- दि.१ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे पुण्यात दि.१ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च ,खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव,पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.गांधी सप्ताह आयोजनाचे हे १३ वे वर्ष आहे. गांधी सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विश्वस्त अन्वर राजन, जांबुवंत मनोहर, सचिन पांडूळे, एड. स्वप्नील तोंडे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
दि.१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते,माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधी आणि त्याचे टिकाकार’ या पुस्तकाच्या Gandhi And His Critics या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन होईल.विवेक गोविलकर यांनी हा अनुवाद केला आहे.शरद पवार यांच्या हस्ते ‘सलोखा’ गटाचे प्रमोद मजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.कुमार सप्तर्षी असतील.
दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ११ ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता गोखले चौक(गुडलक हॉटेल) ते गांधी पुतळा गांधी भवन या मार्गावर ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.
दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.
दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
*खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव*
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत.