Home Blog Page 681

एकाच शहरात, एकाच मेट्रोचे किती वेळा उद्घाटन करणार -आमदार रवींद्र धंगेकर

पुणे – शहर एकच मेट्रोही एकच त्याचे तुम्ही कितीवेळा उद्घाटन करणार? यामुळे सरकारी तिजोरीतील जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून उद्घाटनाचे घाट रचले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी केली.

जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ आणि स्वारगेट स्थानक ते कात्रज स्थानक टप्पा एक या विस्तारित भूमिगत मार्गीकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार होते. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. या पार्श्वभूमीवर, आमदार धंगेकर बोलत होते.

आमदार धंगेकर म्हणाले, एकाच शहरात मेट्रोचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन केले जात आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे इव्हेंट भाजप आयोजित करत आहे आणि त्यातून ते स्वतःची जाहिरातबाजी करीत आहेत. पण, यामुळे सरकारच्या तिजोरीतील सर्वसामान्यांचा पैसा खर्च होतोय. याआधी पंतप्रधानांनी ऑनलाईन माध्यमातून उद्घाटने केली आहेत. तसेच याही वेळेस त्यांना ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करता आले असते. पण तसे करण्यातबाले नाही. कारण भाजपच्या डोक्यात केवळ निवडणुका आहेत.

पंतप्रधान येणार म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून तयारी करण्यात आली होती. अखेरच्या क्षणाला त्यांचा दौरा रद्द झाला. पण सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. याला जबाबदार कोण? पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्याची नामुष्की कोणामुळे ओढावली? याची उत्तरेही जनतेसमोर आली पाहिजेत, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.


काँग्रेसने ‘असे’ कधीही केले नाही!

या देशात मेट्रो आणण्याचे पहिले ऐतिहासिक पाऊल काँग्रेसने उचलले. दूरदृष्टी ठेवून डीपीआर आणला. हे देशातील जनतेला माहिती आहे. पण, याची जाहिरातबाजी काँग्रेसने कधीही केली नाही. जनतेचा पैसा जपून, काळजीपूर्वक वापरण्याचे काम काँग्रेसने केले. पण सध्याच्या सरकारमध्ये तसे होताना दिसत नाही, अशी खंत आमदार धंगेकर यांनी व्यक्त केली.

जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होवू शकला नाही. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिकाच्या हस्ते हा शुभारंभ करायला हवा होता. पण, सत्ताधाऱ्यांनी तसे केले नाही.

रवींद्र धंगेकर,आमदार

पंतप्रधान मोदी यांचा राजकीय दौरा रद्द झाला,पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – मेट्रो उदघाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन भाजपचा प्रचार करणार होते. पण, पावसाने व्यत्यय आणला आणि हा दौरा रद्द झाला, त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) व्यक्त केली.

मेट्रोच्या स्वारगेट येथील अर्धवट कामाची पहाणी मोहन जोशी यांनी केली. या अर्धवट प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान मोदी करणार होते आणि त्यातून पुणेकरांची दिशाभूल केली जाणार होती. हा दौरा वादग्रस्त ठरून आपल्या अंगलट येईल, याची जाणीव मोदी आणि त्यांच्या पक्षाला झाली असावी, त्यातूनच त्यांनी हा दौरा रद्द केला. मेट्रोच्या ३२ किलोमीटर मार्गावरील वेगवेळ्या टप्प्यांचे भूमिपूजन आणि उदघाटन यासाठी पंतप्रधान मोदी आधी ५ वेळा येऊन गेले याच प्रकल्पातील एका टप्प्याच्या उदघाटनासाठी ते आज सहाव्यांदा येथे येणार होते. त्यातून वाद निर्माण झाला असता. सध्या महाराष्ट्रात भाजपसाठी प्रतिकूल वातावरण आहे. त्यात पुन्हा नव्याने काही वाद निर्माण होणे म्हणजे प्रकरण अंगलट येण्यासारखेच होते. म्हणून त्यांनी दौरा टाळला, असे मोहन जोशी म्हणाले.

पंतप्रधान मोदींची सभा स.प.महाविद्यालयाच्या पटांगणावरती होणार होती. ही सभा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच एक भाग होता. या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद करण्यात येणार होती. पाऊस आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी मोदींचा पुणे दौरा हा त्या त्रासात भर घालणारा होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

पुणे, दि. २६: राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर देण्यासाठी सन २००८ पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत आहे. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) १ लाख ३२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागात प्रति घरकुल २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. राज्य शासनाने सन २०२४-२५ या वर्षात या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रासाठी ७५, नगरपरिषद क्षेत्रासाठी ९३, नगरपंचायत क्षेत्रासाठी १४ व ग्रामीण क्षेत्रासाठी ६९७ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात तर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

औंध आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २६: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवार, एमसीव्हीसी बायफोकल उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु, शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर १२ वी, पदविकाधारक, पदवीधारक व पदव्युत्तर अशा नोकरी इच्छुक उमेदवारांनी क्यूआर कोड स्कॅन करुन नोंदणी करावी आणि मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गडदरे तसेच औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि २६ : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्याकरीता २० ते ४० वयोगटातील  ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

‘राष्ट्रीय पोषण माह’ राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0

मुंबई, दि. २५ : केंद्र सरकारने प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी’ या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण आहार आणि शिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील  विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पोषण भी, पढाई भी’ या  राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.  या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, ‘एनआयपीसीडी’चे उपसंचालक रिटा पटनाईक, सहव्यवस्थापक सिद्धांत सचदेवा तसेच  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी सुरुवातीच्या काळात मिळेल त्या जागेवर अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या  यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान  राहिले आहे.

आई – वडिलांच्या बरोबरीनेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांवर संस्कार करत असतात. महिला व बालकांना उत्तम शिक्षण आणि पोषण देण्याचे काम महिला व बालविकास विभाग करत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सेविका, मदतनीस यांनी महत्त्वाची सेवा बजावली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य  शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर म्हणाल्या, पोषण अभियान हा  देशातील 6 वर्षांखालील लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठीचा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पोषण माह 2024 अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत 7 कोटी 93 लाख विविध उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करून एकत्रित प्रयत्नांतून कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण अभियानाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे.

पोषण भी, पढाई भी या माध्यमातून ‘स्वस्थ भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात  गर्भवती आणि स्तनदा माता, सहा वर्षांखालील लहान मुले आणि किशोरवयीन मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून  पोषणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.असेही केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

आयुक्त कैलास पगारे म्हणाले, महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. यासंबंधी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून ‘पोषण माह’ साजरा करण्यात येत आहे.

हा 7 वा राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.

दरम्यान बालमंथन या मासिकाचे आणि नवचैतन्य या अभ्यासक्रमाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विकास प्रक्रियेत होणारे बदल चांगल्याप्रकारे रूजविण्याची गरज – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0

जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना केले प्रतिपादन

 कोल्हापूर, : समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे केले. ते म्हणाले, कोणत्याही विकास कामांचे नियोजन चांगल्याप्रकारेच केले जाते. उदा. रस्ते करताना, उद्योग उभारताना, योजनांची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक काम बदल म्हणून केले जाते. ते काम चांगल्या प्रकारे व्हावे, ते बदल लोकांना स्विकारहार्य असावेत. असे बदल प्रशासनाकडून चांगल्याप्रकारे पेरण्याची गरज आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. राज्यपाल यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेवून चर्चा केली. यावेळी त्यांनी सुरूवातीला जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,  अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी टी शिर्के उपस्थित होते.

राज्यपाल महोदयांच्या आगमनावेळी पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली तसेच राष्ट्रगीत वादन करण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा सुरूवातीला घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील शिष्ट मंडळांशी त्या त्या गटनिहाय चर्चा केली. यावेळी उपस्थित शिष्ट मंडळातील सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासासाठी आवश्यक कामांबाबतची चर्चा केली व निवेदने सादर केली. यात जिल्ह्यातील उद्योग वाढ, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य सेवा, खंडपीठ, औद्योगिक विकास, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतीसाठी पाणी, पर्यावरण संरक्षण, पूरावर कायमस्वरूपी तोडगा, गुळाचा वापर शालेय स्तरावर मध्यान्ह भोजनात करणे, आरक्षण आदी विषयावर मागण्या करण्यात आल्या तसेच त्यावर चर्चा झाली.

यावेळी हद्दवाढीवर बोलताना ते म्हणाले, शहरांची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही. हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतू ती कायमस्वरूपी थांबविता येत नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानूसार ते पुर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या आसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मुलांसाठी गुळाचा वापर मध्यान्ह भोजनात साखरे ऐवजी करावा याबात सुचविलेल्या मुद्दयांवर याबाबत अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले. रोजगारक्षम ग्राम संकल्पना, कौशल्य विकासावर भर अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित शिष्ट मंडळांतील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांनी आजपर्यंत पहिल्यांदाच राज्यपालांनी प्रत्यक्ष जिल्हयात येवून संवाद साधल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यावेळी राज्यपाल महोदयांनी स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगार भवनाची पायाभरणी

पुणे, दि.२६ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची पायाभरणी करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कामगार उप आयुक्त अभय गिते आदी उपस्थित होते.


कामगार भवन बाबत
सद्यस्थितीत उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त पुणे विभागातील अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, पुणे, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, पुणे, बाष्पके संचलनालय, पुणे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पुणे, घरेलू कामगार मंडळ, पुणे व सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे ही कार्यालये पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

ही महामंडळ, विविध विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालये पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाच प्रशस्त व दर्जेदार प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत व्हावीत यासाठी पुणे शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बंगला क्र. 5, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर येथे हे कामगार भवन उभारण्यास मान्यता मिळाली आहे. याचा लाभ कामगार, त्यांचे प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी, विविध संघटना, विधीज्ञ तसेच कामगार विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणारा सर्वसामान्य कामगार, महिला व नागरिक यांना मिळणार असल्याची माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी या अनुषंगाने दिली.

अंधारलेल्या वाटा प्रकाशमान करण्याचे भाग्य महत्वाचे – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

  •  उत्कृष्ट २५ अभियंत्यांचा सन्मान

पुणे – महावितरणमध्ये अभियंता म्हणून अंधारलेल्या वाटा, घरे प्रकाशाने उजळून टाकण्याचे भाग्य मिळाले आहे. त्यामुळे शासकीय कर्तव्य बजावताना सामाजिक सेवेचा एक वेगळा आनंद आहे. समाधान आहे. दैनंदिन कामात हा आनंद कायम राहील अशी तत्पर व ग्राहकांना समाधान देणारी सेवा द्या असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदीप’ सभागृहात मंगळवारी (दि. २४) आयोजित राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील उत्कृष्ट २५ अभियंत्यांचा सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रातील महावितरणमध्ये विद्त अभियांत्रिकीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच बळावर डोंगरदऱ्या, अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून सुमारे ३ कोटी ग्राहकांशी महावितरणने प्रकाशाचे नाते जोडले आहे. हे नाते ग्राहकसेवेतून भक्कम व अतूट राहावे यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने अभियंता म्हणून कार्यरत राहा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये, सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता– विष्णू पवार, नीलेश रोहणकर, कल्याण गिरी, उमेश चव्हाण, स्नेहलता हंचाटे, दीपक भोसले. उपकार्यकारी अभियंता– नीलेश रासकर, सुप्रिया वस्त्रद, अर्णव लिडबिडे, अनुपमा कुद्रे, वैशाली पगारे. सहायक अभियंता– ज्ञानेश्वर धंपलवार, प्राजक्ता रोडे, मनीषा कुदळे, अक्षय पवार, स्वप्निल काटकर, महेश देशमुख, दिनेश बडशे, शैलेश कुलकर्णी, आकांक्षा वाचकवडे, स्वप्ना देव, अनघा कुलकर्णी, सचिन वीर, तेजश्री ठाकूर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अभियंता व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे पुण्यात आयोजन

  • दि.१ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे पुण्यात दि.१ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च ,खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव,पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम  होणार आहेत.गांधी सप्ताह आयोजनाचे हे १३ वे वर्ष आहे. गांधी सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विश्वस्त अन्वर राजन, जांबुवंत मनोहर, सचिन पांडूळे, एड. स्वप्नील तोंडे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
दि.१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते,माजी संरक्षण मंत्री  शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सुरेश द्वाद‌शीवार यांच्या ‘गांधी आणि त्याचे टिकाकार’ या पुस्तकाच्या Gandhi And His Critics या इंग्रजी अनुवादाचे  प्रकाशन होईल.विवेक गोविलकर यांनी हा अनुवाद केला आहे.शरद पवार यांच्या हस्ते ‘सलोखा’  गटाचे प्रमोद मजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.कुमार सप्तर्षी असतील.  

 दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ११ ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी साडेनऊ  वाजता गोखले चौक(गुडलक हॉटेल) ते  गांधी पुतळा गांधी भवन  या मार्गावर ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.

दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.
दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर  यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी  ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११  वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे  यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने  ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि  बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील. 
*खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव*
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७  ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. 

एअर इंडियाने A350 सह जागतिक प्रवासाचा अनुभव उंचावला, प्रीमियम हवाई प्रवासाचे एक नवीन पर्व

0

राष्ट्रीय – एअर इंडियाने अलीकडेच अत्याधुनिक एअरबस A350 सादर करत दिल्ली-लंडन मार्गावर आपली सेवा वाढविली आहे. त्यानंतर, अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत या विमानसेवेचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. Vihaan.Ai उपक्रमांतर्गत एअरलाइनच्या सध्या सुरू असलेल्या परिवर्तनातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यात लांब पल्ल्याच्या सर्व मार्गांवर प्रवाशांना चांगला अनुभव देण्याचा समावेश आहे.

एअर इंडियाच्या महत्त्वाच्या A350 मध्ये नवीन तीन-श्रेणी व्यवस्थेचा समावेश आहे. बिझनेस क्लासमध्ये पूर्ण-फ्लॅट बेडसह 28 खासगी सूट, अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुधारणांसह प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये 24 जागा आणि इकॉनॉमीमध्ये 264 जागा अत्याधुनिक आहेत.

A350 मधील सर्व सीट्सवर नवीन-जनरेशन Panasonic eX3 इन-फ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि HD स्क्रीन आहे, जी 100+ तासांसाठी विशिष्ट श्रेणीसह 13 आंतरराष्ट्रीय आणि 8 भारतीय प्रादेशिक भाषांमधील जगभरातील 3000 तासांहून अधिक काळ पुरतील, अशी मनोरंजक साधने मुलांसाठी देतात. लवकरच त्याला ऑन बोर्ड वाय-फायचे*ही पाठबळ मिळेल.

बिझनेस आणि प्रीमियम इकॉनॉमीमधील पाहुणे फेरागामो व TUMI द्वारे खास डिझाइन केलेल्या अद्ययावत सुविधा किट, तसेच एअर इंडियाचे नवीन सॉफ्ट उत्पादन – Vista Verve – नवीन चायनावेअर, टेबलवेअर, काचेच्या वस्तू आणि बेडिंगचाही आनंद घेतील.

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या मेन्यूसह, अतिथींना उत्तम चवीचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जेवणाचा अनुभव मिळेल. भारत-प्रेरित डिझाइन्ससह चायनावेअरच्या उत्कृष्ट कलेक्शनमध्ये रुचकर पाककृती दिली जाईल.

आपल्या लीगेसी फ्लीटमध्ये सुधारणा करण्यासाठी, एअर इंडियाने त्याच्या A320neo पासून रिफिट प्रोग्राम सुरू केला आहे, जो आधुनिक तीन-केबिन कॉन्फिगरेशनमध्ये बदलला जाईल. रिफिटमध्ये 8 आलिशान बिझनेस क्लास सीट्स, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 24 एक्स्ट्रा-लेग्रूम सीट्स व A320neo वर 132 आरामदायी इकॉनॉमी क्लास सीट्स देण्यात येणार आहेत.

नव्याने आणण्यात आलेल्या या वैशिष्ट्यांमध्ये नवीन सीट, कार्पेट्स, पडदे आणि सूक्ष्म केबिन लायटिंग, प्रशस्त लेगरूम, वाढीव सीट पिच, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरण (PED)धारक आणि यूएसबी पोर्ट यांचा समावेश असेल. एअर इंडिया सध्या नवी दिल्ली, मुंबई, दुबई, लंडन, न्यू यॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोसह प्रमुख आंतरराष्ट्रीय हबमध्ये खास लाउंजसह प्रवासाचा उत्तम अनुभव देत आहेत. हे प्रीमियम लाउंज पाहुण्यांना आराम आणि आलिशानतेचा अत्यंत सुंदर अनुभव देईल. यामुळे प्रवाशांचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जागतिक दर्जाचा प्रवास सुनिश्चित होईल.

पश्चिम महाराष्ट्रात ४१६ कोटींच्या वीजबिलांची थकबाकी; वीजबिल भरा सहकार्य करा- महावितरण

0
  • वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरू राहणार

पुणे – विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १९ लाख १९ हजार २३१ ग्राहकांकडे ४१६ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत घरगुती १७ लाख २८७ ग्राहकांकडे २९४ कोटी १६ लाख, व्यावसायिक १ लाख ९३ हजार ७६७ ग्राहकांकडे ८८ कोटी २९ लाख आणि औद्योगिक २५ हजार १७७ ग्राहकांकडे ३४ कोटी ३६ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख ३३ हजार ९२३ ग्राहकांकडे २६१ कोटी ४९ लाख, सातारा जिल्ह्यात २ लाख २८ हजार ग्राहकांकडे ३२ कोटी ४१ लाख, सोलापूर जिल्ह्यात २ लाख ९२ हजार ६७० ग्राहकांकडे ६० कोटी ६३ लाख, सांगली जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३८३ ग्राहकांकडे ३२ कोटी ५८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ३८ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर होत आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा आर्थिक अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे कळकळीचे आवाहन आले आहे. 

क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला समर्थ गौरव पुरस्कार जाहीर

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
  • समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा 

पुणे : समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी इन्स्टिट्यूटचे  डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल ललित राय (निवृत्त) हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. बुधवार, दिनांक २ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल चितळे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, डॉ. अ.ल.देशमुख, हनुमंत बहिरट, यांसह पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रख्यात उयोजक पुनीत बालन हे आहेत. रुपये ११ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील होणार आहे.
संजय सातपुते म्हणाले,  देशसेवेसाठी कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा जागविण्यासाठी काम  क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट करीत आहे/ कर्नल बल्लेवार हे संस्थेचे डीन आहेत. यामाध्यमातून सैनिकांसाठी व समाजासाठी संस्था मोठे कार्य सातत्याने करीत आहे. 
दिनांक २ आॅक्टोबर १९९९ रोजी समर्थ प्रतिष्ठान ची स्थापना झाली. संजय सातपुते हे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. यापूर्वी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई, मेळघाट येथील उमंग संस्थेचे ऋषिकेश खिलारे, बाबा आमटे विकास संस्थेचे अनंत झेंडे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कैलास कोद्रे, तुकाराम गुजर यांना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही होणार विशेष सन्मान
  • पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे : सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे सन २०२२-२३ वर्षासाठी पुणे कँन्टोमेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे आणि सन २०२३-२४ वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, सुनिल रुकारी, निलेश ढमढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार आहे. तसेच मोहोळ यांच्या हस्ते बँकांचा सन्मान केला जाणार आहे. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षात ज्या बँकांनी शून्य टक्के एन.पी.ए. राखला, त्या बँकांचा गौरव करण्यात येणार आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला, त्या बँकांना देखील सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत. तर, रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह. प्रबंधन संस्थानच्या निदेशक डॉ.हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अ‍ॅड.साहेबराव टकले म्हणाले, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) गेली ४५ वर्षे सातत्याने बँकिंग क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, प्रसार व प्रसिद्धीचे काम करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करीत, तीव्र स्पर्धेतही सहकारी बँका केवळ टिकून आहेत असे नाही, तर प्रगतीही करीत आहेत. त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणा-या बँकांना असोसिएशनतर्फे गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शन’ शनिवार २८ पासून

  • महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे आयोजन ; दोन दिवसीय प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे : महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे राज्यातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी  ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर रोजी जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये पुण्यासह संगमनेर, धाराशिव, धुळे, नगर, लोणावळा या ठिकाणाहून महिला उद्योजिका प्रदर्शनास सहभागी झाल्या असून विविध प्रकारचे ७५ स्टॉल्स आहेत, अशी माहिती आयोजिका अभिलाषा बेलुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला योगिता सिंघ, अपूर्वा पाटकर, दिशा जोशी, नम्रता जाधव टीकारे आदी उपस्थित होते. 
दोन दिवसीय प्रदर्शन दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे. या दरम्यान मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पधेर्चे देखील आयोजन करण्यात आले आहे. नऊवारी ठसका, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, दोन दिवसीय विनामूल्य गरबा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात नवरात्र आणि दिवाळीसाठी लागणारे कपडे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य लहान मुलांची खेळणी अशा अनेक गोष्टी पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.
‘लाडका ग्राहक योजना’ या अंतर्गत रुपये ५० हजारापेक्षा अधिक खरेदी करतील, त्यांना हिरा गिफ्ट म्हणून मिळणार आहे. तसेच रुपये १५ हजारापेक्षा अधिक खरेदी करतील त्यांना कुबेर की भेट म्हणून देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.