Home Blog Page 679

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरीत सोडवा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : सातव्या वेतन आयोगाचा फरक पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मिळावा, वारसा हक्काने नोकऱ्या मिळाव्यात आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रितो पाल यांना दिले.

काँग्रेस पक्षाच्या या शिष्टमंडळात माजी नगरसेवक अविनाश बागवे, अनिता मकवाना, चंद्रकांत चव्हाण, प्रविण करपे, सुरेश कांबळे यांचा समावेश होता.

कॅन्टोन्मेंट बोर्डात कायमस्वरूपी सेवेत ३५० आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले २०० कर्मचारी सेवेत आहेत. यातील कायमस्वरूपी सेवेतील काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले असून, काहीजण सेविनिवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या ७२ वारसांनी वारसा हक्काने बोर्डात नोकरी मिळावी यासाठी आवश्यक ती वैद्यकीय प्रमाणपत्रे, कागदपत्रे बोर्डाकडे सादर केली आहेत. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. तरी वारसाहक्काने त्या ७२ जणांना बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मोहन जोशी यांनी निवेदनात केली आहे.

कंत्राटी पद्धतीच्या सेवकांना नियमित मासिक वेतन मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्या तक्रारी दूर व्हाव्यात, सात, आठ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांची नेमणूक कायमस्वरूपी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू केला जात नाही. ही तफावत दूर केली जावी. याबाबतचा निर्णय तातडीने व्हावा. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

कामगारांना न्याय देऊ अधिकाऱ्यांचे आश्वासन

शिष्टमंडळाने सुचविलेल्या मागण्यांंनुसार कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊ, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी पाल यांनी दिले.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्राला व भारताच्या राजकारणात ऐतिहासिक योगदान – नीलम गोर्हेंचे अभिवादन

मुंबई- आज हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे आमच्या आयुष्याला कलाटणारी देणारा हा दिवस आहे. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धैर्य आणि धाडस दाखवत ते हिंदुत्वावर शिवसेनेला घेऊन आले बाळासाहेब असते तर आज शिंदेंची पाठ थोपटली असती असे विधान विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती दिनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपसभापती नीलमताई गो-हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिक्षण मंत्री दादा भुसे,आयुष्य मंत्रालय मंत्री प्रतापराव जाधव शिवसेना नेते आनंदराव अडसूळ,दिपक सावंत व इतर शिवसेना नेते उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला नवसंजीवनी दिली.बाळसाहेबांनी हिंदुत्वासाठी त्याग केला .ज्यांना शिवसेनेत यायचं आहे ते आनंदाने आणि प्रेमाने आमच्याकडे येतील.काही समाजकंटक घुसखोरी करत आहेत बोगस आधारकार्ड तयार करत विकृती करत आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला हवी असे नीलम गो-हे म्हणाल्या आहेत.

ठाकरेंचे 4 आमदार, 3 खासदार लवकरच शिंदे गटात:उद्या रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल-म्हणाले उदय सामंत

मुंबई-ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्या या पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश रोखून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार तसेच काँग्रेसचे 5 आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार असून रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीनंतर कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. सांगलीतून सातारा आणि साताऱ्यातून पुण्यात, असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे, असे आव्हानही उदय सामंत यांनी विरोधकांना केले आहे. पुढील तीन महिन्यांत हे सगळे आमच्या पक्षात येतील. दररोज एक ब्रेकिंग न्यूज मिळेल, हा शब्द आहे, असेही ते म्हणाले.

उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातील 20 आमदार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही नेते बालिश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता न बोलले बरे, मी त्यांच्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करत आहेत. हा माझा मोठेपणा आहे. असल्या बालीशपणाने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दरी निर्माण होणार नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा मोठ्ठा प्रतिसाद!

  • तक्रारींचे प्रशासनामार्फत तात्काळ निवारण
  • कल्याणकारी सर्व योजनांची एकाच ठिकाणी महिती

पुणे – लोकप्रतिनिधी हा नागरिकांच्या तक्रारी सोडवणे इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्याने नागरिकांना भेटून त्यांची मत जाणून घ्यावीत अणि यातून नागरिकांशी संवाद कायम ठेवावा ही सर्वसामान्यांची अपक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच पुण्यात दर महिन्याला “खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवण्यात येत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या अभियाना पुणेकरांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघात झालेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानात अधोरेखीत झाले.

पुणेकरांनी आपला खासदार म्हणून मोहोळ यांची भरघोस मताधिक्याने निवड केली. त्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू करण्यात आले. यात खासदार मोहोळ यांच्यासह मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक असे स्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतात.याची सुरूवात कोथरूड मतदारसंघातून झाली. आतापर्यंत कोथरूडसह कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. हा कार्यालय तास-दोनतासांचा कार्यक्रम असणार या समजुतीला सुरूवातीपासून छेद दिला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच ते सहा तास म्हणजे अखेरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याचे समाधान करूनच कार्यक्रमाची सांगता प्रत्येक मतदार संघात झाली.

या ठिकाणी महानगरपालिका, राज्य शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना खासदार पहिल्यांदा ऐकून, त्यावर त्यांना योग्य अधिकाऱ्याकडे पाठवतात. तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यावर त्यांचा भर असतो. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांची महिती तेथे उपस्थित राहणार असलेले भाजपचे कार्यकर्ते करून देत नागरिकांकडून अर्ज भरून घेतात. सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना करण्यासाठी कार्यकर्ते राबत असतात.

नागरिकांच्या चहा, पाणी, नाष्टा किंवा जेवण याचीही काळजी अभियानस्थळी घेतलेली असते. या अभियानात केवळ तक्रारी सोडवल्या जात नाहीत तर नागरिकांचे कोणत्याही सार्वजनिक हिताच्या सूचना, संकल्पना ऐकून घेतल्या जातात. त्याची लिखीत नोंद घेतली जाते. चांगल्या संकल्पना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी नागरिकां इथे दिली जाते. तसेच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. शासनाच्या कामाचीही महिती देण्याचा संधी या अभियानात मिळते. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर केले जातात.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाबद्दल खासदार मोहोळ म्हणाले की, ‘हे अभियान प्रामुख्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठीचे अभियान आहे. प्रत्यक्ष अभियानावेळी जे करता ते कार्यालयात बसूनही करणे शक्य होते. पण एकाच वेळी संपूर्ण मतदार संघातून नागरिक आले तर प्रत्येकाला फार वेळ देता येत नाही. म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथे नागरिकांशी संवाद साधण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांची संख्या मर्यादित राहते आणि आलेल्या प्रत्येकाशी बोलताही येते.

‘प्रशासन व नागरिक आमनेसामने असल्याने तक्रारींचा लवकर निपटारा जागीच करता येतो. यातून नागरिकांना मिळणारे समाधान आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी जास्त महत्वाचे आहे. आमचे लोकप्रतिनिधी भेटतच नाहीत या तक्रारीची संधी देऊ इच्छित नाही. या निमित्ताने कार्यकर्त्याशीही बोलता येते. शासन व प्रशासनाबद्दल नागरिकांच्या भावना समजतात. त्याचा उपयोग पक्षसंघटनेलाही होतो असा अनुभव आहे’, असेही मोहोळ म्हणाले

महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सुरुवात

-सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या छत्रछायेखाली जमणार लाखो भाविक

पिंपरी, पुणे २३ जानेवारी २०२४:आज जिथे एकीकडे देश आणि समाज संकीर्णता आणि संकुचित वृत्तीच्या भिंतींमध्ये अडकला आहे, तिथे दुसरीकडे संत निरंकारी मिशन या भिंती तोडून अमर्याद विस्ताराच्या दिशेने प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र सान्निध्यात महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये “विस्तार – अनंताच्या दिशेने” या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे.

सुमारे ३०० एकर च्या विस्तीर्ण क्षेत्रावर साजरा होणाऱ्या या भक्तीमय महायज्ञात देश-विदेशातील लाखो श्रद्धाळू, भक्त आणि मान्यवर सहभागी होतील. त्याचबरोबर निरंकारी संत समागम चे थेट प्रसारण मिशनच्या वेबसाइट (www.nirankari.org/live) वर जगभरातील अनेक आध्यात्मिक प्रेमींना पाहायला मिळणार आहे. या समागमाचे सर्व व्यवस्थापन संत निरंकारी मिशनच्या सेवादलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले आहे.

संत निरंकारी मंडळाचे समागम चेअरमन श्री शंभूनाथ तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा सांभाळण्यासाठी संत निरंकारी सेवादलाचे सुमारे १५,००० सदस्य समर्पित भावनेने सेवा देतील.

संत समागमाच्या तीनही दिवसांमध्ये दुपारी २:०० ते रात्री ८:३० या वेळेत सत्संगाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होईल. यात विविध संत महात्मा आपले विचार मांडतील आणि समर्पित संगीतकार भक्तिरसाची उधळण करतील. यात सर्वच वयोगटांतील विविध भाषा बोलणारे श्रद्धाळू सहभागी होतील. याशिवाय, दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एक आध्यात्मिक कवी दरबार संत निरंकारी समागम चे विशेष आकर्षण ठरेल. सत्संगाच्या शेवटी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांचे प्रेरणादायी प्रवचन सर्वांना प्रेरणादायक ठरेल.

निरंकारी मिशनच्या कलाकारांकडून एक आगळीवेगळी प्रदर्शनी ही आयोजित करण्यात आली आहे. यात मिशनचा इतिहास, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचे भावपूर्ण चित्रण सादर करण्यात आले आहे. तसेच मिशनद्वारे प्रकाशित सर्व मासिके आणि पुस्तकेही समागमा मधे उपलब्ध असतील.

या भव्य-दिव्य संत समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाशी संबंधित विविध यंत्रणांचेही मोलाचे योगदान मिळत आहे. मानवाच्या मनोवृत्तीला ज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून अमर्याद विस्तार देणाऱ्या या संत समागमात आपले स्वागत आहे.

गुजरातमध्ये  एमक्युअर फार्माक्युटिकल्सकडून  जागतिक दर्ज्याचे संशोधन विकास केंद्र

अहमदाबादगुजरात – २३ जानेवारी २०२५ –

देशातील फार्मा कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एमक्युअर फार्मा कंपनीने गुजरात येथे जागतिक दर्ज्याचे संशोधन विकास केंद्र उभारलण्याची घोषणा केली. अहमदाबाद येथील तपोवन सर्कल येथे हे केंद्र उभारले आहे . गुजरात येथील एमक्युअर रिसर्च सेंटर या नावाने हे संशोधन विकास केंद्र ओळखले जाईल. एमक्युअर रिसर्च सेंटर (ईआरसी) येथे शाश्वत जगतातील विविध आजारांवरील औषध संशोधन फार्म्यूला, लिपोसोमल इंजेक्शन आणि अत्याधुनिक त्वचेसंबंधी थेअरपी आदी औषधांमधील वितरण प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. गुजरातचे आरोय आणि कुटुंबकल्याण मंत्री श्री. ऋषिकेश पटेल यांच्या हस्ते ईआरसी केंद्राचे उद्घाटन झाले. या सोहळ्यातून एमक्युअर कंपनी ही औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन आणि विकासाबाबत कटिबद्ध असल्याचा सर्वांना परिचय झाल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्रगत साधनसामग्रीच्या मदतीने नवे ईआरसी केंद्र नवनव्या संशोधनासाठी सज्ज झाली आहे. हे केंद्र जागतिक नियामक मानांकनचे पालन करते. यात प्रामुख्याने अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील पूर्व-फॉर्म्यूलेशन अभ्यास ते स्केलिंगपर्यंत औषधनिर्मिती क्षेत्रातील विकासाचे सर्व पैलूंवर काम केले जाईल.

फार्माक्युटिकल सायन्स, बायो-इंजिनिअरिंग, एनालिटिकल केमिस्ट्री, फार्माकोव्हिजिलन्स आणि रेग्युलेटरी अफेअर्समध्ये डॉक्टरेट, पदवीधर, पदव्युत्तर अशा ३५० कुशल व्यावसायिकांची टीम नवीन फॉर्म्युलेशन विकसित करण्यासाठी काम करेल. ही टीम औषध जैवउपलब्धता वाढवण्यासाठी तसेच रुग्णकेंद्रीत वितरण सेवा तयार करण्यासाठीही कार्यरत असेल.

ईआरसी केंद्राचे उद्घाटन करताना गुजरातचे माननीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री. ऋषिकेश पटेल म्हणाले, ‘‘अहमदाबाद येथे एमक्युअर फार्माक्युटिकल्सच्या अत्याधनिक संशोधन विकास केंद्राचे उद्घाटन करताना मला खूप अभिमान वाटतोय. गुजरात राज्य सदैव नवनव्या प्रगतीपथाचे केंद्र राहिले आहे. या केंद्राच्या मदतीने आपण भविष्यातील आरोग्यसेवेवरील गरजेच्या गोष्टी साधू शकतो. एमक्युअरने औषध संशोधनात गुंतवणूक करुन स्थानिक कार्यक्षमतेच्या विकासाला वाव दिला आहे. यामुळे केवळ गुजरात राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर येईल. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी एमक्युअर कंपनीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. ’’

एमक्युअर संशोधन केंद्राने शाश्वत उपाय आणि हरित रसायनशास्त्र पद्धतींवर लक्ष केंद्रित करुन पर्यावरण संरक्षणासाठीही पुढाकार घेतला आहे. रोजगारनिर्मितीसाठीही हे केंद्र महत्त्वाचे मानले जाते. या केंद्रातून सामायिक ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि सर्व घटकांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक संस्था, उद्योग तज्ज्ञ आणि नियामक संस्थांसाठीही हे केंद्र खुले आहे.

एमक्युअर फार्माक्युटिकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश मेहता यांनी या केंद्राबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘संशोधन आणि विकास या दोन घटकांवर गेल्या चाळीस वर्षांमध्ये एमक्युअरने सर्वतोपरि बाजी मारली आहे. या काळात अशक्यप्राय वैद्यकीय आव्हांनावरील समस्यांचे निराकरण करता आले. या नव्या संशोधन विकास केंद्रातही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल टीमच्या मदतीने विविध समस्यांचे निराकरण करणारी उपाययोजना शोधली जाईल. या कामातील संशोधनाचा दर्जा आणि कर्मचा-यांच्या कार्यतत्परतेने भविष्यातील जागतिक पातळीवरील औषधांची गरज पूर्ण केली जाईल.

गुजरात येथील ईआरसी केंद्र सर्व नियमित आणि उदयोन्मुख आणि देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व उत्पादनांची निर्मिती करुन औषधनिर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येत आहे.

आजच्या परराष्ट्र धोरणातून विकसित भारताला बळ-राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर

स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वानंद व्याख्यानमालेतील दुसरे सत्र  
पुणे : परराष्ट्र धोरण हा पहिल्यापासून आपल्याकडे दुलर्क्षित राहिलेला विषय आहे. पं. नेहरू यांचा याविषयी अभ्यास होता. परंतु त्यावेळी हे ठराविक लोकांपुरते मर्यादित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० संमेलन घेऊन हे धोरण घराघरात पोहोचविले. मोदींनी जनतेचा सहभाग घेतला. त्यामुळे आजच्या परराष्ट्र धोरणातून विकसित भारताला बळ मिळेल, असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केला.  

स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संस्कार गुरुकुल येथे करण्यात आले. त्यातील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, काका चव्हाण, राजेंद्र मोरे, जगन्नाथ हेंद्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते.

शैलेंद्र देवळणकर म्हणाले, भारताचे परराष्ट्र धोरण हे चीन आणि पाकिस्तान पुरते मर्यादित होते. मात्र, आज नरेंद्र मोदी यांनी ९२ देशांचे दौरे केले आहेत. आपण अमेरिका आणि युरोप सारख्या देशांसमोर डोळ्यात डोळे घालून निर्णय सांगत आहोत, हा मोठा बदल झाला आहे. पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक आणि कौशल्य विकास या तीन स्तंभांवर देशाची प्रगती होईल.  

ते पुढे म्हणाले, उद्योगात रोजगार क्षमता आहे. त्यामुळे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हे नरेंद्र मोदी यांनी आणले. आज २३ टक्के रोजगार उपलब्ध असून उद्योगवृद्धीमुळे ६३ टक्के रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शिक्षण पद्धतीत बदल आणि परराष्ट्र व्यवहार याबाबत आपण अधिक सजग व्हायला हवे. भारतीयांमध्ये सकारात्मकता असेल, तर भारत विकसित राष्ट्र होईल, असेही त्यांनी सांगितले. भीमराव तापकीर याने मनोगत व्यक्त केले. प्रकाश असलेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पितालीया यांनी सूत्रसंचालन केले.

आयुक्त अमितेश कुमार म्हणाले …गुन्हेगारांना जशास तसे उत्तर देण्यास पोलीस समर्थ .. कायदेशीररित्या त्यांचा आम्ही करतो बंदोबस्त, जामीनही मिळत नाही इथे ..

महिलांवरील अत्याचारांसह फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ ,खून, खुनाचे प्रयत्न यात घट,

पुणे : ‘ पुण्यात कोयता गँग बिंग काही अस्तित्वात नाही,मात्र महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून त्यांना न्याय द्यावा, तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०२४ मध्ये फसवणुकीचे २०२१ गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये ११०८ गुन्हे दाखल झाले होते. फसवणूक, सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सामान्यांना न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्या यावे. जमीन बळकावणे, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक आढावा गुरुवारी जाहीर करण्यात आला. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, शैलेश बलकवडे, प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहिती, तसेच पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मुळात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून घेण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. शाळकरी मुलांचे योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. त्यामुळे बालकांवरील अत्याचारांचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. अत्याचार प्रकरणातील १२०० फिर्यादी पीडित महिलांना पोलिसांना आधार देण्यासाठी पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत. पीडित महिलांना आरोपींकडून त्रास देण्यात येत नाही ना, त्यांच्यावर कोणताही दबाब टाकण्यात येत नाही ना, याचीही माहिती घेण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांचे महत्वपूर्ण तपास
सोमवार पेठेतून मेफेड्रोन जप्त, कुरकुंभमधील कंपनीवर छापा, ३६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरण
शरद मोहोळ खून प्रकरण
सतीश वाघ खून प्रकरण
कल्याणीनगर अपघात प्रकरण
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण

२०२४ मध्ये शहरात ९३ खून झाले. त्यापैकी १४ खून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाले होते. २०२३ मध्ये शहरात १०१ खून झाले होते. २०२३ मध्ये खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४४ गु्न्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४४ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी १५३५ गुन्हे दाखल झाले होते. २०२३ मध्ये १३९० गुन्हे दाखल झाले होते. दहशत निर्माण करुन दुखापत करणाऱ्या सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

दागिने हिसकाविणाऱ्यांवर चोरट्यांवर मोक्का कारवाई
गेल्या काही दिवसांत शहरात पादचारी महिलाकंडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पुण्यातील गुन्हेगारी दृष्टीक्षेपात
२०२४ मध्ये गंभीर स्वरुपाचे १२ हजार ९५४ गु्न्हे दाखल (भाग एक ते पाच गुन्हे)
१०० गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई (एमपीडीए)
४८ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’कारवाई
घरफोडीच्या गुन्ह्यात घट, ५२७ घरफोडीचे गुन्हे दाखल
शिक्षेचे प्रमाण वाढीस
महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य; १०९१ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
महिला दक्षता समितीच्या बैठका
अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी समुपदेशन, पालकांशी संंवाद
गुन्हे सांख्यिकी
गंभीर गुन्हे –

दाखल गुन्हे (२०२४) – दाखल गुन्हे (२०२३)

खून – ९३ – १०१

खुनाचा प्रयत्न – १८६ – २५५

फसवणूक – २०२१ – ११०८

दुखापत – १५३५ – १३९०

घरफोडी – ५२७ – ६०४

वाहन चोरी – १९८२ – १९८९

बलात्कार – ५०५ – ४१०

विनयभंग – ८६४ – ७७५

एकुण गंभीर गुन्हे – १२९५४ – ११९७४

बाळासाहेबांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे-शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरणा घेत, समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत असे प्रतिपादन पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सारसबाग जवळील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येथील कलादालन येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुणे शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पुणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या उपक्रमाद्वारे शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी नेतृत्व, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी दिलेला आवाज, मराठी माणसांसाठी असलेला लढा महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद तसेच हिंदुत्वासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरणा घेत, समाजहिताचे अनेक उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबवले जात असून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा अविरतपणे पुढे चालवत राहू असे प्रतिपादन शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केले.

याप्रसंगी महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, शहर संघटक श्रीकांत पुजारी, महिला आघाडी शहरप्रमुख श्रुतीताई नाझीरकर, सुरेखाताई पाटील, राजश्रीताई माने, उपशहर प्रमुख सचिन थोरात, संजय डोंगरे, सुधीर कुरुमकर, विकी माने, प्रमोद प्रभुणे, गौरव साईनकर, गणेश काची, शहर संघटक आकाश रेणूसे, विभाग प्रमुख नितीन लगस, निलेश जगताप, महेंद्र जोशी, मयूर पानसरे, उद्धव कांबळे, मार्तंड धंधुके, सुहास कांबळे, प्रणव थोरात, गडकरी सर यांच्यासह पुणे शहरातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

सोनसाखळी चोरांवर जरब बसवा! भाजपा कोथरूड मंडलाची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

पुणे-कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. कोथरूडमध्ये, मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले, तर कर्वेनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या घटनांमुळे पुण्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सोनसाखळी चोरांवर जरब बसविण्याची मागणी भाजप कोथरुड मंडलाच्या वतीने आज करण्यात आली.

भाजपा कोथरूड मंडलाच्या शिष्टमंडळाने आज कोथरूड मधील अलंकार पोलीस चौकीच्या निरिक्षक सुमिता रोकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोथरूड मधील सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून, महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. कर्वेनगर भागात बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याचे सीसीटीव्ही समोर आले असून, दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेवर पाळत ठेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यावेळी हिसकवताना मंगळसूत्राचा एक भाग तुटला आणि खाली पडला, मात्र चोरटा परत आला आणि पडलेला भाग उचलून घेऊन गेला. या घटनेमुळे कर्वेनगर परिसरात सुरक्षा आणि पोलिसांच्या कार्यवाहीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या एका घटनेत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेची सोनसाखळी हिसकावली. ही घटना देखील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरट्यांनी थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसून महिलेची सोनसाखळी लंपास केली. त्यामुळे या दोन्ही घटनांचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, आणि चोरावर जरब बसवावी. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गस्त वाढवावी, अशी मागणी केली.

यावेळी कोथरूड मंडळाचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहरांचे सरचिटणीस पुनीत जोशी,नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वीकृत सदस्‍य ॲड.मिताली सावळेकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल सरचिटणीस दीपक पवार, गिरीश खत्री, प्रभाग १३ च्या अध्यक्ष ॲड. प्रचि बगाटे, युवा मोर्चा सरचिटणीस कुणाल तोंडे, असिफ तांबोळी, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.गौरी करंजकर, जेष्ठ नागरिक आघाडीचे सरचिटणीस नितीन कंधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई: राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत तसेच राज्यातील बस स्थानका व परिसर स्वच्छ व उत्तम सोई सुविधांनी युक्त असावा बस स्थानकातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे निर्देश राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरीताई यांनी दिले

आज परिवहन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी श्री गिरीश देशमुख महाव्यवस्थापक श्री नंदकुमार कोळकर व इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी महामंडळात च्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या
सोबतच बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणार्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या सोबतच यांच्या निवासस्थानाच्या प्रकल्प लवकरत लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या याबरोबरच बस स्थानकावर तृतीयपंथांना राखीव स्वच्छता ग्रह उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बस स्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी पुढील काळात अनेक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

लाडक्या बहिणींच्या पैशाची रिकव्हरी आणि शरद पवारांच्या शेजारी का बसलो नाही ? अजितदादांनी दिले उत्तर

पुणे- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या तेळी ते बोलत होते.

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले.सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दार आड चर्चाही झाली , व्यासपीठावर ते शेजारी बसणार होते मात्र आयत्या वेळी अजित दादांनी आसनव्यवस्था बदलली.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारां शेजारी बसविले ,त्यांना साहेबांशी बोलायचं असल्यानं जागा बदलल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये उपस्थित झाला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये देखील तेथील नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सैफ अली खानवरील हल्ला देखील बांगलादेशी व्यक्तीने केला असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. लाडकी बहीण योजना ही आम्हाला आधार कार्डशी लिंक करायची होती. मात्र वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता खरोखरच लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावले उचलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत घेऊ, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. मात्र टीकेची झोड उठताच त्यांनी अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दावोस येथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरेंची कानउघाडणी केल्याचे समजते.

‘एसएफए फुटबॉल टूर्नामेंट’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल ३र्‍या स्थानावर

पुणे, दि.23 जानेवारी : एसएफए फुटबॉल टुर्नामेंटमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल खेळाडूंनी विजयाने सुरुवात केली.   शिवछञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या एकतर्फी सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी लॉयोला हायस्कूलवर २-० च्या विजयासह तिसर्‍या स्थानासाठी सामना जिंकला. खेळाडू आरव चौधरी व श्रीजन वर्मा यांनी गोल केला. ध्रुवच्या खेळाडूंनी प्रेक्षकांना ही विजयाची भेट देऊन टाळ्यांचा कडकडाट केला. खेळाडूंचा जोश आणि चिकाटी पाहून ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
सामन्यातील पहिल्या हाफ च्या २५’ व्या मिनिटाला ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू आरव चौधरी याने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ध्रुव स्कूलच्या खेळाडूंनी ही आघाडी कायम ठेवली. दुसर्‍या सत्रातही ध्रुव च्या खेळाडूंनी उत्कृृष्ट कामगिरी सुरू ठेवली. २९’ व्या मिनिटाला श्रीजन वर्मा याने गोल करत संघाची आघाडी २-० अशी वाढवली व विजय निश्चित केला.  
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल टीम मध्ये समनमय गुप्ता, आरव चौधरी, कबीर बिजूर, आयुष गाडवे, अर्जुन विजयेंद्रन, नमिष सिंह, श्रीजन वर्मा आणि नरेन प्रसाद यांचा समावेश होता. या खेळाडूंनी आपल्या चिकाटीच्या जोरावर यश मिळविले. या खेळाडूना समर्पित प्रशिक्षक अमेय कलाटे आणि पार्थ सायकिया यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? मुंबई पोलिसांनी खुलासा करावा: नाना पटोले

सैफ अली खान हल्ला प्रकरण हिंदू-मुस्लीम नाही तर कायदा सुव्यवस्थेचे, सत्ताधारी भाजपाकडून मात्र धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न.

‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?

मुंबई, दि. २३ जानेवारी २०२५
अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिणींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांग्लादेशींनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांग्लादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार

आरोग्य, पायाभूत सुविधा व बंदरांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार; अंबर आयदे यांची माहिती 
पुणे: दावोसमधील (स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने पुण्यातील रूरल एन्हान्सर्स संस्थेशी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा क्रेडिट लाईन सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे व सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असून, मुख्यमंत्री फडणवीस व संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी करार आदानप्रदान केला. महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी, तसेच पुण्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचे केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करताना म्हटले आहे.
राज्य शासनाच्या वतीने परकीय गुंतवणूक विभागाचे सचिव कौस्तुभ धावसे यांच्या पुढाकारातून नेदरलँड येथील शासकीय संस्थांचा त्रिपक्षीय करार झालेला आहे. यावेळी कौस्तुभ धावसे, राज्य शासनाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, एमआयडीसी विभागाचे सचिव पी. वेलारसू, नेदरलँड शासनामार्फत एडविन सीएसवरदा, रुरल एन्हान्सर्स समूहाचे चेअरमन इन डेस्क सुब्रह्मण्यम येडावली, मुख्यमंत्र्यांचे सहायक जयंत येरवडेकर उपस्थित होते. अंबर आयदे यांच्या संस्थेला राज्य शासनामार्फत दावोस येथे उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले होते.
अंबर आयदे म्हणाले, “ही गुंतवणूक पुढच्या दोन वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, राज्य शासनासाठी लागणारी ॲम्बुलन्स व्यवस्था, पुण्यातील लोहगाव येथील पोलीस बांधवांचा रखडलेला गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी आणि महाराष्ट्र राज्य शासनाची बंदरे, शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्यात येणार आहे. यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून भारतातील पहिली ईसीए आधारित गुंतवणूक पुणे महापालिकेसोबत वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी २०२३ करण्यात आलेली आहे. हे हॉस्पिटल २०२७ मध्ये पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ईसीए आधारित भारतातील पहिली आर्थिक परिषद घेण्यात येणार आहे.”
कौस्तुभ धावसे म्हणाले, रुरल एन्हान्सर्स संस्थेचे अंबर आयदे हे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी ‘कंट्री डेस्क’ या परकीय गुंतवणूक बघणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. २०२१ पासून महाराष्ट्रात ईसीए गुंतवणूक कशी आणता येईल यावर ते काम करत आहेत. दावोसमध्ये झालेल्या १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारामुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे.

रुग्णालय, आरोग्यसेवा व अन्य सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी नेदरलँड व रूरल एन्हान्सर्स संस्थेशी झालेला १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार महत्वाचा ठरेल. यातून रुग्णालयांची उभारणी, ऍम्ब्युलन्स व्यवस्था, पायाभूत सुविधांची उभारणे करणे शक्य होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र