली होती.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, अमेरिकन सैन्य जाणूनबुजून कोणत्याही शाळेला लक्ष्य करत नाही. तर इस्त्रायलने म्हटले आहे की, ते या घटनेची चौकशी करत आहेत. अमेरिकेचे दावे…
इराणची 17 जहाजे नष्ट करण्यात आली, ज्यात एक पाणबुडी देखील समाविष्ट आहे.
या ऑपरेशनमध्ये 50,000 हून अधिक अमेरिकन सैनिक सहभागी आहेत.
सुमारे 200 फायटर जेट, दोन विमानवाहू जहाजे आणि बॉम्ब टाकणारी विमाने यात समाविष्ट आहेत.
इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिकेने या युद्धाला ‘एपिक फ्युरी’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ ‘भयंकर राग’ असा होतो. शोध मोहिमेदरम्यान इराणी युद्धनौकेतून मृतदेह सापडले श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ शोध मोहिमेदरम्यान इराणी युद्धनौकेतून काही मृतदेह सापडले आहेत. श्रीलंकेच्या नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरून यापूर्वीच संकटाचा फोन आला होता. युद्धनौकेवर पाणबुडीने हल्ला केला होता.
नौदलाच्या म्हणण्यानुसार, शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान समुद्रातून काही मृतदेह सापडले आहेत. असा संशय आहे की, हे जहाजातील क्रू मेंबर्सचे असू शकतात, जरी मृतांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ईशभक्ती आणि मनःशांती साठी समाजकार्य हा सर्वोत्तम पर्याय – संदीप खर्डेकर.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे सेवासदन दिलासा कार्यशाळेस विविध उपयोगी वस्तू भेट.
पुणे-सेवासदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही 18 ते 45 वयोगटातील प्रौढ मानसिक दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांच्या विक्रीतून त्यांना स्वावलंबी बनविते हे कौतुकास्पद असल्याचे मत महापौर मंजुषा नागपूरे यांनी व्यक्त केले. मात्र 45 वर्षापुढील मानसिक दिव्यांगांसाठी काय करता येईल याबाबत योजना आखण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यासाठी “विशेष व्यक्तींसाठी” कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या मदतीने, सी एस आर किंवा मनपा तर्फे काय करता येईल याबाबत मी पुढाकार घेईन असेही महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.
राजकारणाची पातळी कितीही घसरली तरी आपण आपले कामं करत रहायचे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून संदीप आणि मंजुश्री खर्डेकर दाम्पत्य करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार मा. महापौर मंजुषा नागपुरे यांनी काढले. तसेच पेंशन ही हजार दोन हजार रुपये असते ती दिव्यांगांसाठी तुटपुंजी ठरेल म्हणून दीर्घाकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करूयात असेही त्या म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने सेवासदन च्या दिलासा कार्यशाळेस विविध उपयोगी साहित्याची मदत त्यांच्या हस्ते देण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,नगरसेवक पुनीत जोशी,प्रशांत हरसूले,ऍड. प्राचीताई बगाटे,सेवासदन संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, सहसचिव अर्चना शहाणे,
व्यवस्थापिका सौ. मेघनाताई जोशी,सीमाताई दाबके,प्रभागाचे सरचिटणीस वैभव जमदाडे,युवा मोर्चा अध्यक्ष योगेश कर्पे, केतकी कुलकर्णी, संगीता शेवडे, रुपाली मगर, समीर ताडे,रुक्मिणी ताम्हाणे, जयश्री घाटे, बापू गोहाड,भाजपा चे प्रभाग 29 चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना संदीप खर्डेकर यांनी सांगितलं की सध्या राजकारणाची पातळी घसरत चालली असून राजकारणासाठी मुद्द्यांवर विरोध न राहता तो आता वैयक्तिक विरोधाच्या पातळीवर पोहचला असून एकमेकांना बदनाम करणे, वैयक्तिक उणी दुणी काढणे सुरु आहे.
अश्या वातावरणात ईशभक्ती आणि मनःशांती साठी समाजकार्य हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.
पुनीत जोशी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित असलेल्या अंत्योदय प्रमाणेच क्रिएटिव्ह फाउंडेशन व भाजपा कार्यकर्ते कार्यरत आहेत असे नमूद केले.
सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या कार्याची माहिती देताना ” आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो” हे सांगतानाच समर्थ पथावरील शक्ती 98 चौकात मनपा च्या सहकार्याने कायम स्वरूपी दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र मी उभारले असल्याचे सांगितले.
भाजपा च्या प्रभाग 29 च्या अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह महापौरांचा सत्कार केला तर ह्या वेळी संस्थेच्या वतीने चिंतामणी पटवर्धन, अर्चना शहाणे व मेघना जोशी यांनी महापौरांचा सत्कार केला.
आजच्या कार्यक्रमात सेवासदन दिलासा कार्यशाळेस सतरंज्या, प्रेशर कुकर, कढया, डबे, मास्क, ग्लोव्हज व इतर वस्तू भेट देण्यात आल्या व पुढील आर्थिक वर्षात अधिक मदत करू असे संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले. मनपा ने ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, हास्यक्लब अश्यांना वस्तू रुपी मदतीसाठी तरतूद करावी ह्या मागणीचा ही खर्डेकर यांनी पुनरूच्चार केला.
महापौरांनी मुलांमध्ये मिसळून भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अश्या घोषणा दिल्या त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत गेल्या 48 तासांत आखाती देशांच्या अनेक प्रमुखांशी चर्चा केली. सर्वात आधी त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी बोलणे केले.मोदींनी ओमानचे सुलतान, कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आखाती प्रदेशातील दोन प्रमुख नेत्यांशी, ओमानचे सुलतान आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा यूएईमधून 4 विमाने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूला पोहोचली. अबू धाबीमध्ये अडकलेल्या भारतीयांनी देशात परतल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला. एका प्रवाशाने सांगितले की, अबू धाबीमध्ये आमच्या हॉटेलजवळच स्फोट झाले. भारत सरकारने सर्व राज्यांना भडकाऊ भाषणांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. इंडिगो एअरलाइन आज सौदी अरेबियातील जेद्दा येथून हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादसाठी 10 विशेष विमाने उडवणार आहे.
त्याचबरोबर, एअर इंडिया एक्सप्रेस मस्कटसाठी उड्डाणे सुरू करत आहे. यादरम्यान, अबू धाबीची एतिहाद, दुबईची एमिरेट्स आणि फ्लायदुबईने निवडक उड्डाणे सुरू केली आहेत. अबू धाबी विमानतळावरून एतिहादची 15 विमाने इस्लामाबाद, पॅरिस, ॲमस्टरडॅम, मुंबई, कैरो, लंडनसाठी रवाना झाली. दुबईत अडकलेल्या खासदाराची मुलगी ३ दिवसांनी सुखरूप परतली इस्रायल-इराण संघर्षामुळे विमान रद्द झाल्यामुळे दुबईत अडकलेल्या चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांची मुलगी मंगळवारी सकाळी सुरक्षितपणे भारतात परतली. गेल्या तीन दिवसांपासून ती तिथेच अडकली होती.
खासदाराने स्पष्ट केले की त्यांची मुलगी व्यवसायाच्या सहलीवर दुबईला गेली होती परंतु विमान रद्द झाल्यामुळे ती परत येऊ शकली नाही. “एक वडील म्हणून, हे दिवस चिंता आणि अनिश्चिततेने भरलेले आहेत. आज सकाळी तिचे सुरक्षित परतणे आमच्यासाठी भावनिक आणि दिलासादायक क्षण आहे,” असे ते म्हणाले.
खंडेलवाल यांनी स्पष्ट केले की कठीण परिस्थिती असूनही, दुबईमध्ये प्रशासकीय सुव्यवस्था आणि सामाजिक शिस्त कायम राहिली. फक्त आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या.
त्यांनी सांगितले की भारतीय समुदाय आणि स्थानिक नागरिकांनी अडकलेल्यांना मदत केली. भारतीय दूतावास देखील सतत संपर्कात राहिला आणि सर्वतोपरी मदत केली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी क्रेमलिनने सांगितले की पुतिन आखाती नेत्यांच्या वाढत्या चिंता थेट तेहरानला पोहोचवतील.पुतिन यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि प्रादेशिक संघर्ष वाढण्याबद्दल आणि त्याच्या संभाव्य गंभीर परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की पुतिन तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी राजनैतिक प्रयत्न करतील. अलिकडच्या हल्ल्यांमध्ये सौदी रिफायनरी, युएईचे फुजैराह ऊर्जा केंद्र आणि कतारचे रास लाफन एलएनजी सुविधेवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की इराण बोलू इच्छित आहे, पण आता खूप उशीर झाला आहे.
ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, “त्यांचे हवाई संरक्षण, हवाई दल, नौदल आणि नेतृत्व गेले आहे. त्यांना बोलायचे आहे.” तथापि, रविवारी ट्रम्प यांनी म्हटले होते की ते इराणी नेत्यांशी बोलण्यास तयार आहेत.ते म्हणाले, “त्यांना बोलायचे आहे आणि मी बोलण्यास सहमत आहे. त्यांनी ते लवकर करायला हवे होते.” युद्धापूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या होत्या.इराणमध्ये १५८ शाळकरी मुलींवर अंत्यसंस्कार पार पडले.
इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १५८ शाळकरी मुलींवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार
पुणे सोलापूर येथे दिनांक २८ आणि २९ मार्चला चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला होता. निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक सौ. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके दिली जाणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला कुस्ती केलेला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या भाग्यश्री हिच्यापुढे अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले, वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २० वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच थायलंडमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गतवेळच्या महाराष्ट्र केसरी जेतेपदाच्या लढतीत भाग्यश्रीने अमृताला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते. “पुरुषाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची दरवर्षी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठी उत्सुकता असते. तशीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धासुद्धा आपली छाप पाडते आहे. वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली आहे. मी आणि आमची संघटना या आयोजनासाठी त्यांच्या सर्वतोपरी पाठीशी असू. तसेच मी या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावेन,” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३ मध्ये स्थापना केली. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे म्हणाल्या की, “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ याअभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाउंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेत आहोत.” या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव व कुस्तीगीर संघाचे खजिनदार संजय शेटे, राष्ट्रीय चॅम्पियन व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे, हिंद केसरी व सरचिटणीस पै. योगेश दोडके, उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच छत्रपती पुरस्कार विजेते श्री. विलास कथुरे, उपाध्यक्ष श्री. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री. मेघराज कटके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष श्री. तात्यासाहेब भिंताडे, तांत्रिक समितीचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय पंच श्री. दिनेश गुंड, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व अमरावती महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. संजय तिरथकर, उद्योगपती श्री. सागर कत्ते, वस्ताद श्री. भरत मेकाले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे इतर पदाधिकारी, विविध जिल्हा कुस्तीगीर संघांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नेते, आदी मान्यवर उपस्थित होते.
जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले- ना. चंद्रकांतदादा पाटील
पुणे- होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून, ती मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमधील ओलावा जपण्याचा सण आहे. आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक! राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सणाचा द्विगुणित आनंद सीआयएसएफ (CISF) च्या जवानांसोबत साजरा केला.
देशाच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या राज्यांतून आलेले हे जवान आज खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग बनले आहेत. घरापासून मैलोन् मैल दूर राहून दिलेली जबाबदारी चोख बजावणाऱ्या ‘वर्दी’तील भावांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरून आले, अशी भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
मध्य पूर्वेतील युद्ध संघर्ष आणि बदलती जागतिक ऊर्जा परिस्थिती या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रसारमाध्यमांना सद्यस्थितीत देशाच्या तयारीविषयी माहिती दिली.
जागतिक पातळीवर, भारत हा पेट्रोलियम उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा आयातदार, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पाचवा सर्वात मोठा निर्यातदार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या अल्पकालीन व्यत्ययांना तोंड देण्यासाठी देशाकडे कच्च्या तेलाचा तसेच पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ यांसह महत्त्वाच्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही वर्षात भारताने स्त्रोतांच्या वैविध्यकरणाद्वारे आपल्या लोकसंख्येसाठी ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरता, दोन्ही सुनिश्चित केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भारतीय ऊर्जा कंपन्यांना आता होर्मूझच्या सामुद्रधुनी मार्गे न येणारा ऊर्जा पुरवठाही उपलब्ध आहे. त्यामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यास ही पर्यायी जहाजे उपलब्ध होऊन पुरवठ्यात साहाय्यभूत ठरतील.
देशभरातील पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा आणि साठास्थिती, यावर अविरत देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सध्या, सरकार साठ्याच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधानी आहे. भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी सरकार सतर्क असून स्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी गरज भासल्यास टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाऊ शकतात.