पुणे – मेट्रो उदघाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन भाजपचा प्रचार करणार होते. पण, पावसाने व्यत्यय आणला आणि हा दौरा रद्द झाला, त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) व्यक्त केली.
मेट्रोच्या स्वारगेट येथील अर्धवट कामाची पहाणी मोहन जोशी यांनी केली. या अर्धवट प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान मोदी करणार होते आणि त्यातून पुणेकरांची दिशाभूल केली जाणार होती. हा दौरा वादग्रस्त ठरून आपल्या अंगलट येईल, याची जाणीव मोदी आणि त्यांच्या पक्षाला झाली असावी, त्यातूनच त्यांनी हा दौरा रद्द केला. मेट्रोच्या ३२ किलोमीटर मार्गावरील वेगवेळ्या टप्प्यांचे भूमिपूजन आणि उदघाटन यासाठी पंतप्रधान मोदी आधी ५ वेळा येऊन गेले याच प्रकल्पातील एका टप्प्याच्या उदघाटनासाठी ते आज सहाव्यांदा येथे येणार होते. त्यातून वाद निर्माण झाला असता. सध्या महाराष्ट्रात भाजपसाठी प्रतिकूल वातावरण आहे. त्यात पुन्हा नव्याने काही वाद निर्माण होणे म्हणजे प्रकरण अंगलट येण्यासारखेच होते. म्हणून त्यांनी दौरा टाळला, असे मोहन जोशी म्हणाले.
पंतप्रधान मोदींची सभा स.प.महाविद्यालयाच्या पटांगणावरती होणार होती. ही सभा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच एक भाग होता. या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद करण्यात येणार होती. पाऊस आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी मोदींचा पुणे दौरा हा त्या त्रासात भर घालणारा होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.