सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे:
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी परिसरातील समृद्धी लेक सोसायटीची सीमाभिंत रविवारी (ता. ५) पहाटे अचानक कोसळली. ही भिंत थेट पार्किंग शेडवर कोसळल्याने नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशामक केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीमाभिंतीचा ढिगारा आणि लोखंडी पार्किंग शेडखाली वाहने अडकली होती. कामगाराच्या मदतीने ग्राईंडर आणि कटरचा वापर करून लोखंडी गज आणि पत्रे कापण्यात आली. त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्यात आली.
या मदतकार्यात अग्निनामक दलाचे अधिकारी संतोष भिलारे यांच्यासह जवान राकेश बरे, मयूर काटे, प्रशांत कुंभार, संभाजी
आटोळे, अक्षय देवकर, शेख, आदिनाथ पवार, सुनील दिवाडकर यांनी सहभाग घेतला. अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पुण्यात ३० ठिकाणी झाडे कोसळली
संततधार पावसामुळे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत शहरातील ३० ठिकाणी झाडे कोसळल्याच्या तक्रारी अग्निशामक दलाकडे प्राप्त झाल्या. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला, तर वाहनांचेही नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कसबा पेठेतील गावकोस मारुती मंदिर रस्ता येथे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राजवळ रविवारी दुपारी झाड कोसळले. झाडाची मोठी फांदी एका मोटारीवर आणि रिक्षावर पडल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या आणि खोड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या धोकादायक झाडांबाबत सतर्कता बाळगावी. मोठ्या झाडांखाली वाहन उभी करू नयेत आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

