Home Blog Page 680

सचिन तेंडुलकर फाउंडेशनचा पाच वर्षांचा परिवर्तनशील प्रभाव

मुंबई: वंचित आणि गरजू लोकांना विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करून त्यांना पुढाकार घेण्यास सक्षम बनवण्यासाठी समर्पित कार्याचा पाच वर्षांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने (STF) 22 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील द बॉम्बे क्लब येथे एक स्नेहसोहळा आयोजित केला. मित्र, कुटुंबीय, शुभचिंतक आणि ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या सहयोगींकडून मिळालेल्या कौतुक आणि प्रोत्साहनाने सजलेल्या या कार्यक्रमात STF ने मुलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा यांसारख्या मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी चांगले जीवनमान सुनिश्चित करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा पुष्टी केली.

या कार्यक्रमाची संकल्पना होती “शाइन ब्राइटर टुगेदर.” खेळ, आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रामुख्याने मुलांचे जीवन समृद्ध करण्याच्या फाउंडेशनच्या मुख्य कल्पनेवर यातून प्रकाश टाकण्यात आला.

सारा तेंडुलकर यांनी अलीकडेच फाउंडेशनच्या संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा हा पहिलाच अधिकृत कार्यक्रम होता. आपल्या आई-वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर इतक्या लहान वयात पाऊल ठेवून सारा तरुणाईशी जोडणारी नवी दृष्टी घेऊन येत असून त्यांना त्यांची स्वप्नं, आकांक्षा पूर्ण करून भरारी घेण्यासाठी मदत करत आहे.

लोकांचे जीवन अधिक सुकर करणे आणि फाउंडेशनच्या उपक्रमांद्वारे त्यांच्या आयुष्यात परिवर्तनीय सकारात्मक प्रभाव पाडणे याबाबत बोलताना सारा तेंडुलकर म्हणाल्या, “लहानपणापासून नेहमीच मला माझ्या कुटुंबापासून प्रेरणा मिळत आली आहे. त्यांनी कायम मला देण्याच्या, दातृत्वाच्या सामर्थ्याचे महत्त्व समजावून दिले आहे. मला फाउंडेशनच्या कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि केवळ मुलांच्याच नव्हे तर संपूर्ण कुटुंबांच्या जीवनात आशेची ज्योत कशी प्रज्वलित होते हे पाहायला मिळाले. गेल्या पाच वर्षांत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने एक लाखाहून अधिक मुलांचे जीवन बदलले आहे. पुढे वाटचाल करण्यासाठी आम्हाला अशी लाखो कारणे मिळाली आहेत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि हा प्रवास शक्य करण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहणाऱ्या प्रत्येकाची मी अत्यंत ऋणी आहे.”

“संचालक म्हणून, मी माझ्या पालकांनी सुरू केलेल्या कार्यावर पुढे काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रत्येक छोट्या स्वप्नाला ओळख मिळावी आणि ते स्वप्न पूर्ण व्हावे याची मी काळजी घेईन. उद्याचे उज्ज्वल भविष्य असलेल्या मुलांसाठी शक्यतांचे नवे जग, नवी आशा निर्माण करणाऱ्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास मी उत्सुक आहे.”

कार्यक्रमात दाखवलेल्या लघुपटाने उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्याची झलक दाखवली. स्वप्नं पाहणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सक्षम बनविण्यात धोरणात्मक भागीदारीद्वारे तेंडुलकर कुटुंब आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन (STF) यांची समर्पित वृत्ती किती मोलाची ठरली हे यातून उपस्थितांना जाणवले. STF सोबत काम करणाऱ्या 15 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची प्रशंसा आणि गौरवही यावेळी करण्यात आला.

कोल्डप्लेचे क्रिस मार्टिनही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत व्यासपीठावर संवाद साधला. फाउंडेशनच्या प्रवासाबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, “मी जेव्हा शेवटच्या वेळेस पॅव्हेलियनमध्ये परतलो, तेव्हा माझ्या मनात एक भावना होती की माझी इनिंग संपलेली नाही. अंजली आणि मी असे काही करण्याचे स्वप्न पाहिले जे वंचितांसाठी जीवन सुसह्य करेल आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि उंच भरारी घेण्यास मदत करेल. या कल्पनेची सुरुवात करणे सोपे होते, पण त्याची अंमलबजावणी कठीण होती. अखेरीस STF अस्तित्वात आले आणि आता आम्ही पाच वर्षांचा टप्पा पार केला आहे. प्रवास जोरात सुरू आहे आणि आता सारा नेतृत्व करत असल्याने, STF लाखो स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी आणि नवी भरारी घेण्यासाठी पुढे जाईल याचा मला विश्वास आहे.”

लोकांशी सहजपणे जोडून घेणे आणि त्यांच्या क्षमतांचा विस्तार करून त्यांच्या आकांक्षापूर्ती  साठी त्यांना मदत करणे या साध्या सरळ दृष्टिकोनातून सुरू झालेल्या STF च्या प्रवासाला आता क्रीडा-विकास उपक्रमांचे क्षेत्र विस्तृत करण्यासाठी नवीन उभारी मिळाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो मुलांना आणि तरुणांना त्याचा लाभ होईल. ग्रामीण भागात प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक रुग्णालये आणि प्राधिकरणांसोबत सहयोग करून मुलांसाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे आणि कौशल्य विकासासाठी संधी उपलब्ध करून देणारे नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम सादर करणे या उद्दिष्टांवर आगामी काळात काम केले जाईल. मूलभूत दृष्टिकोनाला नव्या उत्साहासह जोडून STF च्या पुढच्या दशकाचे उद्दिष्ट ‘अब्जावधी स्वप्नं पूर्ण करण्याचे’ आहे.

मुलाला खुर्चीवर बसवलं, कात्रीने गळा चिरुन पत्नीची क्रूर हत्या! व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर केला

पुणे- पुण्यातील कोर्टात काम करणाऱ्या एका पतीने पत्नीची शिलाई मशिनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडली. ज्योती शिवदास गिते असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याच्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे आरोपी शिवदास गिते सतत पत्नीसोबत वाद घातल होता.पहाटे पत्नीने उठवल्याचा रागातून आरोपीने ही हत्या केल्याची माहिती आहे. मुलाला खूर्चीवर बसवून पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने आपण ही हत्या सेल्फ डिफेन्समध्ये केल्याचं म्हटलं. त्याचा व्हिडीओ काढून त्याने व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर देखील केला होता. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, आरोपी शिवदास गिते हा सस्पेंड होता, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सकाळी चार वाजता अभ्यासाला उठवायची. परंतू पत्नीने उठवल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.

कर्वेनगर मधील बेकायदा बांधकामावर धडक कारवाईबाबत खर्डेकरांनी महापालिकेचे केले अभिनंदन

साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस मधील संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी

पुणे- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ,संदीप खर्डेकर यांनी कर्वेनगर मधील बेकायदा बांधकामावर धडक कारवाईबाबत महापालिकेचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोहोंच्या नावे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’

आज सकाळी कर्वेनगर मधील पाणंद रस्त्यावरील धडक कारवाई बघून सुखद धक्का बसला.जगप्रसिद्ध कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
सिद्धिविनायक महाविद्यालय, कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज,यांच्या समोरील ह्या रस्त्यावर bottle neck झाले होते.ह्या रस्त्यावर मोठ्या वाहनांची, पी एमपी एल बसची वाहतूक सुरु असते,अरुंद रस्त्यावरील अतिक्रमाणामुळे तेथे पादचारी, वाहनचालक विद्यार्थीनी, सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात.
अनेक वर्ष माझ्यासह ह्या भागातील नागरिक रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी करत होते,अखेर आज त्याचा मुहूर्त लागला .
स्थानिक लोकप्रतिनिधी, पथ विभाग प्रमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख व टीम मनपा चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
ह्या अनुषंगाने आणखी काही मागण्या खर्डेकर यांनी केल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे ..
1) शहरात सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस अश्या ठिकाणी सर्रास अनधिकृत व्यवसाय सुरु असून त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क होतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तरी वरील विभागांप्रमाणेच बांधकाम विभागाला देखील सक्रिय करून त्यांच्या कडून देखील कडक व सातत्यापूर्ण कारवाई ची पुणेकरांची अपेक्षा आहे.
2) अश्याच पद्धतीने ( कर्वेनगर ) पुण्यनगरीत सार्वत्रिक कारवाई केल्यास प्रशासनास पुणेकर दुवा देतील आणि निश्चितच शनिवारवाड्यावर आपला जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाईल.
3) पथारी व्यवसायिकांचा व्यवसायिक हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्यांना वैधरित्या व्यवसाय करता यावा यासाठी अनेक वर्ष प्रलंबित असलेला हॉकर्स झोन चा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करत आहे.

शरद पवारआणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा

पुणे- आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले.यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी आपल्या स्वीय सहायकाला विचारले कुठे बसायचे आहे, यावर त्यांच्या स्वीय सहायकाने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार हे अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची बातमी यापूर्वीच प्रसारित झालेली आहे.. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही आशाताई यांनी केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे.

पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.

शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी असे म्हटले आहे की, देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील. या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत. संजय राऊत यांच्या विधानातूनही हे अधोरेखित होते. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे.

श्रीकृष्ण संगीत महोत्सवात सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण

पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त विशेष सत्कार
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल अकॅडमीतर्फे आयोजन

पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित श्रीकृष्ण संगीत महोत्सवात गायन-वादनाची सुरेल मैफल अनुभवायला मिळाली. शहनाई, बासरी आणि संवादिनी या सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण झाले.
संगीत साधक, गुरू डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्ताने गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित गायकवाड यांचा डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. पंडित प्रमोद मराठे, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पंडित रामदास पळसुले, विदुषी सानिया पाटणकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, विनायक गुरव, संतोष घंटे, पंडित सुरेश पतकी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर ताल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या तबला सहवादनाने झाली. ताल तीनतालमध्ये पेशकार, कायदे, रेले, तोडे-तुकडे सादर केले. विद्यार्थ्यांना मयुरेश गाडगीळ याने लहेरा साथ केली. विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग बसंत केदारमधील विलंबित तीनतालात ‌‘अतर सुगंध‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. यानंतर मोगुबाई कुर्डिकर यांची द्रुत एकतालातील ‌‘खेल न आयी नवेली नार‌’ ही बंदिश सादर केली. बसंत रागातील सरगमने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल आवाज, दमदार ताना, आवाजाची फिरत या वैशिष्ट्यांनी मैफल रंगली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी), वेदवती परांजपे, प्रशिका सहारे (सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित राजेंद्र कुलकर्णी (बासरी), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) आणि डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) यांच्या सहभागातून सुषीर वाद्यांचा संगम साधला गेला. या दिग्गज कलाकारांना आपल्या वादन मैफलीची सुरुवात राग मारुबिहागने केली. पंडित डॉक्टर प्रमोद गायकवाड यांच्या शहनाईचे सुमधुर स्वर, पंडित प्रमोद मराठे यांच्या संवादिनीचे सुरेल वादन तर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीचे आसमंतात भरून राहणारे सूर यांनी मैफलीत रंगत आणली. बनारसी धुन ऐकविल्यानंतर कलाकारांनी मैफलीची सांगता भैरवीतील धुन ऐकवून केली. या सर्व दिग्गज कलाकारांना जगविख्यात तबलावादक पंडित रामदास पळसुले यांच्या तबल्याची अजोड साथ लाभल्याने ही वादन मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. उपस्थित कलाकार, संगीत प्रेमी रसिकांसाठी ही अनोखी मैफल हृदयात जपून ठेवण्यासाठी अनमोल ठरली. कलाकारांचा सत्कार डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी बोलताना डॉ. कशाळकर म्हणाले, डॉ. प्रमोद गायकवाड हे उत्तम गायक असून कलाकारात आवश्यक व्यापकता आणि मनाचा मोठापणा त्यांच्याकडे भरभरून आहे. सहकलाकारांना सामावून घेत मैफलीत रंग भरणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी शहनाई या वाद्याचे शास्त्रोक्त संशोधन करून संगीत जगताला मोठी देणगी दिली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रमोद गायकवाड म्हणाले, मी आजपर्यंत सांगीतिक क्षेत्रात केलेल्या कामाचे गुरूंकडून कौतुक होत आहे. या पवीत्र वास्तूत माझा सन्मान होत आहे, हा माझ्यासाठी सुवर्णक्षणच आहे. डॉ. शुभांगी बहुलकीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अबोली सेवेकर यांनी केले तर आभार विनायक गुरव यांनी मानले.

सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला? आणि GB सिंड्रोम बाबत अजित पवार काय म्हणाले….

कोरोना आला तेव्हा रेमडीसिव्हर घ्या हा सल्ला चुकीचा होता …

GB सिंड्रोम च्या रुग्णांची संख्या पुण्यात वाढली ,पाणी उकळून पिण्याचा दादांचा सल्ला

पुणे- सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला करण्यात आला की तो फक्त अभिनय करत होता? असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही, त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे, याबद्दल मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेला वाव नसल्याचं अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.माध्यमांनी राणे यांनी व्यक्त केलेल्या संशयाबाबत माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा एक पालकमंत्री या नात्याने बोलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असतं, त्यावर मी काय बोलणार. कालच नितेश राणे बंदर आणि इतर दोन विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला याबाबत आधिक माहिती नाही, जर त्यांच्या मनात काही असेल तर त्यांनी त्या विभागाला सांगावं, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असं अजित पवार म्हणालेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, समजा, एखाद्या पत्रकाराच्या मनात काही आलं, तर त्याचं तो बोलतो ना.. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल, तर डिपार्टमेंटला सांगावं, मीही फार तर सांगेन की असं कुणाच्या मनात शंका- कुशंका आहे, असंही पुढे अजित पवार म्हणाले. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. तो बांगलादेशवरुन आला होता. मुंबईबद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातील लोकांनाही आहे. त्यामुळे तो आला, पण मुंबई पाहून त्याला बांगलादेशला परत जावंसं वाटलं, त्यासाठी त्याला ५० हजार रुपये हवे होते, पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं मीडियाला पोलिस खात्याने सांगितलं आहे,आतापर्यंतच्या माहितीत तसं काही क्लू मिळालेलं नाहीये, कदाचित सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असं वाटलं नसेल, पण त्यांची तब्येत चांगली आहे, ते घडलंयच ना. नंतर पहाटे आमचे डिपार्टमेंट वाले त्याला तिकडे पहाटे घेऊन गेले, तू कसा वर गेलास, कुठला जिना वापरला, तिथे कुठून तू आत गेला, आतमध्ये शिरताना हे घर कोणाचं आहे माहिती होतं का, तर तो म्हणाला की मला हे घर कुणाचं माहिती नव्हतं, माला फक्त इतकंच माहिती होतं इथे श्रीमंत वर्ग राहतो हे माहिती होतं, अनेक अभिनेते-अभिनेत्री, निर्माते येथे राहतात एवढंच माहिती होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे

मुंबई-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये बराच गोंधळ उडाला आहे. अर्ज छानणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबात मोठे भाकीत केले आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून त्यांच्याकडून पैसे परत घेतील आणि ही योजना बंद करतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

विधानसभा सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना निवडणुकीपुरती आहे, नंतर बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, ही योजना चालूच राहिली, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. योजनेसंदर्भात अलिकडे अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना उपरोक्त दावा केला. तसेच एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या भाजप वाढवेल आणि कालांतराने योजना बंद होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर माझे आकलन आहे त्यानुसार, ज्यांना अपात्र ठरवायचे आहेत किंवा ज्यांचे पैसे कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, अशांची यादी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर वाढेल. हे भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल. त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतील आणि नंतर ही योजना बंद करून टाकतील, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार, 3 खासदार आणि काँग्रेसचे 5 आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. कोणत्याही क्षणी महायुतीत येऊ शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. या दाव्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएम ने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार सुद्धा फोडायच्या विचारात आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या शिवोत्सव मेळावा आणि पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावला. शिंदे गटाचे मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे, असे कळले. मात्र त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक असल्याचे ते म्हणाले. त्यांना पालकमंत्री नाही, तर त्या जिल्ह्याचे मालक मंत्री व्हायचे आहे. दादागिरीसमोर मुख्यमंत्री झुकत आहेत, असेही ते म्हणाले.

सैफ अली हल्ल्याची केंद्राने घेतली गंभीर दखल-बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाईचे अमित शहांचे आदेश

मुंबई-अभिनेता सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी निघाल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले.बांगलादेशी आणि म्यानमारच्या रोहिंग्या घुसखोरांची संख्या मुंबईत झपाट्याने वाढल्याचा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालात केला आहे. याआधारे शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये शाह यांना पत्र लिहिले होते.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालानुसार १९६१ मध्ये मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ८८% हिंदू होते, २०११ मध्ये ते कमी होऊन ६६% झाले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास सन २०५१ पर्यंत मुंबईत फक्त ५४% हिंदू राहतील.

बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्र्यालयाने वरील निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.आपल्या पत्रात शेवाळे यांनी घुसखोरांमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘1961 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही 88% होती. 2011 च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या 66% पर्यंत घसरली. हीच टक्केवारी 2051 पर्यंत 54% वर पोहोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोप देखील शेवाळे यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर सामाजिक संस्थांवर देखील कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

सैफ अली खानवर हल्ला झाला खरे होते की अभिनय होता?:मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली शंका; टुन-टुन उड्या मारत घरी परतल्याचा उल्लेख

पुणे/आळंदी -अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचा भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले की, हा खरोखर चाकू हल्ला होता की, अभिनय होता. ते म्हणाले की, बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत. त्यांची हिम्मत बघा. पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत. सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला. त्याच्यावर चाकूने हल्ला झाला हे खरे होते की अभिनय होता? असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुन-टुन उड्या मारत घरात जात होता, अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.आळंदी येथे सभेत त्यांनी याबाबत उल्लेख केला .

याआधी शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्याने सोशल मीडिया साइट ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “डॉक्टरांनी सांगितले की , चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. ऑपरेशन सतत 6 तास चालले. हे सर्व 16 जानेवारीला 21 जानेवारी आहे, फक्त 5 दिवसात फिट? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एका ट्विटद्वारे याविषयी शंका उपस्थित केली. डॉक्टरांनी सांगितले होते की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंचापर्यंत खोलवर घुसला होता. सामान्यतः तो आतमध्ये अडकला होता. सलग 6 तास शस्त्रक्रिया झाली. ही सर्व 16 जानेवारीची गोष्ट आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर येताच एवढा फिट? केवळ 5 दिवसांत? कमाल आहे, असे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये सैफचा घरी आल्याचा व्हिडिओही जोडला आहे.

सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला सहा दिवसांनंतर मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सैफची पत्नी-अभिनेत्री करीना कपूर खान त्याला घरी आणण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. डॉक्टरांनी अभिनेत्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.सैफ अली खान थोडा अशक्त दिसत होता, पण हसतच घरी परतला. अभिनेत्याने पाठीच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जरी आणि त्याच्या मानेवर आणि हातावरील जखमा दुरुस्त करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली. पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि गडद चष्मा घातलेला, 54 वर्षीय अभिनेता हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडिया आणि चाहत्यांना अभिवादन करताना दिसला. सैफच्या हाताला पट्टी बांधलेली होती. उपचारादरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने जनतेचे मनापासून आभार व्यक्त केले.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा ‘सीन रिक्रियेट’ केला. यामध्ये आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने हल्ला कसा केला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अली सैफ अली खानच्या घरात कसा घुसला? धाकटा मुलगा जहांगीरच्या बेडरूममध्ये पोहोचला कसा? मग तिथून कसा निघाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे यातून समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 19 जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपी शरीफुलला पोलिसांनी सोमवारी रात्री 1.15 वाजता प्रथम लॉकअपमधून बाहेर काढले आणि प्रथम वांद्रे स्थानक गाठले. पहाटे 3-4 च्या दरम्यान त्याला सैफच्या सोसायटीत नेण्यात आले. आरोपीलाही त्याने घटनेच्या वेळी घातलेल्या बॅगप्रमाणेच बॅग घातली होती. सीन रिक्रिएट करण्यासोबतच तपासासाठी स्वतंत्र फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचली. टीमने सैफच्या घराच्या बाथरूमच्या खिडकी, शाफ्ट आणि पायऱ्यांवरून एकूण 19 बोटांचे ठसे गोळा केले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सैफच्या घरात बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश केला होता आणि हल्ल्यानंतर ते येथून परत निघाला होता.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जीबी सिंड्रोम आजाराच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

पुणे, दि. २२ : पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात, विभागीय व जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणांचा या आजारा संदर्भात करण्यात येणाऱ्या उपचार व उपायोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी डॉ.पुलकुंडवार म्हणाले, ज्या भागामध्ये,कॉलनी मध्ये पेशंट आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्त्रोत महानगरपालिकेने तपासावेत आणि नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी.

दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा जेणेकरून हा आजार नेमका कशामुळे होतोय याची माहिती समोर येईल आणि नागरिकांना त्याबाबत सजग करता येईल.

सहसंचालक आरोग्य सेवा यांनी तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन त्यानंतर नागरिकांच्या माहितीसाठी एक मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध करावी.

आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार म्हणाले,गुलेन बारी सिंड्रोम हा मज्जातंतूचा आजार असून या आजारामध्ये सुरुवातीला पोटाचे आजार जसे, जुलाब, उलटी, पोटदुखी किंवा श्वसन आजार जसे, की खोकला,सर्दी इत्यादी होते. आजार झाल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर रुग्णालयाच्या हात पायाची ताकद कमी होते व रुग्णास चालता येत नाही व हात हलवता येत नाही आजार वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होतो व रुग्णास व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासू शकते या आजाराचे निदान नर्वे कंडक्शन स्टडी व ( सी एस एफ तपासणीद्वारे) पाठीच्या मणक्यावरील पाणी तपासून केले जाते.या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार घ्यावेत या आजारातून बहुतांश रुग्ने बरे होतात असे त्यांनी सांगितले . ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये या आजाराचे सध्या १० प्रौढ रुग्ण व दोन लहान मुलं दाखल झाले आहेत. यामध्ये आठ पुरुष व चार स्त्रिया यांचा समावेश आहेत. सर्व रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
बैठकीस,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मीरा बोराडे,
बीजे मेडिकल विद्यालयाचे मायक्रोलॉजी विभाग प्रमुख राजेश कार्यकर्ते महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एच.डी. प्रसाद उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, साथरोग विभागाच्या सहसंचालक बबिता कमलापूरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, मनपा पाणी पुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुण्यात ५४ वधू – वरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

  • केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्या सारख्या प्रथा बंद होतात. अनिष्ट प्रथा-परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार चेतन तुपे, पृथ्वीराज देशमुख, दत्तात्रय धनकवडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख, खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह, संजय खोपडे आदीनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील ५४ जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली. पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू – गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

अजित पवार म्हणाले, घरातील लग्नकार्यामुळे आई-वडील कर्जबाजारी झाल्याचे चित्र अनेक घरांमध्ये बघायला मिळते. त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे. हे मानव सेवेचे काम आहे. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठीच नाही तर त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आधार आणि आनंद मिळाला आहे.

ते पुढे म्हणाले, अप्पासाहेब शिंदे हे उत्तम संघटन असणारे नेते आहेत. देशभरातील लाखो फार्मासिस्ट संघटना त्यांच्याशी जोडले गेले आहेत. तब्बल ४० वर्षे त्यांनी संघटनेसाठी दिली आणि अत्यंत किचकट तांत्रिक प्रश्न मार्गी लावले. देशात देखील चांगला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. दूरदृष्टी आणि सामाजिक भान जपणारे ते नेते आहेत

चंद्रकांत पाटील म्हणाले, एकाच क्षेत्रात सातत्याने काम करुन अप्पासाहेब शिंदे यांनी यश मिळवले आहे. याच पैशांनी ते समाजासाठी देखील काम करतात आणि अनेकांना मार्गदर्शन देखील करतात. पैसे कमवून आयुष्याच्या शेवटी ते सोबत नेता येत नाहीत, जसे आलो तसेच आपण रिकामेच जात असतो. त्यामुळे आयुष्यात समोर दिसेल ते काम करा आणि अप्पासाहेब शिंदे यांच्यासारखे फक्त पैसे नाही तर माणसे जोडा, असेही त्यांनी सांगितले.

जगन्नाथ शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला आहे. आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काही तरी देत जावे आणि त्यांची सेवा करावी, हीच यामागे भावना आहे. गरीब आणि आदिवासी समाजातील अनेक जोडपी येथे विवाहबद्ध झाली. त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा आमच्या माध्यमातून होतो आहे, ही समाधानाची बाब आहे.

पुणे महानगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 22: पुणे शहर महानगर पालिकेमध्ये नवीन 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मनपा अंतर्गत नागरिकांवर मालमत्ता कर थकीत आहे. या थकीत मालमत्त करावरील शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिले.

मंत्रालयात पुणे महानगर पालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विषयांबाबत बैठक राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री बोलत होत्या. बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एस गोविंदराज, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, नगररचनाकार प्रतिभा भदाणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मालमत्ता कराच्या थकबाकीची वसूली करताना निवासी आणि व्यावसायिक असे वर्गीकरण करण्यात यावे. थकीत कर प्रलंबित राहील्यास त्यावर दंडाची रक्कम वाढून जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांना अधिकचा बोझा बसेल. पुणे शहरात लष्करी छावणीचा भाग आहे. या भागाचा पुणे महानगरपालिका क्षेत्रात सहभाग करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. लष्करी छावणीचा महानगर पालिकेत समावेश झाल्यास सर्वांगिण विकास करता येईल.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत एकवट मानधनावर 168 सेवक कार्यरत आहेत. या सेवकांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे. अशा सेवकांबाबत काही महानगर पालिकांमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेत निर्णय घेण्यात यावा. लाड पागे समितीबात सफाई कामगार वारसा हक्क भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करून शासन निर्णय काढण्यात यावा.पुणे शहरातील वृक्षांची संख्या किती आहे, किती वृक्ष पाहिजेत, यासाठी पुणे शहरातील वृक्ष गणना करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

पुणे मनपा व पीएमआरडीएने बांधकाम परवानगी देताना बांधकाम शुल्कातील 50 टक्के हिस्सा संबंधित यंत्रणेला त्याचवेळी मिळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट व्यवस्थेत बदल करावा. हिलटॉप आणि हिलस्लोप जमिनींच्या आरक्षणाबाबत समिती करण्यात यावी. यामध्ये प्रकरणनिहाय आढावा घेण्यात यावा. पुणे शहरातील प्रकल्प बाधीत नागरिकांना कायम स्वरूपी घरे देण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिल टॉप, हील स्लोप आणि बी. डी. पी बाबत निर्णय घेण्यात यावा. पर्वती टेकडीच्या लगतची झोपडपट्टी निर्मुलन करण्यासाठी चांगली योजना करण्यात यावी. या भागातील हेरीटेजची अट शिथील करून इमारत उंचीवरील मर्यादा हटविण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या

बियरच्या बिलाचा वाद: SK बारच्या ८ जणांनी ग्राहकाला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पुणे- बियरच्या बिलावरून झालेला वाद पराकोटीला पोहोचला आणि २६ वर्षीय ग्राहकाला एका खोलीत कोंडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न बिबवेवाडीतील एका बार मध्ये झाल्याने हा ग्राहक आता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतो आहे.

बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील SK बार मध्ये हा प्रकार रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला.पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल कर्मचारी आणि चालकासह एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके 8888813154 अधिक तपास करत आहेत .

२२ लाखाचे अफिम घेऊन आलेल्या राजस्थानच्या नाथुरामला पकडले..

पुणे- २२ लाखाचे अफिम घेऊन आलेल्या राजस्थानच्या नाथुरामला पुणे पोलिसांनी पकडले आहे.
पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेले सुचना दिल्या होत्या.
त्यासुचनाप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर कोढवा पुणे. येथे एक इसम हा त्याचे हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हलबॅग घेवुन संशयित्तरित्या उभा असल्याचे दिसुन आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता नाथुराम जीवणराम जाट, वय ५२ वर्षे, रा. मु/पो असावरी, तेहसील मुंडवा, जि. नागोर, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यामधुन एकुण किं.रु. २१,८०,०००/-रु.चा, ऐवज त्यामध्ये १ किलो ९० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन, त्याचे विरुध्द कोढवा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता तो फर्निचर बनवण्याच्या कामासाठी यापुर्वी पुणे शहरामध्ये आल्याचे सांगुन अल्पावधीत पैसे कमावण्याच्या इरादयाने अफिम विक्री करण्यासाठी पुण्यामध्ये आणले असल्याचे सांगितले.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, दयानंद तेलंगे पाटील, संदिप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहीते, यांनी केली आहे.

ग्रंथालये लोकाभिमुख व्हावीत यासाठी शासनाचे प्रयत्न-ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

कोथरूड येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ

पुणे, दि. २२ : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाचन संस्कृती ही लोकचळवळ झाली पाहिजे ग्रंथालय लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी, पुणे यांच्यावतीने कोथरुड येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, लेखिका मंगला गोडबोले, गांधी स्मारक कार्यवाह राजन अनवर, जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह सोपान पवार, ग्रंथमित्र धोंडिबा सुतार आदी उपस्थित होते.
श्री. गाडेकर म्हणाले, पुणे ही शैक्षणिक पंढरी असून ज्ञानाची नगरी आहे. राज्यात वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी शासनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे व टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजमाध्यमांच्या युगात माध्यम बदलले असले तरी वाचन संस्कृती जोपासली जात आहे. राज्यातील ४३ शासकीय ग्रंथालयांचे ई-ग्रंथालय प्रणाली विकसित करण्यात येत असून आत्तापर्यंत ३८ लाख पुस्तके ई-ग्रंथालयांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. राज्यातील ३२७ ‘अ’वर्ग ग्रंथालये ई-ग्रंथालय प्रणालीला जोडण्यात येणार आहेत.
ते म्हणाले, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासन सकारात्मक असून लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शासनाकडून ग्रंथालयांना वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रंथालयाला २ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
डॉ. ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांचा ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमात सहभाग वाढवणे आवश्यक आहे. मोबाईलच्या युगात मुलांना वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटविण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. समाज माध्यमांमुळे माहिती तर मिळते परंतु वाचनातून आत्मसात केलेले ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात राहते. आपल्या परिसरातील किमान पाच लोकांना ग्रंथोत्सवाला भेट देण्याबाबत प्रोत्साहित करावे. किमान एक, दोन पुस्तक खरेदी करुन आपल्या घरामध्ये संग्रही ठेवावे. पालकांनी मुलांना मोबाईलच्या वाढत्या सवयीपासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.
श्रीमती गोडबोले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, शासनाच्या उपक्रमांची पूर्वप्रसिद्धी करावी. त्यामुळे शासनाचे उपक्रम अधिकाधिक यशस्वी होतील. साहित्य अकादमीने छापलेली पुस्तके सर्वांपर्यंत पोहोचवावीत, महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत, राष्ट्रीय पातळीवर गौरविलेल्या पुस्तकांच्या माहितीचे फलक ग्रंथालयात लावण्यात यावेत, असे आवाहन करुन मोबाईलच्या युगातही वाचनसंस्कृती जोपासली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हा ग्रंथोत्सव २३ जानेवारी २०२५ पर्यंत महात्मा गांधी स्मारक निधी, गांधी भवन, अंध मुलींच्या शाळेजवळ, कोथरुड येथे सुरु असून अधिकाधिक ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.