पुणे, दि. १७ : पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मात्र, या संधींचा गैरफायदा घेत काही फसवणूक करणारे व्यक्ती व बनावट संस्था बेरोजगार युवक-युवतींना आयटी तसेच इतर नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, कामगार उप आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा यांनी सर्व बेरोजगार तरुण-तरुणींना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागार किंवा एजंट यांना कोणतीही आर्थिक रक्कम देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, कोणत्याही कंपनीत नोकरी स्वीकारण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत नोंदणी, अटी व शर्ती, वेतनाची खात्री करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या PF व ESIC यांसारख्या कायदेशीर सुविधांची खात्री करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
जर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून नोकरीच्या नावाखाली आर्थिक मागणी करण्यात आली, तर तात्काळ संबंधित शासकीय विभागांना माहिती द्यावी. नागरिकांनी सजग राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन निखील वाळके कामगार उप आयुक्त यांनी केले आहे.

