- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही होणार विशेष सन्मान
- पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे सन २०२२-२३ वर्षासाठी पुणे कँन्टोमेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे आणि सन २०२३-२४ वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अॅड.साहेबराव टकले, सुनिल रुकारी, निलेश ढमढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार आहे. तसेच मोहोळ यांच्या हस्ते बँकांचा सन्मान केला जाणार आहे. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षात ज्या बँकांनी शून्य टक्के एन.पी.ए. राखला, त्या बँकांचा गौरव करण्यात येणार आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला, त्या बँकांना देखील सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत. तर, रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह. प्रबंधन संस्थानच्या निदेशक डॉ.हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अॅड.साहेबराव टकले म्हणाले, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) गेली ४५ वर्षे सातत्याने बँकिंग क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, प्रसार व प्रसिद्धीचे काम करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करीत, तीव्र स्पर्धेतही सहकारी बँका केवळ टिकून आहेत असे नाही, तर प्रगतीही करीत आहेत. त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणा-या बँकांना असोसिएशनतर्फे गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.