पुणे – शहर एकच मेट्रोही एकच त्याचे तुम्ही कितीवेळा उद्घाटन करणार? यामुळे सरकारी तिजोरीतील जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून उद्घाटनाचे घाट रचले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी केली.
जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ आणि स्वारगेट स्थानक ते कात्रज स्थानक टप्पा एक या विस्तारित भूमिगत मार्गीकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार होते. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. या पार्श्वभूमीवर, आमदार धंगेकर बोलत होते.
आमदार धंगेकर म्हणाले, एकाच शहरात मेट्रोचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन केले जात आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे इव्हेंट भाजप आयोजित करत आहे आणि त्यातून ते स्वतःची जाहिरातबाजी करीत आहेत. पण, यामुळे सरकारच्या तिजोरीतील सर्वसामान्यांचा पैसा खर्च होतोय. याआधी पंतप्रधानांनी ऑनलाईन माध्यमातून उद्घाटने केली आहेत. तसेच याही वेळेस त्यांना ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करता आले असते. पण तसे करण्यातबाले नाही. कारण भाजपच्या डोक्यात केवळ निवडणुका आहेत.
पंतप्रधान येणार म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून तयारी करण्यात आली होती. अखेरच्या क्षणाला त्यांचा दौरा रद्द झाला. पण सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. याला जबाबदार कोण? पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्याची नामुष्की कोणामुळे ओढावली? याची उत्तरेही जनतेसमोर आली पाहिजेत, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.
काँग्रेसने ‘असे’ कधीही केले नाही!
या देशात मेट्रो आणण्याचे पहिले ऐतिहासिक पाऊल काँग्रेसने उचलले. दूरदृष्टी ठेवून डीपीआर आणला. हे देशातील जनतेला माहिती आहे. पण, याची जाहिरातबाजी काँग्रेसने कधीही केली नाही. जनतेचा पैसा जपून, काळजीपूर्वक वापरण्याचे काम काँग्रेसने केले. पण सध्याच्या सरकारमध्ये तसे होताना दिसत नाही, अशी खंत आमदार धंगेकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होवू शकला नाही. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिकाच्या हस्ते हा शुभारंभ करायला हवा होता. पण, सत्ताधाऱ्यांनी तसे केले नाही.
रवींद्र धंगेकर,आमदार