पुणे | प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील आळंदीला बसला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूरस्थिती गंभीर होताच नगरपरिषदेच्या आपत्कालीन विभागाने तत्काळ बचावकार्य हाती घेत विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे 250 वारकऱ्यांची सुरक्षित सुटका केली. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
बंद करण्यात आलेले प्रमुख पूल
- पीएमपीएल बसस्थानकाजवळील जुना पूल
- चाकण चौक–देहू फाटा मार्गावरील पूल
- सिद्धबेट परिसरातील पूल
- पीएमपीएल बसस्थानकाजवळील नवीन पूल
दुपारपर्यंत तीन पुलांवरून पाणी वाहत होते. त्यानंतर चौथ्या पुलालाही पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने तोही बंद करण्यात आला. त्यामुळे आळंदीकडे येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
घाट, मंदिर परिसर आणि दुकाने जलमय
महापुरामुळे भक्त पुंडलिक मंदिर, घाट परिसर, नदीकाठावरील दुकाने, हरी हरेंद्र मठ, देविदास धर्मशाळा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिर परिसर, भराव रस्ता आणि सिद्धबेट परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
आषाढी वारीसाठी घाटावर उभारण्यात आलेले चेंजिंग रूमचे मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेले असून तात्पुरती स्वच्छतागृहेही पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठावरील व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.
पालखी प्रस्थानापूर्वी प्रशासनाची मोठी कसोटी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने आळंदीत लाखो वारकरी दाखल झाले आहेत. मात्र पूरस्थितीमुळे पालखी व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
घाट परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. नदीकाठावर कोणालाही जाण्याची परवानगी नसून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नदीकाठापासून दूर राहा – प्रशासनाचे आवाहन
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिक, भाविक आणि वारकऱ्यांना नदीपात्र, घाट परिसर किंवा बंद करण्यात आलेल्या पुलांवर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
मावळ तालुका, लोणावळा परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीवर होत असून नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे. त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून संपूर्ण आळंदी शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. #आषाढीवारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

