- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
- समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा
पुणे : समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी इन्स्टिट्यूटचे डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल ललित राय (निवृत्त) हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. बुधवार, दिनांक २ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल चितळे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल, अॅड. प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, डॉ. अ.ल.देशमुख, हनुमंत बहिरट, यांसह पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रख्यात उयोजक पुनीत बालन हे आहेत. रुपये ११ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील होणार आहे.
संजय सातपुते म्हणाले, देशसेवेसाठी कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा जागविण्यासाठी काम क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट करीत आहे/ कर्नल बल्लेवार हे संस्थेचे डीन आहेत. यामाध्यमातून सैनिकांसाठी व समाजासाठी संस्था मोठे कार्य सातत्याने करीत आहे.
दिनांक २ आॅक्टोबर १९९९ रोजी समर्थ प्रतिष्ठान ची स्थापना झाली. संजय सातपुते हे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. यापूर्वी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई, मेळघाट येथील उमंग संस्थेचे ऋषिकेश खिलारे, बाबा आमटे विकास संस्थेचे अनंत झेंडे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.