तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची घोषणा इराणनं केली असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिली. ट्रम्प यांनी ही माहिती त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर दिली. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्यानं जगाला दिलासा मिळाला आहे. युद्धाच्या ४९ व्या दिवशी इराणनं ही घोषणा केली आहेइराण-अमेरिका युद्धाच्या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याची घोषणा केली आहे. इस्रायल-लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर होर्मुझचा सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. इस्रायल-अमेरिकानं इराणवर २८ फेब्रुवारीला हवाई हल्ले केले. त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. तेव्हापासून इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली होती. त्यामुळे या मार्गानं होणारी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक विस्कळीत झाली.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. आम्ही सगळ्या व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ चा मार्ग खुला करत आहोत. शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी आम्ही होर्मुझ मार्ग खुला करत आहोत, असं अराघची यांनी जाहीर केलं. ‘लेबनॉनमधील शस्त्रसंधीनंतर होर्मुझचा मार्ग खुला करत आहोत. शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीपर्यंत होर्मुझचा मार्ग खुला राहील,’ असं इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलनं हवाई हल्ले सुरु केले. याच दिवशी इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली. आता युद्ध सुरु होऊन ४९ दिवस झाले आहेत. या कालावधीत खनिज तेलाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे महागाई वाढली. अनेक देशांसमोर ऊर्जा संकट निर्माण झालं. अखेर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगानं सुटकेचा निश्वास सोडला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. जगातील २० टक्के तेल व्यापार चालतो. याच मार्गानं आखाती देशांमधील तेलाची निर्यात होते. हा मार्ग इराणनं रोखून धरल्यानं तेल आयात करणाऱ्या देशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. तेल टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. ऊर्जा संकटामुळे अनेक देशांमध्ये आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली.

