मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात पूर आणि दरडींचे संकट; पीएमआरडीएची विविध ठिकाणी बचावमोहीम

Date:

चाकणमध्ये पाण्यात अडकलेल्या २० ते २५ जणांची सुटका; मळवली, पवना परिसरात दरड कोसळल्याने शोधकार्य सुरू

पुणे, दि. ६ जुलै २०२६ : पुणे महानगर प्रदेश आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अग्निशमन विभाग आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक अर्थात ‘पीडीआरएफ’ युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करीत आहे.

चाकण एमआयडीसी परिसरातील चिंबळी फाटा येथील एका कंपनीमध्ये रविवारी सकाळी पाणी शिरल्याने सुमारे २० ते २५ जण अडकले होते. वाघोली अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्थानकाजवळील पाटण-बोरज रस्त्यावर पहाटे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. पीएमआरडीएच्या अहवालानुसार, दुर्घटनास्थळी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावमोहीम सुरू करण्यात आली आहे. मळवली परिसरात २५ ते ३० नागरिक अडकल्याची माहिती पीएमआरडीएच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी रवाना झाले.

पवना धरण परिसरातील आपटी गावातही दरड कोसळल्याने २५ ते ३० नागरिक अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ठिकाणी पीएमआरडीएचे बचाव पथक दाखल झाले असून, शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

लोणावळा येथील वेदांत कॉलेज परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने काही विद्यार्थी अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पीएमआरडीएला देण्यात आली. त्यानंतर मदत पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.

घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाण्यामध्ये एक बस अडकल्याची आणि बसमध्ये प्रवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. मारुंजी अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील कासारसाई येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मदत करण्यात आली. मंत्रा २४ वेस्ट सोसायटीच्या तळघरात तसेच जांभे येथील एका घराच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानंतर अग्निशमन दलाने आवश्यक मदत पुरवली.

आळंदीजवळील धानोरे गावात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळले होते. वाघोली अग्निशमन केंद्राच्या जवानांनी हे झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, धायरी येथील लक्ष्मी पार्क सोसायटीतील एका सदनिकेच्या बेडरूममध्ये अडकलेल्या ११ आणि चार वर्षांच्या दोन मुलींची नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी मध्यरात्री सुखरूप सुटका केली.

तत्पूर्वी, नांदेड सिटी येथील मंगल भैरव सोसायटीमधील एका सदनिकेत सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅसगळती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून गॅसगळती बंद केली. संबंधित सिलेंडर सुरक्षितरीत्या गॅस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आला.

पीएमआरडीए प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके पूर्णपणे सतर्क असून, पूरग्रस्त आणि दरडप्रवण भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपली सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कृपया सतर्क राहा आणि सुरक्षित राहा,” असे पीएमआरडीए प्रशासनाने म्हटले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक

पीएमआरडीए आपत्कालीन मदत क्रमांक : ९५४५२८२९३०
नांदेड सिटी अग्निशमन केंद्र : ०२०-६७५२०००१ / ०२०-६७५२०००२
मारुंजी अग्निशमन केंद्र : ०२०-६७९९२१०० / ०२०-६७९९२१०१
वाघोली अग्निशमन केंद्र : ०२०-२९५१८१०१ / ०२०-२९५१९१०१

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसामुळे कसबा पेठेत तालीमची भिंत कोसळली; राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर

झांबरे वाडा परिसरात पुणे महापालिकेची तातडीची कारवाई; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी...

आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय पुणे-आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने...

आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 वेगाने वारे वाहणार, घराबाहेर पडणे टाळावे, CM देवेंद्र फडणीस यांचे आवाहन

मुंबई-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज...