- वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरू राहणार
पुणे – विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १९ लाख १९ हजार २३१ ग्राहकांकडे ४१६ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत घरगुती १७ लाख २८७ ग्राहकांकडे २९४ कोटी १६ लाख, व्यावसायिक १ लाख ९३ हजार ७६७ ग्राहकांकडे ८८ कोटी २९ लाख आणि औद्योगिक २५ हजार १७७ ग्राहकांकडे ३४ कोटी ३६ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख ३३ हजार ९२३ ग्राहकांकडे २६१ कोटी ४९ लाख, सातारा जिल्ह्यात २ लाख २८ हजार ग्राहकांकडे ३२ कोटी ४१ लाख, सोलापूर जिल्ह्यात २ लाख ९२ हजार ६७० ग्राहकांकडे ६० कोटी ६३ लाख, सांगली जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३८३ ग्राहकांकडे ३२ कोटी ५८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ३८ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर होत आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा आर्थिक अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे कळकळीचे आवाहन आले आहे.