- उत्कृष्ट २५ अभियंत्यांचा सन्मान
पुणे – महावितरणमध्ये अभियंता म्हणून अंधारलेल्या वाटा, घरे प्रकाशाने उजळून टाकण्याचे भाग्य मिळाले आहे. त्यामुळे शासकीय कर्तव्य बजावताना सामाजिक सेवेचा एक वेगळा आनंद आहे. समाधान आहे. दैनंदिन कामात हा आनंद कायम राहील अशी तत्पर व ग्राहकांना समाधान देणारी सेवा द्या असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदीप’ सभागृहात मंगळवारी (दि. २४) आयोजित राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील उत्कृष्ट २५ अभियंत्यांचा सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रातील महावितरणमध्ये विद्त अभियांत्रिकीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच बळावर डोंगरदऱ्या, अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून सुमारे ३ कोटी ग्राहकांशी महावितरणने प्रकाशाचे नाते जोडले आहे. हे नाते ग्राहकसेवेतून भक्कम व अतूट राहावे यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने अभियंता म्हणून कार्यरत राहा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये, सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता– विष्णू पवार, नीलेश रोहणकर, कल्याण गिरी, उमेश चव्हाण, स्नेहलता हंचाटे, दीपक भोसले. उपकार्यकारी अभियंता– नीलेश रासकर, सुप्रिया वस्त्रद, अर्णव लिडबिडे, अनुपमा कुद्रे, वैशाली पगारे. सहायक अभियंता– ज्ञानेश्वर धंपलवार, प्राजक्ता रोडे, मनीषा कुदळे, अक्षय पवार, स्वप्निल काटकर, महेश देशमुख, दिनेश बडशे, शैलेश कुलकर्णी, आकांक्षा वाचकवडे, स्वप्ना देव, अनघा कुलकर्णी, सचिन वीर, तेजश्री ठाकूर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अभियंता व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.