आदर्श नगरातील २५ ते ३० कुटुंबांना डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेत हलविले; पुणे महापालिकेचे बचावकार्य युद्धपातळीवर
पुणे, दि. ६ जुलै २०२६ : मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बोपोडी येथील आदर्श नगर वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले.
महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सुमारे २५ ते ३० कुटुंबांतील अंदाजे १०० ते १२५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. स्थलांतरित नागरिकांची व्यवस्था बोपोडी येथील डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेत करण्यात आली आहे.
स्थलांतरित नागरिकांना आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी सातत्याने कार्यरत आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी आणि परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
पावसाचा जोर आणि नदीपात्रातील वाढते पाणी लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक परिसरात जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत पुणे महापालिकेच्या PMC CARE सेवेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

